चित्रगुप्तांची इंद्रदेवांकडे धाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:10 AM2018-08-06T00:10:52+5:302018-08-06T00:11:08+5:30
इंद्र लोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता.
- राजा माने
इंद्र लोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता. इंद्रदरबारात हजर राहण्याचे फर्मान निघाले होते. सुनावणीचा विषय मात्र त्याला माहीत नव्हता. महागुरू नारदमुनीही त्याला काहीच सांगत नव्हते. आरक्षण, जळगाव, सांगली किंवा दुबार पेरणी अशा विषयांची यादी त्याच्या डोक्यात गोंधळ घालू लागली होती. तो दरबाराला हजर राहण्याच्या तयारीत होता. तोच नारदांचा फोन आला... नारायण... नारायण... (यमकेने फोन उचलला)
यमके : प्रणाम महागुरू. मी निघण्याच्याच तयारीत होतो.
नारद : निघतोयस पण सुनावणी कशाची आहे? मी तुला टिप्स देतो. तू ओळख. पहिली टीप... चित्रगुप्त!
यमके : आता हे नवीन काय गुरुदेव?
पाप-पुण्याचा हिशेब लावणाऱ्या धर्मराज चित्रगुप्तांचा दरबाराशी काय संबंध?
नारद : संबंध आहे. मराठी भूमीत आरक्षण मुद्यावरून मराठा समाजाने आंदोलन छेडले. आता इतर समाजांचीही तशीच मालिका सुरू होऊ पाहते आहे...
यमके : हे खरे आहे. तरीही इथे चित्रगुप्तांचा काय संबंध?
नारद : आंदोलन असू दे नाही तर तुमच्या मराठी भूमीतील निवडणुकीचे राजकारण असू दे, इंद्रदरबाराचा संबंध येतोच.
यमके : राजकारणाचं बोलाल तर सध्या देवेंद्रभाऊ-चंद्रकांतदादा आणि मोदींच्या भाजपची चलती आहे.
नारद : आता तू इंद्रदरबारातील सुनावणीच्या विषयाकडे निघालेला आहेस.
यमके : जळगाव, सांगली महापालिकेत परिवर्तन झाले. ते लोकांनीच केले. मग इंद्रदरबार सुनावणी आणि चित्रगुप्तांचा संबंध येतोच कुठे?
नारद : संबंध नसलेले लोक आंदोलनात घुसू शकतात. मग इंद्रदरबाराच्या सुनावणीत हे विषय घुसले तर आश्चर्य कशाला वाटावे.
यमके : गुरुदेव कृपया कोड्यात बोलू नका! सुनावणीचा विषय काय आहे, तो थेट सांगा.
नारद : ठीक आहे, सांगतो. पाप-पुण्याचे अकाऊंट ठेवता ठेवता चित्रगुप्ताचे कॉम्प्युटर वारंवार हँग होत आहे. त्यात माझ्याच माध्यमातून स्वर्गलोकातील एका गटाने राजकारणातील धनशक्ती या विषयाचा स्वतंत्र हिशेब ठेवण्याची मागणी इंद्रदेवांकडे केली आहे.
यमके : हे घडले कसे?
नारद : शिष्या, तुझे आजकाल लक्ष दिसत नाही. सांगलीच्या निवडणुकीत भाजपानेच धनशक्तीचा वापर केल्याचा दावा डॉ. पतंगरावसूत बाळ विश्वजितने केला आणि हा विषय सुरू झाला.
यमके : आता आपण काय करायचे?
नारद : काही नाही. इंद्रदरबारात हजर राहायचे. राजकारणातील धनशक्तीचा विषय एवढा मोठा आहे की, त्यात आपल्याला ‘मम’ म्हणण्याच्या पलीकडे काहीही राहणार नाही.
यमके : गुरुदेव लोकनेते वसंतदादा आणि सुरेशदादा यांच्या सांगली-जळगावमधील परिवर्तनाची कारणे सर्वांनाच माहीत आहेत. सांगलीत जयंतराव-विश्वजित कंपूने त्रयस्तपणे आत्मचिंतन केल्यास त्यांना उमजेल. जळगावातील नाथाभाऊ अन् दादांना तर सगळेच माहीत आहे.
नारद : मराठी भूमीतील सर्वच राजकारण्यांना संदेश देण्यासाठीच कदाचित इंद्रांनी धनशक्तीसंदर्भात दरबार बोलावला असावा. विश्वासपूर्ण लोकशक्तीचा पुरावा न दिल्यास राजकारण्यांची नावे स्वीस बँकेच्या नाही तर चित्रगुप्तांच्या यादीत पोहोचतील एवढेच!