चीनचा कांगावा साधा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:54 AM2018-04-12T00:54:29+5:302018-04-12T00:54:29+5:30

भारतीय सैनिकांनी अरुणाचल प्रदेशालगतची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चीनच्या (तिबेट) प्रदेशात प्रवेश केल्याचा चीन सरकारचा कांगावा साधा नाही.

China is not easy | चीनचा कांगावा साधा नाही

चीनचा कांगावा साधा नाही

Next

भारतीय सैनिकांनी अरुणाचल प्रदेशालगतची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चीनच्या (तिबेट) प्रदेशात प्रवेश केल्याचा चीन सरकारचा कांगावा साधा नाही. एखादी कुरापत काढून भारताला संभ्रमात ठेवण्याच्या वा त्याला प्रत्यक्ष युद्धात ओढण्याच्या त्याच्या डावाचा तो प्रकार आहे. भारताशी असलेले आपले वैर त्या देशाने कधी दडवून ठेवले नाही. त्याचे अध्यक्ष शी झिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले असतानाही त्यांनी या देशाविषयीची त्यांची भूमिका त्यांच्या मौनामागे दडविण्यातच सारा वेळ घालविला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात संरक्षण खात्याचे मंत्री राहिलेले जॉर्ज फर्नांडिस हे तर ‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे’ हे उघडपणेच म्हणत असत. चीनचे शस्त्रबळ व अर्थबळ भारताहून अनेकपटींनी अधिक आहे आणि त्या देशाला हिंदी महासागरापर्यंत येण्याच्या मार्गातला भारत हा सर्वात मोठा अडथळा वाटणारा आहे. तसा एक मार्ग त्याने पाकिस्तानमधून काढला आहे आणि दुसरा मार्ग आता त्याने म्यानमारमधूनही मिळविला आहे. भारत व चीन यांच्या दरम्यानचा नेपाळ हा देश चीनला अधिक अनुकूल आहे आणि अरुणाचल प्रदेश या भारताच्या घटक राज्यावर तर चीनने त्याचा हक्कच सांगितला आहे. सध्याची चीनची जगाच्या राजकारणातील वट मोठी आहे. त्याला रशियाचे भय नाही आणि उत्तर कोरियाला हाताशी धरून त्याने अमेरिकेलाही युद्धमग्न मानसिकतेत आणले आहे. जपान व आॅस्ट्रेलियासारखी अमेरिकेची पूर्व आशियातील मित्रराष्टÑेही चीनमुळे धास्तावली आहेत. त्यांच्यावर जास्तीचे दडपण आणण्यासाठी व आपण आशिया खंडातील एकमेव महासत्ता असल्याचे साºयांना दाखवून देण्यासाठी चीनने त्याच्या दक्षिण समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. त्याला शह देण्यासाठी अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका त्या समुद्रात उतरविली आहे. मात्र तिची जराही धास्ती न घेता चीनने आपला मोठा आरमारी दस्ता आपल्या विमानवाहू नौकांसह त्याच्या समोर उभा केला आहे. अमेरिकेसह साºया जगाला आपले सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न करणारा व आपली लष्करी दहशत आशियात उभी करण्याच्या प्रयत्नात असणारा चीन अरुणाचलवर त्याचा हक्क सांगत असेल आणि त्याच प्रदेशातून भारतीय सैनिकांनी आपल्या प्रदेशात घुसखोरी केली असा आरोप करीत असेल तर त्याचा तो पवित्रा दुर्लक्ष करण्याजोगा वा राजकीय पटावरचा एक डाव समजण्याजोगा सरळ नसणारा तो उघड आहे. भारत व चीनच्या दरम्यान असलेली मॅकमहोन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा चीनने आजवर मान्य केली नाही. अरुणाचल व सिक्किम ही भारताची दोन राज्ये आपलीच असल्याचे म्हणणे त्याने कधी सोडले नाही. शिवाय लद्दाखचा पूर्व भाग, पाकव्याप्त काश्मिरातील काही प्रदेश व उ. प्रदेशचे उत्तरेकडील सीमावर्ती क्षेत्रही गेली अनेक वर्षे तो आपल्या नकाशात दाखवीत आला आहे. चीनचे हे आक्रमक पवित्रे भारत गेली ७० वर्षे पाहात व अनुभवत आला आहे. त्यातून चीनला युद्धासाठी कोणतेही कारण लागत नाही. १९६२ मध्ये त्याने भारतावर केलेले आक्रमण असेच कारणावाचूनचे व कोणत्याही पूर्वसूचनेवाचूनचे होते. काही काळ युद्ध करून व आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करून त्याने तशीच कोणत्याही कारणावाचून माघारही घेतली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात व विशेषत: तिसºया जगात त्या काळी भारताचे वाढलेले वजन सहन न होऊन त्याला धक्का देण्यासाठी चीनने हे साहस केले होते. नंतरच्या काळात चीनने भारताशी उघड युद्ध केले नसले तरी डोकलामच्या क्षेत्रात त्याचा हस्तक्षेप सतत वाढता राहिला आहे. ब्रह्मपुत्रेवर भारताच्या सीमेलगत त्याने बांधलेले प्रचंड धरण, नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत आणलेले आपले रेल्वेमार्ग व महामार्ग आणि भारताच्या उत्तर सीमेवर सातत्याने ठेवलेला आपल्या सेनेचा मोठा भाग हा चीनचा व्यवहारही काळजी करण्याजोगा आहे. डोकलामच्या क्षेत्रात शांततेची बोलणी झाल्यानंतरही त्याने अनेक हेलिपॅड व वैमानिकतळ उभे करण्याचा कार्यक्रम थांबविला नाही. हा घटनाक्रम पाहता चीनचा आताचा कांगावाही भारताला कमालीच्या गंभीरपणे घेणेच गरजेचे झाले आहे.

Web Title: China is not easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.