आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:23 AM2019-05-12T01:23:55+5:302019-05-12T01:24:12+5:30

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आज- रविवारच्या मातृदिनानिमित्त तिच्याविषयी...

 Come in | आई

आई

googlenewsNext
ठळक मुद्देम्हणूनच तर आईच्या महतीची व्याख्याच अमर्यादित आहे नि त्यामुळेच तर म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!

मानसी जामसांडेकर

नवजात बाळ आईच्या कुशीत निश्चिंत, निवांत झोपलंलं असतं. आईच्या वत्सल स्पर्शात, ममतेच्या कृपाछायेत ते बिनधास्त राहतं. नैसर्गिकत: ममतेच्या वर्षावात त्याची शारीरिक तसेच मानसिक वाढ होते. आईच्या उबेचे सुरक्षित संरक्षक कवच मिळाल्याने त्याची सर्वांगीण वृद्धी होत राहते. बाळाला तर जन्मताच आई-वडील हे गुरू लाभलेले असतात. त्यांच्याच शिकवणीने ते वाढतं, त्याचा सर्वांगीण विकास होत असतो. खरं तर आई हीच प्रत्येकाची पहिली गुरू असते.
समुद्रकिनाऱ्यावरील खडे, वाळू मोजता येईल, पण आईची माया मोजता येणार नाही. ती अमर्यादित आहे. आईची माया शब्दातीत आहे. शब्दाविना आईचा वात्सल्यतेची भाषा असते. आईचे वात्सल्य शब्दांपलीकडले आहे. नुसत्या स्पर्शाने बाळाला तिचे अस्तित्व जाणवते. जसे कासविणीच्या प्रेमाद्र, स्नेहाद्र दृष्टीने तिची दूरवरची पिले वाढत असतात. जोपासली जातात. तसेच आईच्या मायेच्या नजरेने बाळाचा विकास होत असतो.

आईरूपी वृक्षाच्या वत्सल शितल छायेत विसावलेल्या बाळाचा तिच्याच गोड, गंधित मायेच्या फळाफुलांनी विकास होत राहतो. आईच्या हातच्या सुग्रास वरणभाताची चव जीभेवर छपन्न भोगांपेक्षाही चवदार, स्वादिष्ट अशी रेंगाळत राहते नि तिच्या हातच्या अमृततुल्य चविष्ट, पौष्टिक अन्नाने शरीराची तृप्ती यथेच्छ होते. बाळ आईच्या कुशीत मजेत विसावलेले असते.‘आई’ नावाची शाळा अशी आहे की ती जन्मत:च जन्मापूर्वीही आपल्याला शिकवत असते. आईच्या गर्भातल्या बाळाच्या हुंकाराला आईचे आश्वासनपूर्वक बोल कानी पडत राहतात. तिच्याकडूनच आयुष्याच्या पहिल्या वहिल्या पाठशाळेचे धडे जन्मापासून बाळ गिरवत राहते. चांगल्या सवयी, सुविचार यांची सांगड घालून आई आपल्या बाळाला खतपाणी घालून मोठं करते नि एक आदर्श नागरिक व्हायला योग्य ते मार्गदर्शन करत असते.

एखाद वेळेस बाळ टवाळखोर निघेल, पण या जगात कुमाता होणे शक्यच नाही. आई नि बाळाचा त्याच्या जन्माआधी (गर्भात), बाल्यावस्थेत नि:शब्द संवाद असतो. त्याला ना भाषेची गरज ना बोलाची, पण आईच्या मायेच्या, ममतेच्या स्पर्शाने आईची भाषा ते बाळ सहज अवगत करत असते.

आई रिटायर्ड होते तेव्हा
आपण तिच्या मुलांनी आईची आई होणे आवश्यक आहे. त्यापेक्षा नितांत गरज आहे तिला जपण्याची, तिला आधार देण्याची. तिच्या या उतारवयात आपल्याच आधारावर तर ती एकेक पाऊल विश्वासाने टाकत असते. प्रौढ वयातील तिच्या मानसिक तसेच शारीरिक कमकुवतेला तिच्याच बाळांचा तिला भक्कम आधार असतो. म्हणूनच तर ती आयुष्याचा पैलकिनारा दृष्टीसमोर दिसत असूनही मुलांच्या, नातवंडांच्या सहवासात सुखाने क्षण कंठत असते.
आपल्या लहानपणी एकेक पाऊल टाकायला शिकवणारी आईची आपणच मुलांनी काठी होऊया आणि तिच्या वृद्धावस्थेत तिच्या पावलांना भक्कम आधार देऊ या. लहानपणी आईच्याच हातचे काऊ-चिऊचे इवलेइवले घास खाणारे आपण आता तिला प्रेमाचे घास भरवूया. तिच्या वत्सलतेला, ममतेला आपल्या प्रेमाने आनंदाची बरसात करून तिचं वृद्धत्व आनंदीत, सुकर करूया. आई रिटायर्ड झाल्यावर तिला विश्रांतीची, आपुलकीच्या, मायेच्या शब्दांची गरज असते. ती आपल्या जीवनाची शिल्पकार असते. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीतसुद्धा मुख्य हात तिचाच असतो. म्हणूनच तर तिच्या वृद्धत्वाकडे प्रवेशणाºया काळाला सुकर करू या. हीच मनोमन सदिच्छा! आई ही किमयागार आहे. तिच्या नुसत्या स्पर्शात बालकाचा सर्वांगिण विकास होण्याची जादू आहे. आई म्हणजे आत्मियता, स्नेह, प्रेम, ममता, वात्सल्य, सुख-शांतीचा अखंडित वाहणारा स्रोत होय. म्हणूनच तर आईच्या महतीची व्याख्याच अमर्यादित आहे नि त्यामुळेच तर म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!

-  हनुमाननगर, पाचगाव रोड, कोल्हापूर.

Web Title:  Come in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.