चतुर फडणवीस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:20 AM2018-07-24T04:20:12+5:302018-07-24T04:21:58+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत पांडुरंगाच्या महापूजेचा राज्याचा मुख्यमंत्री व प्रमुख म्हणून मिळणारा मान हा अप्रूपाचा आणि आनंदाचाच ! चौथ्यावेळी त्या आनंदाचा मानकरी ठरण्याच्या संधीवर पाणी सोडण्याचा निर्णय स्वत:च घेण्याची वेळ मुख्यमंत्री फडणवीसांवर आली.
नाकळे ते कळे, कळे ते नाकळे । वळे ते नावळे गुरूविणे ।।
निर्गुण पावले सगुणी भजतां । विकल्प धरिता जिव्हा झडे ।।
बहुरूपी धरी संन्याशाचा वेष । पाहोनी तयास धन देती ।।
संन्याशाला दिले नाही बहुरूपीयाला । सगुणी भजला तेथें पावें ।।
अद्वैताचा खेळ दिसें गुणागुणी । एका जनार्दनी ओळखिले ।।
संत जनार्दनांच्या वरील अभंगाचा सार लीलया आपल्या कृतीत आणण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आषाढी एकादशीदिनी लाखो वैष्णवांच्या साथीने विठुरायाची महापूजा बांधण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. यावेळी आषाढी एकादशीनिमित्तची पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्र्यांनी आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्रद्धेने बांधली. ‘काय घ्यावे व काय त्यागावे’ याचे मर्म सांगून भक्तिभावात आनंदरूप होण्याचा कानमंत्र वरील अभंगाचा अर्थ सांगतो. राज्याचे आणि विशेषत: पंढरपुरात दाखल झालेल्या बारा लाखांहून अधिक वारकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी आपला पंढरपूर दौरा रद्द केला. आम्ही त्या निर्णयाचे स्वागत करतो. खरे तर, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत पांडुरंगाच्या महापूजेचा राज्याचा मुख्यमंत्री व प्रमुख म्हणून मिळणारा मान हा अप्रूपाचा आणि आनंदाचाच ! चौथ्यावेळी त्या आनंदाचा मानकरी ठरण्याच्या संधीवर पाणी सोडण्याचा निर्णय स्वत:च घेण्याची वेळ मुख्यमंत्री फडणवीसांवर आली. सध्या विविध जातींच्या आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. एखादा बहुल समाज आपल्या वेदना आणि मागण्या राज्यकर्त्यांपुढे मांडण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरूनही शिस्त आणि शांततेचा संदेश जगाला देऊ शकतो, याचे उदाहरण सकल मराठा समाजाने उभ्या विश्वापुढे ठेवले. ‘मूकमोर्चा’ हे शिस्तबद्ध, संयमी आणि शिस्तप्रिय तरीही जगाचे झोप उडविणारे हत्यार ठरू शकते, हेही मराठा क्रांती मोर्चाने दाखवून दिले होते. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या काही संघटना आक्रमक बनल्या व त्यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापूजेपासून रोखण्याचा निर्णय जाहीर केला होता. अपेक्षेप्रमाणे त्या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले. आंदोलकांनी पहिल्या टप्प्यात प्रशासनातील अधिकाºयांना निवेदने दिली. त्यानंतर ठिय्या व रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. मराठा आरक्षण आणि त्यासंदर्भातील शासकीय व न्यायालयीन प्रक्रिया यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी शासनाची भूमिका विविध व्यासपीठावरून मांडलेली आहे. राज्य शासनाने ७२००० जागांवरील नोकरभरतीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कुठल्याही समाजाला आपल्यासाठी असलेल्या आरक्षणाची जाणीव होणे नैसर्गिकच आहे. पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार असो वा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस सरकार असो, मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे धोरण दोन्ही सरकारांनी स्वीकारलेलेच आहे. आता मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात नोकरभरती करीत असताना केवळ न्यायालयीन प्रक्रियेच्या मुद्यावरून आपल्या समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये या काळजीनेच मराठा समाज व त्या समाजाच्या विविध संघटनांचे नेते अस्वस्थ बनले. खरे तर, नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बॅकलॉग’ या शीर्षाखाली मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाला सुरक्षित ठेवूनच नोकरभरती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तरीही मराठा समाजाच्या काही संघटनांनी सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली. त्याच भूमिकेतून मुख्यमंत्र्यांची आषाढी महापूजा रोखण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आंदोलनाची तीव्रता आणि लाखो वारकºयांची सुरक्षितता या दोन्हींचा विचार करून शेवटच्या क्षणी अत्यंत चतुराईने पंढरपूर दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. आषाढी वारीवर चिंतेचे सावट आणणाºया वातावरणावर त्यांनी आपल्या चतुर निर्णयाने पडदा टाकला. त्याचे वारकºयांनीही स्वागतच केले.