चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:32 AM2021-05-13T06:32:27+5:302021-05-13T06:33:00+5:30

चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे.

China will now draw a 'border' on Everest too! | चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’!

चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’!

Next

माऊंट एव्हरेस्ट म्हणजे जगभरातील गिर्यारोहकांसाठी स्वर्ग. जगातलं हे सर्वोच्च शिखर एकदा सर करायचंच हे अनेक गिर्यारोहकांचं आयुष्यातलं अंतिम स्वप्न असतं. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. माऊंट एव्हरेस्टचा मोहच एवढा आहे की आजकाल कमी प्रशिक्षित गिर्यारोहक आणि सर्वसामान्य पर्यटकांनाही एव्हरेस्टची आस लागलेली असते. कारण पैसे खर्च करायची तयारी असली तर ऑक्सिजन सिलिंडर्सपासून  सामान वाहून नेण्यापर्यंत आणि  शिखरावर पोहोचविण्यापासून ते परत ‘सुखरूप’ खाली आणण्यापर्यंत शेर्पाही उपलब्ध असतात. धोका अगदीच कमी करायचा असेल, तर अनेक जण आपल्यासोबत दोन-दोन, तीन-तीन शेर्पा आणि ‘गरजेपेक्षा’ जास्त ऑक्सिजन सिलिंडर्सही नेतात. पण, हिमालयातला हा निसर्गच इ‌तका कठीण आणि बेभरवशाचा आहे, की तिथे केव्हा काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पट्टीच्या गिर्यारोहकांनाही येथे आपले प्राण गमवावे लागले आहेत. एवढंच नाही, गिर्यारोहकांचा मृत्यू होण्याचं एव्हरेस्टवरील प्रमाण जगात सर्वाधिक आहे. 

- पण कोरोनानं एव्हरेस्टलाही सोडलं नाही. एव्हरेस्टवर कोरोना पसरू नये म्हणून नेपाळनं गेल्या वर्षी आपल्या भागातून एव्हरेस्टवर चढाई बंद केली होती. पण, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला हादरे बसायला लागल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कडक नियम आणि जादा पैसे घेऊन का होईना, गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट पुन्हा खुलं केलं. त्यामुळे ज्याची भीती होती, ते खरं ठरलं. एव्हरेस्टवर जाणाऱ्या अनेक गिर्यारोहकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला. त्यामुळे चीनही आता सज्ज झाला आहे. नेपाळकडून येणारा  कोरोना आपल्या भागात पसरू नये यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने निर्णय घेतला आहे.  गेल्या महिन्यात नेपाळकडून चढाई करणाऱ्या काही गिर्यारोहकांना काेरोनाची लागण झाली होती, हे गिर्यारोहक आपल्या भागात येऊ नयेत, तिबेटच्या बाजूने चढाई करणारे आपल्याकडचे गिर्यारोहक सुरक्षित राहावे यासाठी चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे.  भारताचाही बराच भूभाग चीनच्या ताब्यात आहे आणि आणखीही काही भाग गिळंकृत करण्याचे चीनचे उपद‌्व्याप नेहमीच सुरू असतात. केवळ जमिनीचाच नाही, समुद्राचाही बराच मोठा भूभाग चीननं बळकावला आहे आणि त्यावर केवळ आपलाच हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यावरून अमेरिकेसहित अनेक देशांशी त्यांची वादावादीही सुरू आहे; पण आता जगातल्या सर्वोच्च शिखरावर - एव्हरेस्टवरही चीन आपली सीमारेषा आखणार म्हटल्यावर सगळ्या जगाचेच कान टवकारले गेले आहेत. असं करताना स्वत:चा नसलेला तिथलाही मोठा भूभाग चीन आपल्या घशात घालेल याची जगाला शंका आणि भीती आहे.
 
ही सीमारेषा आखण्याचं काम चीननं तिबेटमधील एव्हरेस्ट गाइड‌्स आणि मार्गदर्शकांच्या एका टीमवर सोपवलं आहे. ही टीम एव्हरेस्टचं ‘विभाजन’ करताना ‘आपली’ सीमारेषा तर आखेलच, पण नेपाळच्या बाजूनं कोणताही गिर्यारोहक आपल्या हद्दीत येऊ नये, यावरही कटाक्षानं लक्ष ठेवील! कोरोनाला रोखण्यासाठी शिखरावर एकावेळी सहापेक्षा जास्त गिर्यारोहक असणार नाहीत, याचंही नियोजन चीन करणार आहे. चीननं हा एकतर्फी निर्णय घेतला असला तरी ही सीमारेषा कशी आखली जाईल, कशी लागू केली जाईल याबाबतची स्पष्टता मात्र अजून नाही. त्याकडे अनेकांचे डोळे लागून आहेत. पण, कोरोनाच्या नावाखाली चीन एव्हरेस्टवरही घुसखोरी करेल आणि हा प्रदेशही आमचाच म्हणून हक्क दाखवेल अशी भीती नेपाळसह अनेक देशांना वाटते आहे. 
एव्हरेस्टवर अशी सीमारेषा, विभाजनरेखा आखली जाईल या माहितीला चीनची अधिकृत न्यूज एजन्सी ‘क्झिन्हुआ’नंदेखील दुजोरा दिला आहे. 
नेपाळनं गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट खुला केल्यानंतर लगेचच काही दिवसांत, म्हणजे एप्रिलपासूनच कोरोनाचे रुग्ण सापडायला  सुरुवात झाली होती. एकीकडे डळमळीत अर्थव्यवस्थेमुळे अगतिक झालेला नेपाळ आणि दुसरीकडे या परिस्थितीचाही फायदा उठवू पाहणारा चीन हे दृश्य आता समोर दिसू लागलं आहे. कोरोनाच्या नावाखाली चीनची ही आणखी एक ‘छुपी चाल’ मानली जात आहे.

नेपाळला चिंता ऑक्सिजन सिलिंडर्सची! 
चीनच्या या कृतीमुळे नेपाळही चिंताक्रांत असला, तरी आपल्याच समस्यांनी ग्रस्त असलेल्या नेपाळला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एव्हरेस्टवर कोरोना पसरत असल्यानं नेपाळवर जगभरातून टीका होत असताना नेपाळ मात्र एव्हरेस्टवर नेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा कसा वाढविता येईल या चिंतेत आहे. कारण,  या सिलिंडर्सची त्यांना मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवते आहे.
 

Web Title: China will now draw a 'border' on Everest too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.