विचारांचा सहवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:32 AM2019-02-16T01:32:49+5:302019-02-16T06:59:42+5:30
प्रत्येक गोष्टीला कारण असते. विनाकारण कुठलीही कृती ही फुकट वेळ गमविण्याचे लक्षण समजले पाहिजे. साद-प्रतिसाद हा तर निसर्गनियमच आहे. मनुष्य ज्या पद्धतीची कृती करतो, विचार करतो, त्याच प्रकारचे फळ त्याच्या पदरात पडत असतात.
- विजयराज बोधनकार
प्रत्येक गोष्टीला कारण असते. विनाकारण कुठलीही कृती ही फुकट वेळ गमविण्याचे लक्षण समजले पाहिजे. साद-प्रतिसाद हा तर निसर्गनियमच आहे. मनुष्य ज्या पद्धतीची कृती करतो, विचार करतो, त्याच प्रकारचे फळ त्याच्या पदरात पडत असतात. वाईट कृती असेल, तर फळही वाईट मिळते आणि कृती मंगलमय असेल, तर फळही तितकेच मधुर मिळत राहते. जसे जो मनुष्य फक्त लोभ, भय, स्वार्थापोटी देवपूजा करीत असतो, त्याचे भय स्वार्थ वाढीस लागून त्याच्या पदरात कोरड्या दु:खाशिवाय काहीही पडणार नसते, परंतु जो मानसिक शांती आणि एकाग्रतेसाठी काही काळ मंदिरात किंवा घरात नामस्मरण आणि पूजापाठ करीत असेल, तर ज्याची शांती वाढत जाऊन एकाग्र वृत्तीमुळे त्याचा स्वभाव, त्याची कार्यपद्धती ही नक्कीच यशाकडे सरकत राहते. मनात जसा भाव असेल, तोच भाव तनामनात मुरत राहतो, तोच खरा प्रतिसाद असतो. दिवसातला काही काळ माणसाला मानसिक शांतीची गरज असते. त्यासाठीच माणसाने देव नावाचे एक प्रतीक शोधून काढले. ज्याच्यासमोर बसल्यानंतर त्याला पाहताक्षणी त्याचे गुण, विचार आपल्या मनातून संचारत जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत राहतो. ज्या ऊर्जेचा मानवाच्या व्यवहारिक जीवनात उपयोग होऊ शकतो. पूर्वीच्या काळी गावाबाहेरच्या उंच डोंगरावर मंदिरे बांधण्याची परंपरा होती, त्यामागे हेच कारण असायचे की, डोंगर चढताना एकाग्रतेने होणारा श्वासोच्छवास आणि निसर्गातली स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा याचा लाभ मनाला आणि शरीराला व्हावा, हाच उद्देश असायचा, प्राणायम किंवा कपालभाती त्या निमित्ताने सहजरीत्या होऊन अनेक रोगांपासून मुक्त हेण्याची शक्यता असायची. डोंगरावर या निमित्ताने जाऊन निसर्गसृष्टीचाही आनंद समाज घेऊन मन, बुद्धी, चित्त, आरोग्य उत्तम राहून परिवारावर पंचतत्त्वाची म्हणजेच ईश्वराची सतत कृ पादृष्टी राहत असायची. हेच त्यामागचे मूळ कारण होते. जसे देवाजवळचा दिवा, ही खरे तर प्रकाश पूजा म्हणायला हवी. रात्र झाल्यानंतर मिणमिणत्या वातीची ऊर्जा पूर्ण घराला मिळो आणि थोडा वेळ जरी ज्योतीवर एकाग्र केले, तरी प्रकाशाचे गुण मनबुद्धी प्रेरणा देवो, माणसाचे मन हे मुळातच चंचल वृत्तीचे असल्यामुळे त्याला स्थिर करण्यासाठीच अशा गोष्टीचा जन्म झाला. ज्याची वृत्ती स्थिर त्याला अनेक गोष्टींचा सहजच लाभ मिळत राहतो. त्याच्या स्थिर बुद्धीमुळे तो व्यक्ती उत्तम निर्णय घेण्यात, योजना आखण्यात, योजनांचा पाठपुरावा करण्यास, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांची मने जिंकण्यात, व्यवहारिक गोष्टींचा ताळमेळ साधण्यात यश मिळवित राहतो. देवाधिकांची भक्ती म्हणजे व्यक्तीविकासाचे कारण असले पाहिजे. देव कुठलाही असो, त्याच्या भक्तीचे नेमके कारण काय, याची जर जाणीव असेल, तर त्या जाणिवेला सात्विक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. माणूस हाच खऱ्या अर्थाने त्याचा देव असतो. प्रत्येकाने आपला देव आपल्या अंतरात शोधायला पाहिजे. विचारांशिवाय कुठलीही भक्ती, देवपूजा म्हणजे निव्वळ वेळ वाया घालविणे होय. देव हा सकारात्मक विचारांचा सहवास आणि देव एक कर्मयोगाचा संस्कार आहे. तो कोरड्या पूजेने कदापिही होणार नाही. म्हणूनच सकारात्मक प्रबळ इच्छेचे कारण असेल, तर त्यामुळे मानवाला तसाच प्रतिसाद मिळत राहणार. म्हणून ग्रामगीतेत राष्टÑसंत तुकडोजी महाराज लिहितात, ‘त्याला सहवास उत्तम द्यावा, दर्जा जीवनाचा वाढवावा, त्याने समाज होईल नवा, ज्ञानवंतांचा निर्माण.’