आधी ‘हा’ कचरा साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:14 AM2018-02-28T00:14:45+5:302018-02-28T00:14:45+5:30

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

 Clear the 'this' garbage! | आधी ‘हा’ कचरा साफ करा!

आधी ‘हा’ कचरा साफ करा!

googlenewsNext

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. याचा अर्थ मनपाला सेंच्युरी मारून वर आणखी काही धावा काढाव्या लागणार आहेत. आजची शहराची स्थिती पाहू जाता हे आव्हान नजीकच्या काळात पूर्ण होईल अशी आशा बाळगणे वेडेपणाचे ठरेल. कारण मोहीम यशस्वी करतो म्हटले तर मनपाला युद्धपातळीवर काम तर करावेच लागेल शिवाय नागरिकांचा १०० टक्के सहभागही त्यात घ्यावा लागणार आहे. केवळ प्रचंड पैसा ओतून एकट्या प्रशासकीय पातळीवर हे आव्हान पेलणे शक्य नाही. यात लोकसहभाग किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर स्वच्छ असावे असेच वाटते. पण आपल्या घरातला कचरा शेजारच्या अंगणात टाकण्याची वाईट खोड आम्हाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही. प्रशासकीय पातळीवर महापालिकेने अनेक योजना हाती घेतल्या आहे. पण सर्वच योजना सामुदायिक जबाबदारीतून पार पाडतो म्हटले तर त्यात कुठेकुठे ढिलाई होण्याची शक्यता असते. यासाठी व्यक्तिगत पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असते. शहराच्या काही भागांत चांगले काम सुरू आहे. तर काही भाग विकासापासून कोसो दूर आहेत, असे जे आज चित्र दिसते त्यातून त्या त्या भागातील अधिकारी, नगरसेवक कसे काम करतात हे दिसून येते. तेव्हा सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना त्यांच्या भागांतील विकासकामांबाबत व्यक्तीश: जबाबदार धरले तर शहराचा समतोल विकास शक्य आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हे कचºयाचे मुख्य स्रोत आहे. आज शहरातील बहुसंख्य भागातील फुटपाथवर अतिक्रमण दिसून येते. मिसळ, पावभाजीचे ठेले, चहाच्या टपºया, पान गुटख्याची दुकाने ही जास्तीत जास्त कचरा निर्माण करणारी ठिकाणे आहेत. अतिक्रमणविरोधी पथक कधीकाळी कारवाई करते, पण सकाळी कारवाई झाली की दुपारी ‘जैसे थे’ होते. प्रशासनातील काही लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय अतिक्रमण करणारे एवढी हिंमत करू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी बांधकाम चालू असते. त्याचे सर्व साहित्य रस्त्यावरच विखुरले असते. पावसाळ्यात तेथे पाणी साचून घाण पसरते. याविरुद्ध कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण येथे कायद्याचे भय आहे कुणाला? ‘काय द्यायचे’ तेवढे बोला म्हणून मामला रफादफा केला जातो. तेव्हा ही सर्व साफसफाई झाल्याशिवाय स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. आणखी एक, ओला कचरा, सुका कचरा. मग त्यासाठी कोणत्या कुंड्या वापरायच्या यावर काथ्याकूट न करता आणि हा मुद्दा प्रतिष्ठेचाही न करता शहराची ‘कचराकोंडी’ फोडता आली तर पहिल्या २० शहरांत नागपूरला आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे असे मानता येईल.

Web Title:  Clear the 'this' garbage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.