समृद्धीशिवाय स्वच्छता अशक्य

By admin | Published: October 6, 2014 02:59 AM2014-10-06T02:59:32+5:302014-10-06T02:59:32+5:30

दोष वृत्तीचा असतो की व्यवस्थेचा? काही लोकांना दोष वृत्तीचा वाटतो, तर काहींना व्यवस्थेचा. विचार करण्याच्या या दोन पद्धती आहेत

Cleanliness without prosperity is impossible | समृद्धीशिवाय स्वच्छता अशक्य

समृद्धीशिवाय स्वच्छता अशक्य

Next

अमर हबीब - 

दोष वृत्तीचा असतो की व्यवस्थेचा? काही लोकांना दोष वृत्तीचा वाटतो, तर काहींना व्यवस्थेचा. विचार करण्याच्या या दोन पद्धती आहेत. वृत्तीला दोष देणे तुलनेने सोपे असते. व्यवस्थेचा दोष मात्र सिद्ध करून दाखवावा लागतो. विचारकर्मात आळशी लोक सामान्यपणे वृत्तीला दोष देऊन मोकळे होतात. जुन्या डॉक्टरांकडे जसे सर्व रोगांवर एकच लाल औषध असायचे त्याच प्रमाणे ‘मानसिकता बदलली पाहिजे’ हाच एकमेव तोडगा त्यांच्याकडे असतो. संस्काराचे बोर्ड लावून फिरणाऱ्या बहुतेक ढकल गाड्या या पंथाच्या असतात.
स्वच्छतेचेच घ्या ना. काही लोकांना वाटते, की भारतीय लोकांना अस्वच्छ राहण्याची खोड आहे. वृत्ती बदलल्याशिवाय ही सवय जाणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाचे आंदोलन सुरू झाले पाहिजे. मी त्यांना विचारले, हेच लोक युरोपात गेल्यावर नीट कसे काय वागतात? वृत्तीचाच जर प्रश्न असता, तर त्यांनी तेथे गेल्यावरही असेच वागायला पाहिजे. ते तसे का वागत नाहीत? या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर नसते. फार लांब कशाला? गावाकडे असताना बस धरायला गडबड करणारी माणसे मुंबईला गेल्यावर रांगेत उभी राहतात. बसच्या रांगेत शिस्तीत उभी राहणारी तीच माणसे लोकल पकडायची असते तेव्हा कोणतीच शिस्त पाळीत नाहीत. अर्थ एवढाच, की परिस्थिती बदलली तर माणसांचे वर्तनही बदलू शकते.
एखाद्या माणसाच्या वर्तनाचा प्रश्न असेल, तर तो वृत्तीशी निगडित असू शकतो. हजारो, लाखो नव्हे, करोडो लोकांच्या वर्तनाची समस्या निर्माण झाली असेल, तर त्याचा दोष व्यवस्थेतच शोधला पाहिजे. सदोष व्यवस्था कायम ठेवून तुम्ही वर्तन सुधारण्याची अपेक्षा करणे निरर्थक ठरते.
अस्वच्छता कोठे असते? जगातील सर्व गरीब देशांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येते. युरोप अमेरिकेत म्हणे कायम थंडी असते. तेथे घाण झाली, तर जंतूच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. तेथे पडलेला बेडका चार-चार दिवस वाळत नाही, असे म्हणतात. उष्ण प्रदेशात स्वच्छतेचे बरेच काम सूर्यप्रकाश करून टाकतो. थंड प्रदेशात स्वच्छतेचा जेवढा कटाक्ष पाळला जातो तेवढा उष्ण प्रदेशात नाही.
आपल्या अवतीभोवती पाहिले तरी आपल्या लक्षात येईल, की कॉलनीज तुलनेने बऱ्या असतात. झोपडपट्ट्यांमध्ये मात्र घाण असते. समृद्धीबरोबर स्वच्छता टिकवण्याची शक्ती येते. विमानतळावर सार्वजनिक शौचालय असते, तसे बस स्टँडवरही असते. पंचतारांकित हॉटेलमध्ये असते तसे झोपडपट्टीतही असते. दोघांची अवस्था मात्र दोन टोकांची असते. बसस्टँड आणि झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक शौचालयात घाणच घाण. विमानतळ आणि पंचतारांकित हॉटेलात मात्र चकाचक. त्याचे कारण पंचतारांकित हॉटेलात जाणारे आणि विमानाने प्रवास करणारे लोक फार सुसंस्कृत असतात असा होत नाही, तसेच बसने प्रवास करणारे आणि कच्या घरांत राहणारे लोक असंस्कृत असतात, असेही नव्हे. या दोन्हीत फरक ऐपतीचा असतो. संरचना सांभाळण्यासाठी ऐपत लागते. ती नसली की घाण पसरते.
पोरगा प्राध्यापकीच्या नोकरीला लागला की टापटीप राहतो. गदड कामे करून जेमतेम उदरनिर्वाह करणारा असला, तर मात्र कसाही राहतो. हे आपण वारंवार अनुभवले आहे. मला वाटते समृद्धी आणि स्वच्छता ही गाडीची दोन चाके आहेत. एक मागे राहिला, तर दुसराही मागे राहतो. एका बाजूला दारिद्य्राचे निर्मूलन व दुसऱ्या बाजूला स्वच्छतेचा आग्रह समजून घेता येतोल पण दारिद्य्राला कायम ठेवून स्वच्छतेचा आग्रह म्हणजे वाळूवर पडलेले पाणी. आपल्या महाराष्ट्रात गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छता अभियान झाले त्यासुमारास मी मुंबईला गेलो होतो. नरिमन पॉइंटवर फिरताना मला स्वच्छ रस्ते दिसले. रस्त्यात तोंड पाहून भांग पाडावा एवढे चकाचक. मला वाटले, येथे राहणाऱ्या मंत्र्यांच्या बायका, उच्च अधिकाऱ्यांच्या मिसेस वगैरे सकाळी उठून सगळा रस्ता झाडत असतील. मी चौकशी केली तेव्हा माझा मित्र म्हणाला, ‘तसे नाहीये. व्हीआयपी भागाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे स्वतंत्र स्वच्छता स्क्वॉड आहे.’ मी म्हणालो, ‘असे स्क्वॉड आमच्या गावासाठी का नियुक्त करीत नाहीत. शेतकऱ्यांच्या बायांनी सकाळी उठून शेण काढायचे. गोठा साफ करायचा. घरची कामे करायची. सरपण आणायचे. पाणी भरायचे. धुणी धुवायची. ही सगळी कामे असताना आणखी गाव सफाईचे काम त्यांच्यावर का टाकायचे? तसे पाहिले तर या मोठ्या लोकांच्या बायकांना फारशी कामे नसतात. त्यांनी फिटनेससाठी का होईना ती करावीत. तेथे मात्र तुम्ही स्क्वॉड नेमता. अजबच प्रकार आहे.’
२ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली व २०१९ पर्यंत भारत स्वच्छ करण्याचा संकल्प केला. त्याचे स्वागत करायला हवे. परिसर स्वच्छतेतून मन स्वच्छता आणि विचार स्वच्छतेकडे आपली वाटचाल व्हावी, ही अपेक्षा आहे. ती पूर्ण झाली, तर कदाचित समृद्धी आणि स्वच्छतेचे नाते आपल्याला कळू शकेल.

Web Title: Cleanliness without prosperity is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.