‘उंबरठे’ ओलांडून ‘ती’ दिल्लीत पोहोचते; त्याची गोष्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 11:11 AM2024-03-08T11:11:13+5:302024-03-08T11:11:23+5:30
सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी संवाद साधणारा ‘नेत्री’ हा प्रकल्प विशेष चर्चेत आहे. त्या मुलाखतींचे संक्षेप सांगणारी लेखमाला आजपासून दर पंधरा दिवसांनी!
शायना एन. सी., भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या -
सार्वजनिक जीवनात स्त्री म्हणून वावरताना एक बाब मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे राजकारणातले पुरुष नेते अनेकानेक व्यासपीठांवरून सतत बोलत असतात. राजकारणातला त्यांचा प्रवास, त्यांचे कष्ट, त्यांच्यासमोरची आव्हानं याबाबत त्यांना उत्सुकतेने विचारलं जातं. ही संधी स्त्री नेत्यांना मात्र अभावानेच मिळते. त्यातूनही ज्या स्त्रिया कोणतीही पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातून राजकारणात आल्या, खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या, त्यांचा व्यक्तिगत प्रवास कसा असेल? त्यांची गोष्ट काय असेल? राजकारणातल्या महिलांकडे कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, तर मग सगळी चर्चा तिचं कुटुंब, ती कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची सून, कोणाचा वारसा कसा चालवते आहे याभोवतीच फिरत राहते; पण याही स्त्रियांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्यासमोरची आव्हानं याबाबत फार बोललं जात नाहीच.
या स्त्रियांचं सोडाच, पण भारतीय राजकारणात आज कितीतरी स्त्रिया दुर्गम, ग्रामीण भागातून, अगदी जंगलातून येऊन दिल्लीत पोहोचल्या आहेत, आपल्या ताकदीवर खासदार झाल्या आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामागची गोष्ट उलगडून पाहण्यासाठी मी ‘नेत्री’ या प्रकल्पाचा प्रारंभ केला. पक्षाचे भेदाभेद न् मानता लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांशी संवाद हा त्या प्रकल्पामागचा उद्देश ! महिला खासदारांच्या मुलाखती घेताना एक बाब प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अनेक जणी या मुलाखतींच्या निमित्ताने पहिल्यांदा आपल्या मनातलं सांगत होत्या. आपण राजकारणात का आलो, आपल्याला काय करायचं आहे, यावर मोकळेपणाने बोलत होत्या.
गोमती सहाय. छत्तीसगडमधल्या खासदार. पहिल्यांदा स्टुडिओमध्ये बोलवून कोणी आपली मुलाखत घेत आहे, याचंच त्यांना विशेष वाटत होतं. अख्खं आयुष्य जंगलात गेलेल्या गोमती सहाय खासदार होऊन दिल्लीला जातात या घटनेतच एक मोठा संघर्ष लपलेला आहे. त्या सांगत होत्या, त्यांच्या नवऱ्याने कधीही त्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाही. ते कधीही पत्नीसोबत दिल्लीला गेले नाहीत. लोकशाहीचा मजबूत कणा दाखवणाऱ्या अशा कहाण्या सर्वांपर्यंत पोहोचणं मला महत्त्वाचं वाटतं.
साध्वी निरंजन ज्योती यांनी त्याग आणि तपश्चर्या करून आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेला दिलं. इतर स्त्री खासदारांच्या तुलनेत हेमा मालिनी यांचा प्रवास अगदीच सोपा असेल, असं कुणालाही वाटेल; पण त्या सांगतात, ती वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबईहून मथुरेला जाणं, तिथून निवडणूक लढवणं, तेथील सामान्य जनतेचा विश्वास जिंकणं हे अतिशय अवघड आव्हान हेमा मालिनी यांनी पार केलं, ते कसं हे समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं.
दिया कुमारी तर राजघराण्यातल्या. पण त्या राजकारणात आल्या आणि त्यांचं आयुष्य, दृष्टिकोन सारंच कसं बदलत गेलं याची त्या सांगतात ती कहाणी फारच वेधक आहे. सुनीता दुग्गल महसूल खात्यातील नोकरी सोडून राजकारणात आल्या. अपराजिता सारंगी आयएएस अधिकारी होत्या, आपलं तिथलं करिअर सोडून त्या राजकारणात आल्या त्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी नाही; तर ३३ टक्के आरक्षणाच्या सहाय्याने राजकीय क्षेत्रात येऊन समाजात काहीतरी बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या महिला खासदारांनी बाळगली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अशाही महिला खासदार मला भेटल्या, ज्यांना आपल्याला काय करायचंय हे नेमकं सांगता येत नाही, पण त्यांचं नियोजन मात्र स्पष्ट आहे.
अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, आपली लढाई आपल्या ताकदीवर लढून सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांतल्या स्त्री खासदारांची गोष्ट ‘नेत्री महिला सांसद और उनकी कहानिया शायना एन.सी. के साथ’ या यू-ट्यूब कार्यक्रमात मी उलगडली. त्या कहाण्यांचं संक्षिप्त रूप मुद्रित स्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न या लेखमालेतून मी करणार आहे.