चीनकडून भारताची जलकोंडी ?
By admin | Published: October 4, 2016 12:30 AM2016-10-04T00:30:45+5:302016-10-04T00:30:45+5:30
तिसरे महायुद्ध तेलासाठी होईल असे एकेकाळी म्हटले जाई. आता मात्र ते तेलाऐवजी पाण्यासाठी लढविले जाण्याची शक्यता अधिक मोठी दिसत आहे
तिसरे महायुद्ध तेलासाठी होईल असे एकेकाळी म्हटले जाई. आता मात्र ते तेलाऐवजी पाण्यासाठी लढविले जाण्याची शक्यता अधिक मोठी दिसत आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या हेतूने भारत सरकारने सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराची फेरतपासणी करण्याचे व त्या कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आता ठरविले आहे. यामुळे पाकिस्तानात जाणारे सिंधू खोऱ्यातील पाणी कमी होऊन त्या देशातील सिंचनाच्या व्यवस्था अडचणीत येतील असे येथे मानले जात आहे. भारतात हे घडत असताना चीनमध्ये भारताची पाणीकोंडी करण्याचे काम प्रत्यक्षात सुरूही झाले आहे. चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटच्या पश्चिमेला उगम पावणारा ब्रह्मपुत्र हा नद पूर्वेकडे वाहत जाऊन आसामपाशी भारताच्या भूमीकडे वळतो. ब्रह्मपुत्र ही नदी असली तरी तिला नद म्हणण्याचे कारण तिचे अतिविशाल रुप आणि तिच्यातून वाहत जाणाऱ्या पाण्याचा वेगवान व महाकाय लोंढा हे आहे. चीन सरकारने या नदावर एक विशालकाय बांध घालण्याची योजना तीन वर्षांपूर्वी हाती घेतली व ते बांधकाम आता सुरू आहे. ब्रह्मपुत्र आसामात जेथे प्रवेश करतो त्या क्षेत्रापासून काही अंतरावर हा बांध घातला जात आहे. तो पूर्ण झाला तर ब्रह्मपुत्राचे भारतात येणारे पाणी कमी होईल व त्याचा फटका आसाम व बंगाल या राज्यांसोबत बांगलादेशालाही बसेल हे उघड आहे. भारताने या धरणाविषयीची आपली नाराजी प्रगट केल्यानंतरही चीनने त्याचे बांधकाम थांबविले नाही ही बाब महत्त्वाची असून तिच्यामागे त्या देशाची भारतविरोधी जिद्दच आहे हे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे बांधकाम सुरू असतानाच चीनने ब्रह्मपुत्राला तिबेटातच येऊन मिळणाऱ्या यांगझी या दुसऱ्या एका महानदीवर बांध घालण्याची आपली योजना नुकतीच जाहीर केली आहे. चीनचे तंत्रज्ञान एवढे प्रगत आणि वेगवान की त्याची घोषणा व तिची पूर्तता यात फार काळाचे अंतर बहुदा नसते. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे पूर्ण होताच भारताच्या पूर्व भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुत्र हा नद आसामच्या मध्यभागातून पूर्व पश्चिम असा वाहत जातो व तो त्या राज्याचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करतो. गुवाहाटीजवळून वाहणारा त्याचा प्रवाह डोळे दिपविणारा आणि त्याचा पल्याडचा किनारा दिसू न देण्याएवढा मोठा आहे. आणि आता ब्रह्मपुत्रासोबत यांगझी या नदीचा प्रवाह अडविण्याचा चीनचा इरादा आहे. त्या देशाने तिबेटमधील बौद्ध भिक्षुंचे स्वातंत्र्याचे आंदोलन कमालीच्या क्रौर्याने दडपले आहे. शिवाय आपल्या मध्यभूमीतून नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत एक सहापदरी महामार्ग व तेथपर्यंतचा रेल्वेमार्गही बांधून काढला आहे. त्या देशाच्या मनात असलेले भारताविषयीचे वैर नित्यनेमाने प्रगटही होत गेले आहे. १९६२ च्या युद्धात त्याने बळकावलेला भारताचा हजारो चौरस कि.मी.चा भूप्रदेश अजून त्याच्या ताब्यात आहे. त्यातच त्याने अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क आता सांगितला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येकच तणावात त्याने आपले मत वा नकाराधिकार पाकिस्तानच्या बाजूने वापरला आहे. एका दहशतखोराविरुद्ध युनोने कारवाई करावी या भारताने नुकत्याच केलेल्या मागणीवरही त्याने आपला नकाराधिकार वापरला आहे. पाकिस्तानने व्यापलेल्या पण प्रत्यक्षात भारताच्या सार्वभौम सीमेत येणाऱ्या काश्मीरच्या प्रदेशातून चीनने रेल्वे तर नेलीच शिवाय त्यात आता त्याने एका महत्त्वाकांक्षी औद्योगिक कॉरीडॉरचे बांधकामही हाती घेतले आहे. भारताचे संरक्षणविषयक सल्लागार डॉ. अजित डोवाल यांच्या मते चीनचे लष्करी व आर्थिक सामर्थ्य भारताहून अनेक पटींनी मोठे असल्याने त्याच्याशी वाटाघाटी करूनच भारताला आपल्या दरम्यानचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन देशांबाबत दोन वेगळ््या पातळ््यांवर भारताला आपली लष्करविषयक व संरक्षणविषयक धोरणे ठरवावी लागणार आहेत. (चीनला भूतलावरील युद्धात पराभूत करणे अशक्य आहे. त्याची औद्योगिक व लष्करी केंद्रे उद्ध्वस्त करता आली तरच भारत त्या देशाला नमवू शकणार आहे. यासाठी भारताला अतिशय वेगवान व शक्तीशाली क्षेपणास्त्रांची निर्मिती करणे आवश्यक आहे असेही डोवाल यांचे मत आहे.) चीनचे राज्यकर्ते बोलतात चांगले, हसतातही छान, ते भारताला भेटी देतात, साबरमतीत जाऊन चरखा चालवितात आणि गुजरातच्या ढोकळ््याचाही आस्वाद घेतात. मात्र त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे ते कधी कोणाला कळू देत नाहीत. आपल्या इराद्यांबाबत कमालीची गुप्तता राखण्यात गेली ६० वर्षे तो देश यशस्वी राहिला आहे. या गुप्ततेच्या बळावरच त्याला स्टॅलिन आणि रशिया यांनाही दीर्घकाळ अंधारात ठेवणे जमले आहे. त्यामुळे त्याच्या नेत्यांच्या फसव्या चेहऱ्यांवर जाण्यात अर्थ नाही. ब्रह्मपुत्र व यांगझी या नद्यांवरील त्यांचे बांधकामच तेवढे आपल्या विचाराचे व चिंतेचे आताचे विषय असले पाहिजेत. जॉर्ज फर्नांडीस भारताचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी ‘चीन हाच भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे’ असे म्हटले होते. त्यांच्या त्या उक्तीचा या देशाला विसर पडणे उपयोगाचे नाही असेच त्याच्या आताच्या धरणांच्या बांधकामाचे स्वरुप आहे.