मेघ नाचवी मयुरे

By admin | Published: July 27, 2016 03:47 AM2016-07-27T03:47:02+5:302016-07-27T03:47:02+5:30

महान चित्रकार दिनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय ‘पॉल क्ली’ म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर कोलते यांचे व्याख्यान ऐकण्याचा

Cloud Dancing Mayur | मेघ नाचवी मयुरे

मेघ नाचवी मयुरे

Next

- डॉ.गोविंद काळे

महान चित्रकार दिनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय ‘पॉल क्ली’ म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर कोलते यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला़ दलालांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही पणजी येथे त्यांच्याच हस्ते झाले़
कोलते सरांचे कलेवरील विचार ऐकणे म्हणजे एक आनंदानुभूती़ गोव्यात कार्यक्रम असूनही कोलते मराठीतून बोलले हे विशेष़ कोलतेंचे विचार परखड आणि धक्का देणारे असतात़ लोकाना काय वाटते, त्यापेक्षा चित्र पाहून मला कोणती अनुभूती येते ते मांडण्याचे स्वातंत्र्य घेऊन स्वतंत्रपणे भाष्य करतात़ त्यामागे तार्किक संगती आणि अभ्यास असतो़ तडजोड नसते. एक प्रकारचे शुद्ध आत्मपरीक्षण असते़ कला जगतात यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे़
प्रदर्शनातील एक कलाकृती पाहून शेजारी उभ्या असलेल्या त्या कलाकृतीच्या चित्रकर्त्याला ते बारकावे समजावून सांगू लागले़ चित्रातील रंगसंगती आणि आकार उत्तम आहे, परंतु आकाराला बाह्यरेषा काढल्यामुळे त्यातील उत्स्फूर्तता आणि सहजता हरवली आहे़ चित्राला बंदिस्तपणा येऊन सौंदर्यहानी झाली आहे़ त्यांचे म्हणणे चित्रकाराला मनोमन पटले़ चित्र आतून आले पाहिजे़ त्यामध्ये सहजता असली पाहिजे़ सहजतेत सौंदर्य आहे़ काढण्यापेक्षा चित्र झाले पाहिजे़ काहीही काढणे म्हणजे अमूर्त कला (अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट) नव्हे़ कोलतेंचे शब्द मी मनाने टिपून घेत होतो़
कोलते चित्रकलेचा अर्थ समजावून सांगत नव्हते तर परम् अर्थ (परमार्थ) बोलत होते़ सारे जग अर्थाच्या पाठीमागे धावत असताना आणि कलेला बाजारू स्वरूप येत असताना त्यातील परम्अर्थ (परमार्थ) कोणाच्या लक्षात येणार? परमार्थाचे मूळ तर आपल्याच देशात आहे़ ज्ञानदेव लिहिते झाले -
‘बोली अरूपाचे रूप दावीन
अतिंद्रिय भोगवीन इंद्रियाकरवी’
अतिंद्रिय असणारे इंद्रियगम्य करीऩ केवढा मोठा आत्मविश्वास आणि अधिकाऱ अरूपाचे रूप दाखविणे अमूर्ताला साक्षात दाखविणे, साकार करणे़ केवढा गहन आणि परम् अर्थ भरला आहे़ तुकाराम महाराज मात्र साध्या शब्दातून साक्षात्कार घडवितात़
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी
धरिताही परि आवरेना
तुका म्हणे मेघ वाचवी मयुरे
लपविता खरे येत नाही’
आकाशातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोर नृत्य करू लागतात़ त्यांना नृत्य करायला कोण बरे सांगत असेल? त्यात आहे सहजता़ मारून मुटकून अथवा बळजबरीने करणे नाही़ जे आत आहे तेच बाहेर येते़ त्यातच आनंद आहे़ त्याला सायास नको़ सायासाविण व्यक्त होणे म्हणजेच अंतरात्म्याचा निसर्गदत्त हुंकाऱ

Web Title: Cloud Dancing Mayur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.