बांगलादेशवर भारतापेक्षा चीनची पकड अधिक मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:20 AM2019-11-15T05:20:48+5:302019-11-15T05:21:12+5:30
गेल्या महिन्यात भारताचा छोटा शेजारी बांगलादेश येथे एक घटना घडली, जिच्यामुळे तरुण पिढीला देशातील होणाऱ्या राजकीय बदलाची काळजी लागून राहिली आहे.
- डॉ. सुभाष देसाई
गेल्या महिन्यात भारताचा छोटा शेजारी बांगलादेश येथे एक घटना घडली, जिच्यामुळे तरुण पिढीला देशातील होणाऱ्या राजकीय बदलाची काळजी लागून राहिली आहे. आपल्या भविष्याविषयी त्यांनी चिंता करणे हे स्वाभाविक आहे. बांगलादेशात ढाका येथे इंजिनीअरिंग कॉलेजचा एक विद्यार्थी मारला गेला. कारण होते की, त्याने शेख हसीना यांनी मोदी सरकारशी केलेल्या करारावर टीका केली होती. त्याबद्दल अवामी लीगच्या काही सदस्यांनी त्याचा खून केला. हा करार फेनी नदी पाणीवाटपासंदर्भात आणि मोंगला व चितेगाव बंदरांचा भारताने उपयोग करण्याबद्दलचा होता.
यासंदर्भात विरोधाचा एक भाग म्हणून आता बांगलादेशात गेल्या महिन्यापासून विद्यार्थीवर्गाने तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. देशभर असे वातावरण झाले आहे की शेख हसीना यांनी मोदींसोबत यापुढे कोणतेही करार करू नयेत. बांगलादेश छोटा असला तरी बांगलादेशच्या पुढे पूर्व बाजूला मणिपूरच्या पुढे म्यानमार येतो. या देशासंदर्भात अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया सध्या या ईशान्य पूर्व भागात घडत आहेत. चेरापुंजीला दरीच्या टोकावर उभे राहिले की दिसते तिथे पडणाºया प्रचंड पावसाचे सारे पाणी समोर खाली दिसणाºया बांगलादेश इथे जाते.
बांगलादेश आणि भारताच्या दरम्यान गंगा नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न, बेकायदेशीर घुसलेल्या रोहिंग्यांचा प्रश्न आणि भारतात वास्तव्य केलेल्या अनेक बेकायदेशीर बांगलादेशीयांचा प्रश्न अशी अनेक न सुटलेली कोडी आहेत. बांगलादेश लवकरच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी भारताला निर्यात करणार आहे. यामुळेसुद्धा बांगलादेशात नाराजी आहे. त्यांच्या मते एलपीजी गॅस हा बांगलादेशातच वापरला जावा. पण शेख हसीना यांनी त्याचा खुलासा केला आहे की, भारताला एलपीजी गॅस दिला जातो तो गॅस फिल्डमधून नसून तो क्रूड आॅइल एक्स्पोर्ट बायप्रॉडक्ट आहे.
दुसरी एक गोष्ट बांगलादेशींना आवडलेली नाही ती म्हणजे मोदी सरकारने निरीक्षणाची केंद्रे शेजारील देशांमध्ये बसवलेली आहेत. समुद्रकिनाºयावर अतिरेकी हल्ला होऊ नये म्हणून श्रीलंका, मालदीव आणि बांगलादेश या ठिकाणी ही निरीक्षणाची केंद्रे उभी केली आहेत. याचे खरे कारण चीनने इंडियन ओशनमध्ये काही नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांचा वावर वाढवला आहे. अमेरिका, भारत आणि जपान या तिन्ही राष्ट्रांना चीनची ही थोडी घुसखोरी आणि दादागिरी वाटते. परंतु बांगलादेशला विविध पातळ्यांवर चीनची होणारी मदत बांगलादेश लपवू शकत नाही. २०१५ पासून बांगलादेशचा चीन हा सर्वात मोठा व्यापारमित्र आहे. त्याचप्रमाणे चीन बांगलादेशच्या दृष्टीने मोठा सावकारही आहे.
मोदी सरकारने बांगलादेशला दोन वर्षांपूर्वी पाच बिलियन अमेरिकन डॉलर कर्ज दिले. पण त्याच्या कितीतरी पट अधिक म्हणजे चोवीस बिलियन अमेरिकन डॉलर एवढे कर्ज चीन अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बांगलादेशला भेट दिली त्या वेळी मंजूर केले. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली बांगलादेश शेजारी म्हणून भारताशी मैत्रीचे नाते ठेवत असला तरी त्याच्यावर वरचश्मा चीनचाच आहे. संरक्षण कराराबाबतसुद्धा चीनने पाकिस्तानखालोखाल बांगलादेशला मोठी मदत केली आहे. दोन चिनी बनावटीच्या पाणबुड्या बांगलादेशला दोन वर्षांपूर्वी दिल्याने तर मोदी सरकारच्या रागाचा पारा वाढलेलाच आहे. एकंदरीत मोदी सरकार आणि शेख हसीना सरकार यांच्यात आतून फारसे संबंध चांगले नाहीत. इकडे शेख हसीनाने मोदींपुढे वेगळाच प्रश्न मांडला आहे. म्यानमार रोहिंग्यांच्या प्रश्नी बांगलादेशला दाद देत नाही. त्यामुळे शेख हसीना यांनी मोदींना म्यानमारवर दबाव आणण्याची विनंती केली. मात्र मोदींनी खुबीने या मागणीला बगल देऊन शेख हसीना यांनी परकीय नागरिकांना दिलेल्या सहानुभूतीच्या वागणुकीचे कौतुक केले. ही बाब बांगलादेशीय लोकांना अजिबात रुचलेली नाही.
मोदींच्या भाषणातून दोन्ही देशांतील हा सुवर्णकाळ आहे असे जरी म्हटले असले तरी बांगलादेशी लोक मोदींच्या या प्रशस्तिपत्रावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीचा काढलेला मुद्दा आणि घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्याची आक्रमक मोहीम यात कुठेतरी विरोध आहे. त्यामुळे विविध विरोधाभासात बांगलादेश भारताशी संबंध जोडून आहे. या संबंधांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व मोदींचे तीव्र मतभेद आहेत. पंतप्रधान मोदींनी दुटप्पी भूमिका घेऊ नये, असा ममता बॅनर्जींचा आक्षेप आहे आणि त्यात थोडेफार तथ्य जाणवते.
(आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक)