बंद दरवाजातले मरण...

By admin | Published: June 14, 2017 03:40 AM2017-06-14T03:40:43+5:302017-06-14T03:40:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळख असलेल्या कृतिका चौधरी हिचा मृतदेह अंधेरी येथील तिच्या राहत्या घरी आढळला, आणि पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्री

Closed door ... | बंद दरवाजातले मरण...

बंद दरवाजातले मरण...

Next

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळख असलेल्या कृतिका चौधरी हिचा मृतदेह अंधेरी येथील तिच्या राहत्या घरी आढळला, आणि पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्री हळहळली. या दुर्घटनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतिकाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आणि जेव्हा तिच्या घरातून दर्प बाहेर येऊ लागला तेव्हा कुठे शेजाऱ्यांनी केलेल्या हालचालीनंतर ही घटना समोर आली. दुर्घटनेतील प्रामुख्याने नमूद करण्यासारखा मुद्दा म्हणजे तब्बल दोन ते तीन दिवसांनी ‘बंद दरवाजा असलेल्या फ्लॅट’मधून तिच्या मृत्यूची बातमी आली. अशा अनेक घटना या मायापुरी मुंबापुरीत यापूर्वी घडल्या असून, या प्रत्येक घटनेमागे बदलत असलेले ‘हायफाय कल्चर’ ही तेवढेच जबाबदार आहे. मुंबईसारखा मेगासिटीचे आकर्षण चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीसारख्या महानगरातल्या तरुणाईला; विशेषत: तरुणींना आहे. बॉलिवूडची भुरळ पडल्याने उत्तर भारतातल्या तरुणींचे येथे येण्याचे प्रमाणही वाढले आहे. हरिद्वार येथून झगमगत्या मुंबापुरीत आलेली कृतिका त्यातलीच एक. बॉलिवूडच्या आकर्षणापायी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कामे मिळविण्यासाठी येथे दाखल झालेली तरुणाई पहिल्यांदा मॉडेलिंगच्या प्रेमात पडते किंवा येथे येतानाच त्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा मॉडेलिंग नावाचे करिअर उभे असते. आणि समजा कालांतराने जर यश आले तर ही मंडळी मग छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर झळकतात. मात्र हा पल्ला किंवा हा प्रवास एवढा सोपा नाही. मधल्या काळात ही तरुणाई बॉलिवूडल्या साजेशा अशा वांद्रे, अंधेरी, चार बंगला, बोरीवली, मालाड किंवा पवईसारख्या उच्चभ्रू परिसरात भाड्याने वास्तव्य करतात. साहजिकच इथली संस्कृती ‘चाळ संस्कृती’ नसल्याने आपल्या शेजारी कोण राहते? हे इथल्यापैकी कोणालाच माहीत नसते. आणि माहीत असले तरी एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याची तसदीही हे ‘हायफाय कल्चर’ घेत नाही. परिणामी ‘माणुसकी’ नसलेल्या चार भिंतीच्या फ्लॅटमधले इथले आयुष्य एकलकोंडी होते. कृतिकाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता कुठे सुरू झाली असून, यातून काय समोर यायचे ते येईलच. पण सद्यस्थितीमधले ‘बंद दरवाजे कल्चर’ हेदेखील फोफावत चालले आहे. बॉलिवूड, छोटा पडदा, मोठा पडदा किंवा मॉडेलिंग तत्सम क्षेत्रात बक्कळ पैसा हाती आला की ही तरुणाई व्यसनाधीन होते. कृतिकाच्या मृत्यूला हे निमित्त असले तरीदेखील आईवडिलांपासून कोसो मैलावर झगमगत्या मुंबापुरीत ‘बंद दरवाजातल्या कल्चर’मध्ये वास्तव्य करणाऱ्या तरुणाईला सावरण्याचे कामही तेवढ्याच वेगाने झाले पाहिजे. अन्यथा ‘कृतिका’सारखेच आणखी किती तरी बळी ‘बंद दरवाज्यामागे’ जातच राहतील.

Web Title: Closed door ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.