हवामानबदलांएवढे संकट सुपरबग्जमुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:24 AM2020-02-15T05:24:25+5:302020-02-15T05:25:36+5:30

गेल्या २६ वर्षांत मानवांचा निसर्गातील हस्तक्षेप प्रचंड वाढला.

The climate change crisis like caused by superbugs | हवामानबदलांएवढे संकट सुपरबग्जमुळे

हवामानबदलांएवढे संकट सुपरबग्जमुळे

Next

गेल्या २६ वर्षांत मानवांचा निसर्गातील हस्तक्षेप प्रचंड वाढला. म्हणून पर्यावरणीय विनाश याआधी कधीही नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर जगभर घडत आहे. या ग्रहावरील जीवन कायमचे संपुष्टात येण्याचा धोका मानवजात व सर्व प्रजातींपुढे उभा राहिला आहे. सुमारे एक हजार वैज्ञानिकांनी १९५०नंतरच्या कालखंडास अँथ्रोपोसिन असे भूशास्त्रीय नाव दिले आहे. मागील उल्लेखनीय घटना पाहता, लक्षात येते की, रोमानियातील एका प्रसूतिगृहातील ३९ अर्भकांना औषधांना दाद न देणारा जंतुसंसर्ग (सुपरबग्ज) झाला होता. या रुग्णालयात ११ कर्मचारी या जंतूंचे वाहक होते. इस्रायलींच्या गोळीबारांत जखमी झालेल्या हजारो पॅलेस्टिनींच्या जखमांमध्ये अँटिबायोटिकांना (जैव प्रतिबंधकांना) दाद देऊ शकणार नाहीत अशा जंतूंचा संसर्ग झाला होता. भारतातील रुग्णालयांत नव्या जंतूंचा संसर्ग झालेल्या रोगग्रस्तांपैकी निम्मे मरण पावले. हे जंतू बहुअँटिबायोटिकांना दाद न देणारे व वेगाने व्हायरल होणारे होते.


आता असा एकही दिवस जात नाही की, सर्वांत शक्तिशाली अँटिबायोटिक औषधांना दाद देऊ शकत नाहीत अशा उपसर्गामुळे वा आजाराने कोणी बाधित झाले नाहीत. औषधांना दाद न देणाऱ्या आजारांमुळे जागतिक आरोग्य व्यवस्थेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यास औषध उद्योग आणि आरोग्य व्यवस्थांनी माणसांपेक्षा नफेखोरीला अधिक प्राधान्य देणे कारणीभूत आहे. म्हणूनच हवामानातील घातक बदलांच्या बरोबरीनेच अँथ्रोपोसिनची व्याख्या ‘औषधांनी बरे होऊ शकणार नाही अशा आजाराचा काळ’ अशीही करता येईल. बॅक्टेरिया, व्हायरस, काही फंगस या अतिसूक्ष्म जीवाणूंना एकत्रितपणे मायक्रोब वा मायक्रो आर गँझम असे म्हणतात. बॅक्टेरिया एकपेशीय जीवाणू आहेत. त्यांना सुरचित केंद्र नसते. पँथोजेन असे बॅक्टेरिया आहेत की ज्यामुळे रोग होतो. व्हायरस असे अतिसूक्ष्म परजीवी जीवाणू आहेत की, जे जिवंत पेशींना बाधित करूनच वाढू शकतात वा पुनर्उत्पादन करू शकतात. अँटिमायक्रोबियल म्हणजे असे सर्व रासायनिक पदार्थ, की जे मायक्रोबवर हल्ला करू शकतात. मात्र अँटिबायोटिक म्हणजे असे सर्व रासायनिक औषधी पदार्थ की, जे बॅक्टेरियांवर हल्ला करतात.


अनेक रोगांमुळे मानवाचे आयुष्य गेली हजारो वर्षे खूप कमी झाले होते. म्हणून अँटिबायोटिक्सद्वारे या रोगांवर विजय प्राप्त केला होता. यामुळे माणसाचे निधन व्हायचे अशा जखमा वा संसर्ग काही तासांतच बरे करणे शक्य झाले होते. परिणामी असे वाटू लागले की, औषधांचा अंतिम विजय झाला आहे आणि रोगांचा शेवट झाला आहे. पण आता जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केले आहे की, जगासमोर असा मोठा प्रश्न आहे की, आधुनिक औषधांमुळे जी प्रगती प्राप्त केली ती सर्व धोक्यात आली आहे. इंग्लंडच्या सँलि डेविएस या चिफ मेडिकल आॅफिसरने तर या धोक्याचे वर्णन जगातील टिकिंग टाईमबॉम्ब असे केले आहे. हा निसर्गाने आपल्यावर घेतलेला सूडच आहे. आश्चर्यचकित करत असलेल्या औषधांची जादू संपुष्टांत येत आहे.


आता फक्त आधीच्या औषधांमध्ये काही मामुली फरक करण्याचे वा नवीन कॉम्बिनेशन करण्याचे कार्य केले जाते. बहुसंख्य औषध उत्पादकांनी जास्त पैसे मिळवून देणाºया अन्य औषधांचेच संशोधन सुरू केले आहे. मधल्या काळात विषाणूंनी औषधांना दाद न देणे अधिकच वेगाने सुरू राहिले. रोगमुक्त जीवन निर्माण करण्याच्या आश्वासनाच्या जागी उलट अधिकच तीव्रता धारण करत असलेल्या विषाणूंबाबत धोक्याच्या सूचना देणे अस्तित्वात आले. ज्या औषधांमुळे जीवदान देण्यात येणार होते त्याच औषधांमुळे या धोकादायक विषाणूंची निर्मिती झाली.


औषधांना प्रतिसाद देत नसलेल्या रोगांमुळे अमेरिकेत दरवर्षी सुमारे एक लाख ६२ हजार माणसे मरण पावतात. हे मरण्याचे तिसरे मोठे कारण ठरले आहे. आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेत तर यापेक्षा अधिक माणसे या कारणामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. १९६० मध्ये मेथेसिलिन हे औषध स्टाफिलोकोकस या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी उत्पादित केले गेले. पण एका वर्षातच ब्रिटनमधील रुग्णालयात या विषाणूंनी उत्क्रांती केली आणि मेथिसिलिन या औषधाला प्रतिसाद देणे (म्हणजे मरणे) अशक्य केले. हा उत्क्रांतीत विषाणू लवकरच प्रथम युरोपात व नंतर अमेरिकेत पोहोचला. अनेक अँटिबायोटिक औषधांना दाद न देण्याचे कौशल्य विषाणूंनी प्राप्त केले. १९९०च्या दशकात हा विषाणू सर्वच देशांत पोहोचला व सर्वांत जास्त विषारी सुपरबग बनला. या विषाणूंमुळे अन्य रोगांपेक्षा जास्त माणसे अमेरिकेत दरवर्षी मरत होती. ब्रिटिश सरकारने जाहीरपणे सांगितले की, हे असेच सुरू राहिले तर २०५०पर्यंत या अँटिबायोटिक औषधांनी मरत नसलेल्या विषाणूंमुळे जगातील सुमारे एक कोटी माणसे दरवर्षी मरतील. म्हणजेच दर तीन सेकंदाला एक जणाचा मृत्यू होईल. हा दर कर्करोग आणि मधुमेहाने मरत असलेल्यांपेक्षाही जास्त असेल.


हे भयंकर तर आहेच. पण अनेक अन्य उपाय करणेही अशक्य होईल. कारण त्यासाठी आपले शरीर विषाणूंविरुद्ध प्रतिकारक्षम असणे आवश्यक असते. ओपन हार्ट सर्जरी, अवयवबदल सर्जरी, गुडघाबदल सर्जरीवेळी वातावरण विषाणुमुक्त असणे आवश्यक असते. हवामानातील हानिकारक बदलांएवढे मोठे संकट या सुपरबग्जमुळे मानवजातीसमोेर उभे आहे. निसर्गात मानवाने ढवळाढवळ करण्याचे टाळणे आता अत्यावश्यक आहे.

- शिरीष मेढी
पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: The climate change crisis like caused by superbugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.