राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:09 AM2017-11-23T00:09:23+5:302017-11-23T00:10:43+5:30

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे.

Cleanliness of the city's 'garbage' | राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

Next

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या सा-या देशात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री श्रींनी हे मत मांडले असणार. पण राज्याची उपराजधानी म्हणविणा-या या शहरातील स्वच्छतेचा जो कचरा झाला आहे त्याचे काय? देशातील हिरव्या गार शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो, हे अगदी खरे आहे. शिवाय हे देशातील मध्यवर्ती शहर असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून मिरविण्याचेही स्वप्न स्थानिक प्रशासन बघत आहे. परंतु येथील कचºयांचे वाढते ढीग आणि त्याच्या व्यवस्थापनात संबंधित यंत्रणेला येत असलेले अपयश हा या स्वप्नाच्या पूर्ततेतील सर्वात मोठा रोडा बनतो आहे. नागपूर महानगरपालिकेने कनक रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कचरा संकलनाचे पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. यासाठी १३५ कोटी रुपये मोजले जाणार आहेत. परंतु ही कंपनी कचरा संकलनापेक्षा अंतर्गत गैरव्यवहारांमुळेच अधिक गाजते आहे. तर दुसरीकडे अलीकडच्या काळात शहरातील कचरा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग याची साक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही ही चळवळ उभी राहील, असे वाटले होते. पण असे काही घडताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतेला अजूनही आम्ही प्राधान्य दिलेले नाही. यावर्षी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूर २० वरून एकदम १३७ व्या स्थानावर घसरले आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षी ते आणखी मागे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर टाकूनही चालणार नाही. नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले तरच शहर स्वच्छ राहू शकते. आम्ही वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे कचरा टाकायचा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रशासनाचे आहे असे मानून हात वर करायचे, ही मानसिकता बदलावी लागेल. स्वच्छ भारत अभियान असो वा स्वच्छ शहर त्यातील लोकसहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे हे आम्हाला कळते पण वळत नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या आजाराने यापूर्वी एवढे थैमान कधी घातले नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे नागपूर स्मार्ट आणि ग्लोबल बनू पाहात आहेत आणि दुसरीकडे अस्वच्छतेवरच आम्ही मात करू शकलेलो नाही, हे दुर्दैवच म्हणायचे.

Web Title: Cleanliness of the city's 'garbage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर