चीनबाबत सतर्कतेचीच गरज

By admin | Published: May 23, 2016 03:51 AM2016-05-23T03:51:22+5:302016-05-23T03:51:22+5:30

चीनने भारताच्या उत्तर सीमेजवळ लष्कराची मोठी जमवाजमव केली असल्याचा, पेंटँगॉन या अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेने त्या देशाच्या विधिमंडळाला सादर केलेला अहवाल भारताची चिंता वाढविणारा आहे.

China needs alertness | चीनबाबत सतर्कतेचीच गरज

चीनबाबत सतर्कतेचीच गरज

Next

चीनने भारताच्या उत्तर सीमेजवळ लष्कराची मोठी जमवाजमव केली असल्याचा, पेंटँगॉन या अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेने त्या देशाच्या विधिमंडळाला सादर केलेला अहवाल भारताची चिंता वाढविणारा आहे. या जमवाजमवीची सुरुवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असल्याचे या अहवालाचे सांगणे हे आपल्या गुप्तचर यंत्रणेएवढेच सरकारचेही सुस्तावलेपण स्पष्ट करणारे आहे. चीनचे अध्यक्ष झी शिपिंग मध्यंतरी भारताच्या ‘सदिच्छा भेटी’ला आले होते. त्या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत साबरमतीच्या गांधी आश्रमाला भेट दिली आणि साबरमतीच्या काठाने चालतानाची त्या दोघांची छायाचित्रे माध्यमांनी देशाला सहर्ष दाखविली. त्यावेळी झी यांनी चरखा चालवून पाहिला आणि मोदींसोबत गुजराती ढोकळ्याचा आस्वाद घेतल्याच्या बातम्याही जोरात प्रकाशित झाल्या. वास्तव हे की, झी इकडे चरखा कातत असताना वा मोदींसोबत ढोकळा खात असताना, तिकडे त्यांचे सैन्य भारताच्या उत्तर सीमेजवळ एकवटले होते आणि त्याची खबरबात भारताला नव्हती. झी यांनीही त्या भेटीत तिचा सुगावा कोणाला लागू दिला नाही. भारत-चीन भाई-भाई अशा घोषणा एकीकडे देत असतानाच १९६२ च्या आॅक्टोबरात चीनचे सैन्य अरुणाचलात, उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती प्रदेशात आणि लेहची सीमा ओलांडून भारतात आले होते. तेव्हाच्या गाफिलपणाची आठवण व्हावी असाच झी शिपिंग यांचा तो सदिच्छा दौरा ठरला हे येथे नमूद करण्याजोगे. या भेटीत मैत्रीच्या आश्वासनापलीकडे चीनने भारताला काही देऊ केले नाही. त्या दौऱ्याआधीच चीनने ४२ अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानला देऊ करून त्यांच्या ताब्यातील काश्मीरच्या प्रदेशातून एका औद्योगिक कॅरिडॉरच्या उभारणीचा करार केला. त्याच्या मोबदल्यात पाकिस्तानने आपल्या बलुचिस्तानच्या समुद्री सीमेवर चीनला एका प्रचंड बंदराचे बांधकाम करू द्यायला संमती दिली होती. चीनमध्ये होणाऱ्या मालाची वाहतूक काश्मीर-पाकिस्तान व बलुचिस्तानमार्गे थेट मध्य आशियाई व पाश्चिमात्य देशांपर्यंत करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच काळात चीनने नेपाळ या भारताच्या परंपरागत मित्रराष्ट्राला भारतापासून तोडून आपल्या जाळ्यात ओढले. नेपाळात भारतविरोधी भावना उभी होणे हा आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा आपल्याच भूमीत झालेला पराभव आहे. नेपाळचा भारतविरोध अजून शमला नाही आणि त्याच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत चीनने सहा पदरी सडकेसोबतच आपला रेल्वेमार्गही आणून भिडविला आहे. श्रीलंका हा भारताचा मित्र देश आहे आणि त्याचे अध्यक्ष सिरिसेना नुकतेच उज्जैनला येऊन क्षिप्रा नदीच्या पाण्यात मोदींसोबत सिंहस्थ स्नान करून परत गेले. मात्र श्रीलंकेतील चीनची गुंतवणूक आणि त्या देशाचा चीनकडे वाढलेला ओढा गेली काही वर्षे आपण पाहत आहोत. म्यानमार आणि बांगला देश यातही चीनची गुंतवणूक नुसती आर्थिक नाही तर रस्ते बांधणी व रेल्वे उभारणी यासारखी विकासविषयकही आहे. भारताभोवतीचे सगळे देश असे फितवून भारताची कोंडी करण्याचे राजकारण एकीकडे करीत असतानाच चीनने त्याचे सैन्य आपल्या उत्तर सीमेवर आणले. ही बाब त्याच्या आर्थिक व लष्करी आक्रमकतेच्या वाढीएवढीच आपल्या परराष्ट्रीय धोरणाच्या मंद वाटचालीवर प्रकाश टाकणारी आहे. तसाही चीनचा अर्थव्यवहार आपल्या तुलनेत मोठा आहे आणि आपले लष्कर १३ लाखांचे तर चीनचे ३० लाखांहून मोठे आहे. त्याच्या वाढत्या बळाची धास्ती जपान, थायलंड, मलेशिया व सगळ्या दक्षिणपूर्व आशियाई देशांनीही घेतली आहे. भारताचे अमेरिकेशी व विशेषत: ‘बराक’ यांच्याशी सख्य व त्यावरचे वाढते अवलंबन या संदर्भात पाहिले की आपल्या आर्थिक आघाडीवरील अपयशाएवढेच परराष्ट्रीय आघाडीवरील अपयशही लक्षात येणारे आहे. सुरक्षा समितीवरील भारताच्या स्थायी सदस्यत्वाला चीनचा विरोध आहे आणि चीनजवळ त्याविषयीचा नकाराधिकारही आहे. भारताविरुद्ध गुन्हेगारी करणाऱ्यांच्या बंदोबस्ताची इंटरपोलकडे भारताने केलेल्या मागणीला चीनने हरकत घेतली आहे. शिवाय अरुणाचल या आपल्या राज्याचा मोठा भाग तिबेटचा असल्याचे सांगत त्यावर त्याने त्याचा हक्कही सांगितला आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असताना ‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे’ असे जे उद्गार काढले ते या अर्थाने खरे आहेत. बराक ओबामांची अमेरिकेची अध्यक्षपदाची कारकीर्द खऱ्या अर्थाने नोव्हेंबरात आणि औपचारिक स्वरूपात २० जानेवारी २०१७ ला संपत आहे. त्याजागी डोनाल्ड ट्रम्पसारखा भारताविरुद्ध बोलणारा अध्यक्ष सत्तारूढ झाला तर आपल्याला स्वबळावर जगाच्या राजकारणात उतरण्याखेरीज पर्याय उरणार नाही. त्यामुळे पेंटँगॉनने अमेरिकेच्या सरकारला दिलेली चिनी सैन्याच्या भारताच्या सीमेलगतच्या जमवाजमवीची माहिती आपल्याला व आपल्या सरकारला अस्वस्थ करणारी ठरावी अशी आहे. ‘सारे काही फार चांगले चालले आहे’ अशा संभ्रमात राष्ट्रांना राहता येत नाही. त्यामुळे चीनबाबत सतर्क राहणे व आपली वाटचाल समर्थ बनविणे हा आत्मनिर्भरतेचा मार्गच यापुढे भारताला अनुसरावा लागणार आहे.

Web Title: China needs alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.