...म्हणून संजय राऊत पुन्हा झाले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; जाणून घ्या, उद्धव ठाकरेंचं राज'कारण'
By यदू जोशी | Published: March 31, 2021 03:31 PM2021-03-31T15:31:46+5:302021-03-31T15:46:07+5:30
CM Uddhav Thackeray appoints Sanjay Raut as Chief Spokesperson of Shiv Sena: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना देखील संजय राऊत यांनी 'सामना'मधून आणि बाहेरही जी-जी भूमिका मांडली, ती कधीही शिवसेनेने फेटाळली नाही, अमान्य केलेली नाही
- यदु जोशी
शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे देखील पक्षाचे मुख्य प्रवक्ते असतील.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन ध्रुवांना एकत्र आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. शरद पवार यांच्याशी त्यांचे असलेले चांगले संबंध सर्वांनाच ठाऊक आहेत.
संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; भास्कर जाधव यांचाही समावेश
महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये सध्या तणावाचं वातावरण दिसून येतंय. विशेषतः सचिन वाझे प्रकरण असो किंवा एकूण तीन पक्षांमधील समन्वय असो, कुठेतरी काहीतरी कमतरता निश्चितपणे जाणवते. त्यातच संजय राऊत यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला आपल्या लेखामधून सुनावलं, काँग्रेसच्या नेतृत्वाला देखील कानपिचक्या दिल्या, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी ''Accidental Home Minister'' म्हणून उल्लेख केला आणि हे करताना राष्ट्रवादीला देखील त्यांनी टोले मारले. या सगळ्या 'रोखठोक' वक्तव्यांची अर्थातच तीव्र प्रतिक्रिया उमटली.
मिठाच्या खड्यावरुन संजय राऊतांचे बाण, अजित पवारांना कानपिचक्या
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत की राष्ट्रवादीचे सल्लागार?, असा टोमणा मारला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील राऊत यांना खडे बोल सुनावले. महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीने राऊत यांच्या वक्तव्यावरून आणि लिखाणावरून तणावाचं वातावरण असल्यामुळे आता राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होईल की नाही, याबद्दल दोन मतं होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. राऊत ज्या आक्रमक पद्धतीने पक्षाची भूमिका मांडतात आणि नेतृत्वाचा बचाव करतात, ती पद्धत आणि आक्रमक पवित्रा पक्षाला मान्य आहे, यावरच नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं आहे.
'संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून जेव्हा एखादी भूमिका अग्रलेखाच्या माध्यमातून वा लेखाच्या माध्यमातून मांडली जायची, त्यावेळी हे संजय राऊत यांचे मत आहे; बाळासाहेबांचे नाही, असा तर्क काही पत्रपंडित लावत. मात्र, बाळासाहेबांच्या काळापासून आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना देखील संजय राऊत यांनी 'सामना'मधून आणि बाहेरही जी-जी भूमिका मांडली, ती कधीही शिवसेनेने फेटाळली नाही, अमान्य केलेली नाही किंवा त्या भूमिकेची पक्ष असहमत असल्याचेही समोर आले नाही. याचा अर्थ असा की, उद्धव ठाकरे यांनी नेटाने राज्याचा कारभार करावा, पक्ष चालवावा आणि पक्षावर जे काही आरोप होतील, महाविकास आघाडी सरकारमध्ये जो काही मेसेज शिवसेनेकडून द्यायचा आहे, त्याची जबाबदारी पद्धतशीरपणे संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली. या वादात स्वतः पडण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या खांद्यावर बंदुक ठेवली. ती बंदुक राऊत यांनी अत्यंत निष्ठेने पेलली आणि अचूक नेम साधत; प्रसंगी आपल्या मित्रपक्षांवर आणि भाजपावर अचूक गोळीबार करण्यात कामी आणली. त्याचीच बक्षिसी म्हणून राऊत यांना पुन्हा एकदा पक्षाचे मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
“सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी
संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत. दिल्लीतही पक्षाची भूमिका ते वाहिन्यांवर मांडत असतात. शिवाय हाताशी शिवसेनेचं मुखपत्र आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे 'सामना'च्या संपादक झाल्यानंतर आता सामनाचा चेहरा पूर्वीसारखा आक्रमक राहील की बदलेल, याबद्दल उत्सुकता होती. पण, शिवसेना सरकारमध्ये आल्यानंतरही, प्रसंगी ते मुखपत्रातून मित्रपक्षांना सुनावण्याचं काम करतात. याचा अर्थ शिवसेनेत राज्याच्या-पक्षाच्या कारभाराची सगळी सूत्रं उद्धव ठाकरेंकडे असली, तरी पक्षाची भूमिका आणि राजकीयदृष्ट्या पक्षाला जे साध्य करायचं आहे ते संजय राऊत यांच्या माध्यमातून मांडत राहायचं अशी व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आलीय असं दिसतं.
संजय राऊत यांचे मुख्य प्रवक्तेपद कायम ठेवले नसते, तर एक वेगळा मेसेज गेला असता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राऊत यांच्या वक्तव्यांबद्दल आणि लिखाणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांना हटवलं असतं तर शिवसेना कुठेतरी दबावाखाली आली आणि राऊत यांना हटवण्यात आलं, अशी चर्चा निश्चित झाली असती. भाजपासोबत शिवसेना सत्तेत होती, तेव्हाही शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत असे. ही टीका करण्यासाठीचा चेहरा संजय राऊतच होते. कारण, भाजपासोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे प्रत्येकवेळी भाजपाविरोधात बोलले असते, तर ते योग्य दिसलं नसतं. त्यामुळे दरवेळी ही जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे गेली आणि त्यांनीही ती प्रभावीपणे निभावली.
काँग्रेसमुळे महाविकास आघाडी सरकार आहे, हे लक्षात असू द्या; शिवसेनेला थेट इशारा
आताही आघाडीतील दोन मित्रपक्षांबद्दल - काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल कठोर भूमिका मांडण्याचं काम ते करत आहेत. शिवसेना याच मार्गाने पुढे जात राहील, असाच मेसेज संजय राऊत यांच्या पुनर्नियुक्तीतून उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मित्रांसोबत सरकार चालवायचं याचा अर्थ त्यांच्या संदर्भात बोटचेपेपणा किंवा नरमाईची भूमिका घ्यायची, असं होणार नाही, हा संदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.