चीनची लष्करी ताकद ही आता अमेरिकेची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 04:51 AM2019-10-18T04:51:05+5:302019-10-18T04:51:34+5:30
चलन रूपांतर प्रक्रियेमुळे सर्वसामान्य माणसाला अमेरिका आणि चीनचा लष्करी सामर्थ्यावरचा खर्च लक्षात येणे कठीणच असते.
स्टॉकहोम येथे एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विविध देशांच्या लष्करी सामर्थ्याचा तौलनिक अभ्यास करत अलीकडेच या संस्थेने अशी माहिती जाहीर केली की, थेट अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला आव्हान देण्याची क्षमता आता चीनजवळ निर्माण झाली आहे. या वर्षीचा चीनचा लष्करी अर्थसंकल्प १.७ ट्रीलियन युवान आहे. तो चीनच्या जीडीपीच्या १.९ टक्के इतका भरतो. विद्यमान चलनाच्या संदर्भात विचार केला तर त्याच्या तुलनेत अमेरिकेचा अर्थसंकल्प ६४९ बिलियन अमेरिकन डॉलर, म्हणजे अमेरिकेच्या जीडीपीच्या ३.२ टक्के भरतो. आतापर्यंत अमेरिकेच्या लष्करी अर्थसंकल्पाच्या ४0 टक्के चीनचा अर्थसंकल्प मांडला जात होता. म्हणजे लष्करी सामर्थ्यासाठी अमेरिका सर्वाधिक खर्च करते, असे दिसते.
चलन रूपांतर प्रक्रियेमुळे सर्वसामान्य माणसाला अमेरिका आणि चीनचा लष्करी सामर्थ्यावरचा खर्च लक्षात येणे कठीणच असते. उदा. जेव्हा एखादा अमेरिकन किंवा आॅस्ट्रेलियन माणूस भारत प्रवासाला येतो, तेव्हा त्याला रस्त्यावरचे चटपटीत खाणे किंवा हॉटेलमध्ये राहणे खूप स्वस्त वाटते. हीच गोष्ट लष्कराबाबत होते. अमेरिकन लष्करी जवानांचा पगार समजा वार्षिक साठ हजार अमेरिकन डॉलर आहे. एवढ्या पगारात चीनच्या अनेक सैनिकांचा पगार होऊ शकतो. १ आॅक्टोबर २0१९ ला बीजिंगमध्ये चीनचा राष्ट्रीय दिन साजरा झाला तेव्हा पीपल्स लिबरेशन आर्मीने आपली लष्करी ताकद जगाला दाखवली. आता अमेरिकेत सर्वाधिक खर्च लष्करावर होतो, तर भारत व रशिया त्यामानाने फक्त दहा टक्केच खर्च करतात. पण चीन हा अमेरिकेच्या ७५ टक्के म्हणजे सर्वाधिक खर्च करतो.
या पार्श्वभूमीवर भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या लष्कराची तुलना चीनशी करताना अतिशयोक्ती टाळावी. चीनने लष्करी प्रदर्शनात जगाला सामर्थ्य दाखवण्यास बिलकूल कसूर केली नाही. नवी बॅलेस्टिक मिसाईल, सुपरसोनिक अत्याधुनिक नव्या आवृत्तीतील लढाऊ रणगाडे हे सारे इशारे अमेरिकेला होते, असे लष्करी तज्ज्ञांना वाटते. एशिया पॅसिफिक आणि त्यापलीकडे पाऊल टाकाल तर याद राखा, असा सज्जड दम आपल्या शत्रूला चीनने दिला आहे.
अध्यक्ष जिनपिंग यांनी लष्कराची पाहणी केली.
७0 वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत आता पीपल्स लिबरेशन आर्मीला जगात सर्वोत्कृष्ट बनवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सर्वेसर्वा अध्यक्ष बनल्यापासून अमेरिका-चीनचे राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या हालचालींची चिंता अमेरिकेला लागली आहे. ही डोकेदुखी आता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चीनची साम्राज्यवादी दृष्टी खरे तर साऱ्याच शेजारी राष्ट्रांनाही तापदायक बनली आहे. अर्थातच त्याला भारत अपवाद नाही.
चीनच्या राष्ट्रीय दिनाला १५ हजार सैनिक कवायतीत सामील झाले होते. ५८0 लष्करी हार्डवेअर रस्त्यावर आले होते तर १६0 विमाने आकाशात झेपावली होती. आंतरराष्ट्रीय बॅलेस्टिक मिसाईल अनेकांना धडकी भरवणारे होते. दहा अण्वस्त्रे वाहून नेणारे ते मिसाईल आहे. पाणबुडीतून मारा करता येणारे धोकादायक मिसाईल आहे. त्याची क्षमता आठ हजार किलोमीटर इतकी आहे. डीएस हंड्रेड हे क्रुझ मिसाइल कोणत्याही विमानाला पाडू शकते. ध्वनीहून अधिक वेगाने जाऊ शकते. हिंसाचार व अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी फालकन कमांडो युनिट हे महत्त्वाचे आहे, असे अध्यक्ष जिनपिंग यांनी सांगितले.
एकूणच काळाच्या ओघात चीनच्या लष्करी सामर्थ्यात अनेक बदल घडले आहेत. चीनच्या राज्यकर्त्यांनी सूक्ष्मपणे लक्ष देऊन आपल्या लष्करी अस्त्र आणि शस्त्रांमध्ये कमालीचे बदल केले आहेत. आपल्या देशातील बाबी जगभरात पोहोचणार नाहीत, यासाठी तो देश अतिशय काळजी घेत असतो. त्यामुळे गाफील देशांना त्यांची ताकद समजल्यावर धक्का बसू शकतो. या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. एकूणच आर्थिक गणित पाहता चीन हा आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होऊ शकेल, अशी धास्ती अमेरिकेला वाटण्यासारखी स्थिती आहे.
जेम्स चार या सिंगापूरच्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाच्या तज्ज्ञाच्या मते चीनने जगाला जे लष्करी सामर्थ्य दाखवले तो केवळ एकच भाग आहे. खरे प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जगापासून चीनने लपवला आहे. त्याचा विचार करता आता चीन पूर्वीचा राहिलेला नाही. तो आता अमेरिकेच्या तोडीस तोड उभा ठाकला आहे. जणू येत्या काही वर्षांमध्ये तोच जगातला सुपरपॉवर देश बनण्याची शक्यता वाढली आहे.
-डॉ. सुभाष देसाई। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक