ज्याच्या हाती ससा तोच पारधी, हे कशासाठी?

By विजय दर्डा | Published: December 14, 2020 04:42 AM2020-12-14T04:42:58+5:302020-12-14T04:47:58+5:30

लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, तरीही पश्चिम बंगालात उपद्रवाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. समाजात दुभंग पसरवणारी ही हिंसा भयावह आहे.

clashes increases between tmc and bjp ahead of west bengal assembly election | ज्याच्या हाती ससा तोच पारधी, हे कशासाठी?

ज्याच्या हाती ससा तोच पारधी, हे कशासाठी?

Next

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

पश्चिम बंगालमधील राजकारणाचा वेध घेताना एक जुनी; पण आजही प्रचलित असलेली म्हण स्मरते, ‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी!’ दुर्दैवाने तिथल्या राजकीय पक्षांनी आज या म्हणीला शब्दशः सत्यात उतरवण्याचा जणू विडाच उचललेला आहे. त्यांच्यातले दुधाने आंघोळ करणारे शुचिर्भूत कोण आणि काळा रंग अंगाला थापलेले कोण, हे सांगणे फारच कठीण. जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवत सुटलेला आहे. या सगळ्यात लोकशाहीचा गळा मात्र घोटला जातो आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे बळी पडत आहेत. भावना इतक्या अतिरेकी टोकाला जाऊन भडकलेल्या आहेत की, संपूर्ण राज्यच दोन गटांत विभागल्यासारखे दिसते आहे.



एप्रिल - मेदरम्यान पश्चिम बंगालात निवडणुका होणार आहेत, म्हणजे अजून किमान चार महिने बाकी असले, तरी आताच निवडणुकांची रणधुमाळी तापलेली दिसते. ममता बॅनर्जी यांच्या खुर्चीखाली सुरुंग पेरण्यास भाजप सज्ज झालेला आहे. आपल्या गढीला वाचवण्याचे आव्हान ममता बॅनर्जी यांच्यासमोर असून, त्याही तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. त्याही कसलेल्या राजकारणी! त्यांना चीत करणे भाजपला वाटते तेवढे सोपे नाही. पश्चिम बंगालातील राजकारणातल्या सगळ्या चाली ममतादीदींना ज्ञात आहेत. त्या राज्यात सिद्धार्थ शंकर रे यांचे सरकार असताना साम्यवाद्यांनी हिंसेचा प्रच्छन्न वापर करून काँग्रेसला चीतपट केले होते. त्याच साम्यवाद्यांच्या सत्तेला ममता बॅनर्जी यांनी एकहाती उचलून फेकून दिले. त्यांच्यावर कितीतरी वेळा हल्ले करण्यात आले. मार खाल्ला; पण त्या मागे हटल्या नाहीत. भाजपला त्यांची चिकाटी माहीत आहे, केंद्रात भाजपने ममतांसोबत सत्तेत हिस्सेदारीही केली होती. ममता जाणून आहेत की, हे अटलबिहारी वाजपेयी आणि लालककृष्ण अडवाणी यांचे सरकार नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पक्ष आहे. ममतांना मात देण्यासाठी निवडणुकांचे मैदान दूर असतानाही भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा त्या राज्यात होत आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तिथे आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली दिसते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी तर तिथेच बस्तान मांडलेले आहे.



भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या लवाजम्यावर पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशाच्या राजकारणात उमटणे स्वाभाविक होते. या हल्ल्यात कैलाश विजयवर्गीय हेदेखील जखमी झाले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय आणि डीजीपी वीरेंद्र यांना दिल्लीत पाचारण केले. मात्र, आपल्याला कोलकाता येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहायचे असल्याने आपण दिल्लीत येऊ शकणार नाही, असे उत्तर मुख्य सचिवांनी दिले. आपण केंद्राचा कोणताच हस्तक्षेप सहन करणार नाही, असा संदेशच ममता बॅनर्जी यांनी यातून दिलेला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी आपला एक अहवाल केंद्र सरकारला पाठवला असून, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. तिकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने मागितलेल्या अहवालास ममता बॅनर्जी यांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही.  ज्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर नड्डा यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्यांना मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने माघारी बोलावले आहे. राजकारणातील जाणकारांच्या मते, नड्डा यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे पश्चिम बंगालच्या संदर्भातले वर्तन संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात जाणारे आहे. नड्डा यांच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता, असा भाजपचा आरोप आहे. जिथे हल्ला झाला, तो ममता बॅनर्जी यांचे भाचे, खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ असल्याकडे आता बोट आहे. गुन्हेगारांच्या मदतीने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्या भाच्याने केला, असा थेट आरोप कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. मात्र, भाजपनेच या हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने पलटवार केला. ममतांनी तर असेही सुनावले की, प्रचारसभांना माणसे येत नाहीत, असे दिसल्यावर अशा प्रकारची नाटके केली जातात.



अर्थात हल्ला होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नव्हे. ममता बॅनर्जींनी साम्यवाद्यांच्या सरकारला आव्हान दिले होते तेव्हा त्यांच्यावरही असेच हल्ले झाले होते. त्यांच्या गाडीवर बॉम्बही फेकले गेले होते. गतवर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीवरही हल्ला करण्यात आला होता. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. शंभराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या झटापटीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली. पश्चिम बंगालचे महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याशी तिथल्या जनतेचे भावनिक संबंध असल्यामुळे दोन्ही पक्षांनी पुतळ्याच्या मोडतोडीचे माप एकमेकांच्या पदरात घालण्याची पराकाष्ठा केली. सत्तरीच्या दशकात पश्चिम बंगालात नक्षलवाद्यांचे फार मोठे प्रस्थ होते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात जनतेचे समर्थनही त्यांना मिळत होते. त्याच दरम्यान त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली. त्यानंतर पश्चिम बंगालात नक्षलवाद अक्षरश: एकाकी पडला. जनतेचा त्या चळवळीला पाठिंबा राहिला नाही. यावेळी मात्र पुतळ्याची हानी करणारे कोण होते, हे अद्यापही कळलेले नाही.

दरम्यान, यावेळची निवडणूक धर्माच्या आधारे लढली जावी यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे. बांगलादेशातून जे पन्नास ते साठ लाख लोक येऊन राज्यात स्थिरावले आहेत, तेच ममता बॅनर्जी यांना शक्ती देत असल्याचा अंदाज आहे. यात बंगाली हिंदूही आहेत. या बंगाली हिंदूंना आपल्या बाजूने वळवणे भाजपला कठीण जातेय, कारण आपण सीएए ॲक्ट लागू करणार असल्याचे त्या पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे बांगलादेशातून आलेले हिंदूही बिथरले आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याच्या घटनाही वाढत आहे. लोकशाहीत हिंसेला काहीच स्थान नसते. येथे कोण चुकतेय आणि कुणाचे बरोबर आहे, याविषयी काही ठाम विधान करणे अवघड आहे.  एखाद्याला जखमी करताना हिंसा समोरच्याचा चेहरा पाहत नसते आणि धार्मिक द्वेषाची नखे वाढतात तेव्हा सगळ्यांवरच त्यांचे ओरखडे उमटत असतात.
vijaydarda@lokmat.com

Web Title: clashes increases between tmc and bjp ahead of west bengal assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.