समदं घड्याळ आता तुमचंच !

By सचिन जवळकोटे | Published: September 15, 2019 08:57 AM2019-09-15T08:57:59+5:302019-09-15T09:00:55+5:30

लगाव बत्ती..

The clock is now yours! | समदं घड्याळ आता तुमचंच !

समदं घड्याळ आता तुमचंच !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे


प्रिय राजन मालक...

कधी नव्हे ते प्रथमच अनगरच्या वाड्याला जिल्ह्यात भलतंच महत्त्व आलंय. ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्या मोबाईलमध्ये जिल्ह्यातल्या एकाच नेत्याचा नंबर आता शिल्लक राहिलाय.. अन् तो म्हणजे केवळ तुमचाच. लय भारी नां मालक? आता तुम्हाला पक्षात कुणी स्पर्धकच नाही. संमदं घड्याळ तुमचंच.. संमदा जिल्हाबी तुमचाच. वावरी वावरऽऽ

 खरंतर, पक्षांतराच्या वादळात सध्या चर्चा फक्त ‘कमळ-धनुष्या’चीच. तरीही आज आम्ही पामर तुमची आठवण काढतोय. लोकं म्हणतील, कुणी उसाच्या फडात वाळकं हुडकत बसतंय काय? पण काय झालं मालकऽऽ अनगर अन् बारा वाड्यांमधल्या एका कार्यकर्त्याच्या स्वप्नात काल म्हणे तुम्ही आलात. दुर्बिणीनं संमदा जिल्हा तुम्ही न्याहाळत होता. फक्त सोलापूर रेल्वे स्टेशनवरचं मोठ्ठं घड्याळ सोडलं तर बाकी साºयाच ठिकाणी ‘भगव्याचा गवगवा’. एवढ्यात ‘बाळराजे’ पायातल्या करकरीत कोल्हापुरी चपला वाजवत तिथं आले. नाकावर नाजूकसा चष्मा होताच. ‘पप्पाऽऽ मी माढ्यातून उभारू की बार्शीतून?’ असा सवाल त्यांनी करताच तिकडून ‘राणां’चाही आवाज आला, ‘दादाऽऽ बार्शीत मी इंटरेस्टेड. तुम्ही वाटल्यास सांगोला किंवा करमाळ्यात जा’ हे ऐकून तुमचा ऊर भरून आला. आपल्या पोरांनी आता अख्ख्या जिल्ह्यात हुंदडलं तरी पार्टीत कुणी विरोध करणार नाही, या जाणिवेनं छातीही फुलून आली. तुम्ही दोन्ही लाडक्या लेकरांना जवळ बोलावून कानात हळूच एक गुपित सांगितलं, ‘बाळांनोऽऽ आपला मतदारसंघ राखीव म्हणून नाईलाजानं आपण शांत बसलोय. नाही तर ‘नक्षत्राचं देणं’ केव्हाच फिटलं असतं. उगाच इकडं-तिकडं जाऊ नका. दारी येणाºया नवीन इच्छुक पाव्हण्याचं जोरात स्वागत करा. रिकामी ‘खोकी’ उघडून ठेवा. कामाला लागाऽऽ’.


मालकऽऽ आता हे स्वप्न किती खरं... किती खोटं, हे त्या बिच्चाºया कार्यकर्त्यालाच ठाऊक... परंतु केवळ तुमच्यामुळंं ‘पक्षनिष्ठा’ या शब्दावर आमचा विश्वास टिकून राहिला बघा. परवा ‘थोरले काका बारामतीकर’ सोलापुरात येतील, तेव्हा तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. हार-तुºयापासून सारा खर्च कदाचित तुम्हालाच करावा लागेल. कारण, लकी चौकातले ‘मनोहरपंत’ लवकर साधा चहाही पाजत नाही म्हणे लोकांना. मात्र ‘संतोषभाऊ’ रोज हजारो लोकांना चहा पाजतात, हा भाग वेगळा. 
...पण काय हो मालक... थोरल्या ‘काकां’ची सरबराई नेमकी कुठं करणार? ‘दीपकआबां’च्या हक्काच्या कार्यालयात की ‘महेशभाऊं’च्या ‘सिटी हॉटेल’मध्ये?... परंतु तिथंही त्यांचे ‘उस्मानाबादी राणा’ सोडून गेले नां. तरीही टेन्शन नाही म्हणा. कारण, किमान तुमचे ‘राणा’ तर घड्याळासोबतच आहेत की... लगाव बत्ती...

प्रिय विजू मालक...

तुमच्या मतदारसंघातल्या सर्व्हेचं ‘उत्तर’ आलं की नाही अजून? काय मालकऽऽ, ही काय पद्धत असते का हो तुमच्या शिस्तबद्ध पार्टीची? तीनवेळा आमदार, पाच वर्षे मंत्री, तरीही तुमच्या पार्टीला नसावी विजयाची खात्री ? करावी लागली एका खासगी कंपनीला चाचपणी ? ‘तुमच्याशिवाय पर्याय नाही’ असं तुमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय; परंतु तुम्हाला कायमस्वरुपी सक्षम पर्याय देण्यासाठी तुमचीच काही मंडळी ‘मिलिंद वकिलां’च्या घरी रोज ठिय्या मांडू लागलीत, त्याचं काय? जाऊ द्या सोडा. तिकडं अक्कलकोटच्या ‘सिद्धूअण्णां’चं काय करताय? ‘देवेंद्रपंतां’ना भेटण्यासाठी तुमच्याबरोबर ‘नगर’ला येणार होते नां? ‘नगर’वरनं आठवलं, परवा ‘राधाकृष्ण नगरकर’ सोलापुरात आले, तेव्हा त्यांना भेटायला तुम्ही खास विमानतळावर गेला होता. तिथं तुमच्या दोघांची ‘शहाजीं’च्या साक्षीनंच कुजबूजही झाली म्हणे. ‘नगरकरांच्या जावयाला’ तुमच्या पार्टीनं तिकीट दिलं, तर अक्कलकोटमध्ये प्रचार करावाच लागणार, हेही तिथं अनेकांच्या लक्षात आलेलं. कारण, ‘अण्णांचा रिपोर्ट’ निगेटिव्ह पद्धतीनं ‘चंदूदादां’च्या टीमकडं गेलाय.. म्हणूनच की काय, त्यांचा ‘प्रवेश’ वरचेवर लांबत चाललाय. लगाव बत्ती...

प्रिय संजू मामा...

तुम्ही म्हणे नुकतंच बार्शीत होता. ‘राजाभाऊं’शी भेट घेऊन तब्बल तीन तास त्यांच्याशी चर्चा केली. बहुधा तुमच्या दोघांच्या मोबाईलमधलं ‘सुसंस्कृत’ भांडणांचं ते लोकप्रिय रेकॉर्डिंग डिलिट झालं वाटतं ? बाकी ‘रौतां’नी मोठ्या दिलदारपणे तुमचा पाहुणचार केला. चहा पिता-पिता तुम्ही हळूच ‘कमळ किती छानंच नांऽऽ’ म्हणालात. तेव्हा ‘राजाभाऊं’नीही ‘पाहिजे का कमळ.. भेटायचं का देवेंद्रपंतांना?’ असं मोठ्या उत्साहानं विचारलं. तेव्हा ‘निमगाव ते मुंबई... व्हाया बार्शी’ असा प्रवास करायला तुम्हीही तयार झालात. बरं झालं. तुमचा सहा महिन्यांचा वनवास तर संपेल आता... पण एक प्रश्न आम्हाला सतावतोय मामाऽऽ तुमचा प्रश्न ‘राजाभाऊ’ सोडवतील हो... मात्र त्यांचा कोण सोडविणार ? बार्शी नेमकी कुणाला सुटणार? लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: The clock is now yours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.