गळाठलेला काँग्रेस पक्ष
By admin | Published: October 23, 2015 03:57 AM2015-10-23T03:57:26+5:302015-10-23T03:57:26+5:30
काँग्रेस पक्षाला त्याच्या २०१४ तील पराभवातून अजून सावरता आलेले नाही. त्याला दूरचे सोडा पण जवळचे व आपल्यातलेही काही स्पष्ट दिसत नसावे अशी त्याची स्थिती आहे.
काँग्रेस पक्षाला त्याच्या २०१४ तील पराभवातून अजून सावरता आलेले नाही. त्याला दूरचे सोडा पण जवळचे व आपल्यातलेही काही स्पष्ट दिसत नसावे अशी त्याची स्थिती आहे. पक्षाचे अध्यक्ष बदलण्याची व त्यावर सध्याचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आणण्याची चर्चा त्यानेच सुरू केली. हा निर्णय आज होणार, उद्या होणार असे करीत त्यात एक वर्ष घालविले. परिणामी त्याविषयीची सारी उत्कंठाच संपून गेली. गेल्या वर्षभरात त्याने वेगवेगळ््या पदांवर ज्यांची नियुक्ती केली ती माणसे दमदार तर नव्हतीच, उलट पक्ष कार्यकर्त्यांतील उरलासुरला उत्साहही घालविणारी होती. कोणा नगमा नावाच्या दुय्यम वा तिय्यम दर्जाच्या, कोणालाही फारशा ठाऊक नसलेल्या नटीला त्याने आपल्या राष्ट्रीय महिला संघटनेचे अध्यक्षपद दिले. पक्षाला तरूण चेहरा द्यायचा तर तो निदान साऱ्यांना ठाऊक असणारा आणि स्वत:चे काही स्थान व वजन असणारा असावा याचीही भ्रांत ही नियुक्ती करताना पक्षाने राखली नाही. एखाद्या समारंभात स्वागतगीत म्हणायला आलेल्या चमूतल्या कोणा मुलीलाच त्या समारंभाचे अध्यक्षपद देण्याएवढा हा प्रकार हास्यास्पद व बालिश आहे. पक्षाने महाराष्ट्रातील महिला संघटनेचे अध्यक्षपद चारूशीला टोकस या प्रभा राव यांच्या कन्येला दिले. खरे तर प्रभा राव यांची कन्या एवढाच त्यांचा परिचय आहे. नाही म्हणायला काही काळ त्या वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. पक्ष कार्यकर्त्यांत ना ओळख ना त्यांचे महिला वर्गात काही वजन. अशा व्यक्तीच्या हाती महिलांचे म्हणजे ५० टक्के मतदारांचे संघटन सोपविणे हा राजकीय दिवाळखोरीचा नमुना आहे. युवक काँग्रेस नावाच्या पक्षाच्या युवा संघटनेचे पुढारी कोण आहेत आणि ते काय करतात याचीही कुणाला फारशी खबरबात नाही. एकीकडे देशात सत्ताधारी पक्षाकडून भयगंडाचे वातावरण उभे करण्याचा, बहुसंख्यकांच्या नावाने अल्पसंख्यकांच्या मनात दहशत उभी करण्याचा व धर्मनिरपेक्षता या राष्ट्रीय मूल्याचा धुरळा उडविण्याचा उद्योग सुरू आहे. हा काळ एका मोठ्या व विधायक कार्यक्रमानिशी जनतेत जाण्याचा आणि आपली बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतीबहुल राष्ट्रीयता टिकविण्याचा व समर्थ बनविण्याचा आहे. भाजपाच्या तथाकथित हिंदुत्ववादी प्रचारकीला जबर उत्तर देण्याची गरज या काळात वाढली आहे. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रादेशिक नेतृत्व त्याबाबतीत केवळ निष्क्रिय व उदासीनच नाही तर हताश झालेले दिसत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपवाद वगळता पक्षाचे इतर नेते नुसते गप्पच नाहीत तर मुखस्तंभासारखे वागताना दिसत आहेत. त्यातून सोनिया गांधींपुढे त्यांच्या प्रकृतीचा आणि राहुल गांधींपुढे त्यांच्या अपुऱ्या अनुभवाचा प्रश्न आहे. तरीही ते त्यांच्या परीने जमेल तेवढे वातावरण जपण्याचा प्रयत्न करीत कार्यरत राहिले आहेत. राजस्थानात सचिन पायलट यांनी पक्ष तारला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी यशस्वी केल्या. मध्यप्रदेशात दिग्विजय सिंह आहेत पण त्यांचे बोलणे दिवसेंदिवस जास्तीचे टीकास्पद होऊ लागले आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे अभ्यासू संसदपटू आहेत पण ते संसदेबाहेर, अगदी त्यांच्या मध्यप्रदेशातही वावरताना कुठे दिसत नाहीत. महाराष्ट्रात राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षाचे नेते नेमके काय करतात हे पक्षाला कळत नाही आणि पक्षाच्या वेगवेगळ््या क्षेत्रात काय चालते याची माहिती करून घेण्याच्या भानगडीत तेही पडत नाहीत. अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष काही काळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर राहिले आहेत. पण त्यांचा एक नांदेड जिल्हा सोडला तर ते इतरत्र कुठे जाताना दिसत नाहीत. वास्तविक मराठवाड्याला गेली दोन वर्षे ओळीने अवर्षणाला सामोरे जावे लागले आहे. विदर्भात गेल्या वर्षभरात एक हजार तर मराठवाड्यात साडेसातशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. या भागांची वास्तपुस्त करावी असेही विखे किंवा चव्हाण यांना कधी वाटल्याचे दिसले नाही. शरद पवार गावोगावी गेले. खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सर्वत्र गेले. पण त्या गदारोळात काँग्रेसचे मराठी नेते मात्र कुठे फिरकताना दिसले नाही. पक्षात गावोगावी आणि जिल्ह्याजिल्ह्यात भांडणे आणि तंटे आहेत. ते सोडविण्याचा व पक्ष कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न नाही. नवी माणसे जोडण्याचा वा नवे समुदाय पक्षात आणण्यात कोणी पुढाकार घेत नाही आणि पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत सोडा पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायलाही कोणी प्रवास करताना दिसत नाही. सारे काही २०१९ मध्ये येणाऱ्या निवडणुकांपर्यंत स्थगित ठेवण्याचाच मनसुबा साऱ्यांनी केला असेल तर निदान तेवढ्यासाठी तरी आपला पक्ष शाबूत राखणे गरजेचे आहे हेही या अनुभवी राजकारण्यांना कळत नसावे असे कोण म्हणेल? काँग्रेस पक्षाची सरकारे अजूनही देशातील नऊ राज्यात सत्तेवर आहेत. साऱ्या देशात भाजपाला संघटितपणे तोंड देऊ शकेल असा तोच एक पक्ष आहे. त्यामागे इतिहास व नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा आहे. पक्षासाठी वा कोणा नेत्यासाठी नाही तर किमान लोकशाहीसाठी देशात एक मजबूत विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या गळाठलेल्या पुढाऱ्यांनी किमान तेवढ्यासाठी तरी सक्रीय होणे आवश्यक आहे.