सिटू या लढाऊ कामगार संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:37 AM2020-05-30T00:37:37+5:302020-05-30T12:32:05+5:30
काही वर्षांनी क्रांतिकारक चळवळीतील दुरुस्तीवादी पोथीनिष्ठ प्रवृत्ती बलवत्तर झाल्या, त्याविरुद्ध काही वर्षे संघटनेंतर्गत वादविवाद झाले.
-अॅड. उध्दव भवलकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सीटु, औरंगाबाद )
भारतामध्ये कामगार चळवळीचे काम सुरू होऊन १०० वर्र्षे होत आहेत. देशातील कामगार वर्गाने स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पुढाकार घेऊन फार मोठे योगदान दिले होते. कामगार लढ्यामुळे अनेक कामगार कायदे निर्माण झाले. कामगार संघटनांना लोकशाही अधिकारही मिळाले. ज्यामुळे खाजगी क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात कामगार संघटना उभ्या राहिल्या. त्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.
काही वर्षांनी क्रांतिकारक चळवळीतील दुरुस्तीवादी पोथीनिष्ठ प्रवृत्ती बलवत्तर झाल्या, त्याविरुद्ध काही वर्षे संघटनेंतर्गत वादविवाद झाले. दुरुस्तीवादी भूमिकेविरुद्ध लढा केल्याशिवाय समाजवादी समाजाच्या स्थापनेकडे कामगार वर्गाला कूच करता येणार नाही म्हणून बी.टी. रणदिवे, ज्योती बसू, पी. राममूर्ती यांच्या पुढाकाराने कोलकाता येथे महाअधिवेशन २८ ते ३० मे १९७० दरम्यान घेतले. चर्चा होऊन लक्ष व उद्देशावर एकमत होऊन ३० मे १९७० रोजी कोलकाता येथील विशाल अशा ब्रिगेड ग्राऊंडवर १० लाख कामगारांच्या रॅलीमध्ये भारतीय ट्रेड युनियन केंद्र (उकळव) सिटूच्या स्थापनेची घोषणा केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून बी.टी. रणदिवे, तर उपाध्यक्ष म्हणून ज्योती बसू आणि महासचिव म्हणून पी. राममूर्ती इतरांची नावे घोषित केली.
उत्पादनाच्या साधनावर समाजाची मालकी निर्माण करून समाजवादी व्यवस्था निर्माण केल्याशिवाय कामगार वर्गाची सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्तता होणार नाही, या ध्येयासाठी सिटूची स्थापना झाली. कामगार वर्गाच्या आर्थिक व सामाजिक अधिकारासाठी स्वातंत्र्य व लोकशाही अधिकारासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली. कामगाराची वेतनवाढ, चांगल्या सेवा शर्ती आणि कामाचे तास कमी व कामगारांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, रोजगाराची सुरक्षा, कामाचा अधिकार आणि बेराजगारीविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेऊन वर्गसंघर्षाची तयारी ही भूमिका सिटूने जाहीर केली.
सामाजिक सुरक्षा, विधवा माता, बच्चे यांच्यासाठी पेन्शन, समान कामास समान वेतन, स्त्री-पुरुष, छूत-अछूत आणि धर्माधारित पक्षपात संपविण्यासाठी, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी संघर्ष केला जाईल. बडे उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, युनियन बनविण्याचा अधिकार, जनतेच्या लोकशाही मागण्यांसाठी सिटू सहकार्य करील. हे उद्देश घेऊन सिटू या लढाऊ कामगार संघटनेची स्थापना झाली.
भांडवलदार वर्गाच्या हल्ल्यामुळे जगभरात असंतोष वाढत आहे. सत्तेत आल्यापासून भाजपने नवउदारवादी बदलांची प्रक्रिया जास्तच तीव्र केली आहे. मालक वर्गाला मदत आणि कामगार वर्गाचे शोषण करण्याचे भाजपचे धोरण चालू आहे. म्हणून लाखो कामगारांच्या हातचे काम गेले आहे. बेरोजगारीमध्ये प्रचंड भर पडली आहे. त्यामुळे कामगारांच्या रोजी रोटीचा आणि लोकशाही अधिकाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी आणि तात्पुरती भरती केलेल्या कामगारांकडून उत्पादन काढले जात आहे. कायम कामगारांच्या नोकरीची हमी राहिली नाही. बी.ई. झालेले इंजिनिअर निमद्वारे किंवा कंत्राटदाराकडे १० हजार रुपये महिन्याने काम करीत आहेत, अशी वाईट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात तर मोदी सरकारच्या सहमतीने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजप राज्य सरकारांनी कामगारांचे कायदे तीन वर्षांसाठी निलंबित केले.
या सर्व कामगारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नासाठी कामगारवर्गीय चळवळ संघटित करण्यासाठी सिटू देशभर पुढाकार घेऊन कामगारांचे लढे संघटित करीत आहे. इतर कामगार संघटनांनाही बरोबर घेऊन संयुक्त बलशाली कामगार चळवळ उभी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे. संघटित व सार्वजनिक क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि भांडवली उत्पादनव्यवस्थेची जीवन वाहिनी आणि कणा आहे. कामगार वर्गातील सर्वांत आधुनिक विभाग त्यात काम करतो. त्यांच्याशिवाय भांडवली व्यवस्थेच्या विरोधातील प्रभावी लढ्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून या क्षेत्रात सिटूने आपले पाय खोलवर रोवले आहेत. सिटू एक देशव्यापी शक्तिशाली संघटना म्हणून विकसित करीत आहे. प्रत्येक तीन वर्षांनी होणाऱ्या सिटूच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून आणि सिटूुच्या निर्णय घेणाऱ्या कमिट्यांवर निवडून आलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. दलित, अदिवासी आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न कामगार संघटनांच्या मंचावरून उचलण्याबाबत सिटूने पुढाकार घेतला आहे.
३० मे २०२० रोजी सिटूच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता ३० मे २०२० रोजी कोलकाता येथील विशाल ब्रिगेड मैदानावर १५ लाखांच्या रॅलीने करण्यात येणार होती. लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम रद्द झाला. तरीही सिटू देशभर आपल्या तेजस्वी चळवळीचा इतिहास पुढे यापेक्षा जोमाने चालू ठेवेल.
एकजूट आणि संघर्ष
‘मी सिटूचा आणि सिटू माझी
आम्ही कामगार आहोत, गुलाम नाही..!
आमच्या हक्काचे रक्षण आम्हीच करू..!
आम्ही संपत्ती निर्माण करतो, श्रमाला प्रतिष्ठा हवी..!’