आ चल के तुझे मै लेके चलू..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:31 PM2018-12-26T17:31:58+5:302018-12-26T17:44:09+5:30
कोणत्याही जाती अथवा धर्माचा भेदाभेद न करता, मुलगा आणि मुलीच्या पसंतीनुसार विवाह केला जात असल्याने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला येथे प्राधान्य मिळत आहे.
- धनाजी कांबळे
विवाह ही एक अतिशय महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट आहे. हल्ली विवाहाला इव्हेंटचे रुप आले आहे. त्यामुळेच कुणी परदेशात विवाह करतं, तर कुणी पाण्याखाली करतं. कुणी फ्लाइंग करताना विवाहबंधनात अडकतं. तर सेलिब्रेटी परदेशात शाही पद्धतीने विवाह करतात. त्यानंतर रिसेप्शनचे देखील इव्हेेंट केले जातात. विवाहातील आकर्षण असलेली मिरवणूक कधी घोड्यावरून काढली जाते. तर अलिशान गाडीतून काढली जाते. ग्रामीण भागात आजही बैलगाडीतून वर-वधूची मिरवणूक काढली जाते. आता तर सायकलवरूनही मिरवणूक काढण्यात येऊ लागली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विवाह देखील होत आहेत. खरं तर ही एक महत्त्वाची आणि चांगलीच गोष्ट आहे. मात्र, कोणत्याही कर्मकांडाशिवाय वर आणि वधूला माणूस म्हणून जीवन जगण्याची शपथ देऊन होणाºया विवाहांना देखील हल्ली पसंत मिळत आहे. प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या पुढाकारातून हे केंद्र मोफत चालवले जात असून, त्यांच्याकडे विवाहेच्छूक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात विचारणा करीत आहेत. त्यामुळे जुळता जुळता जुळतयं की, असे आपसूकच कुणाच्याही मनात येऊन जात आहे.
कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा भेदाभेद न करता, मुलगा आणि मुलीच्या पसंतीनुसार विवाह केला जात असल्याने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला येथे प्राधान्य मिळत आहे. त्याचप्रमाणे स्वजातीय तरुण-तरुणी देखील पारंपरिक विवाह सोहळ््याला फाटा देऊन सत्यशोधक विवाह पद्धतीला पसंती देत आहेत. ज्यांना वैदिक पद्धतीने विवाह करायचा नाही अशा जोडप्यांसाठी हा विवाहाचा एक वेगळा मार्ग आहे. यामध्ये वैदिक विवाह पद्धतीप्रमाणे कर्मकांड, पुरोहितांना महत्त्व देण्याऐवजी दोन जीवांचे मिलन आहे. सत्यशोधक पद्धतीने देखील आता सुधारित पद्धतीने सत्यशोधक विवाह लावला जातो. ज्यांना सत्यशोधक विवाह पद्धतीप्रमाणे विवाहबद्ध व्हायचे आहे, ते या केंद्राशी संपर्क करतात. तेव्हा वेळ ठरवून दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले जाते. तसेच सर्व कायदेशीर बाजू तपासून बघितल्या जातात. तसेच त्यांचे समुपदेशनही केले जाते. गरज असल्यास दोघांच्या कुटुंबीय, आई-वडील यांच्याशीही चर्चा केली जाते. विवाहावेळी मुला-मुलीचे नातेवाईक उपस्थित राहतील, असा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात लग्न लावताना मंगलाष्टकांऐवजी मंगल ओव्या म्हटल्या जातात. त्यात पालनकर्त्यांना पहिल्यांदा नमन केले जाते. त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. आयुष्य सुंदर आहे, ते एकमेकांच्या साथीनं जगण्याचं वचन एकमेकांना दिले जाते. पुष्पहार घालून वधु-वरांवर पुष्पवृष्टी केली जाते. सत्यशोधक विवाह केंद्राच्या वतीने आपट्याचं पान आणि प्रमाणपत्र दिले जाते. तसेच या पद्धतीने आई-वडिलांनी आपल्या मुलांचं लग्न केल्याबद्दल त्यांनाही प्रमाणपत्र दिले जाते.
महात्मा जोतिबा फुले यांनी ‘सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी,’ असे घोषवाक्य असलेल्या सत्यशोधक समाजाची १८७३ मध्ये स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रभर सत्यशोधक जागर सुरू झाले होते. ‘निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’, असा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. परिर्वतनाचा मूलगामी विचार करून पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वेगळ्या पद्धतीचे विवाह आजही होताना दिसत आहेत. महात्मा फुले यांचा हा मूलगामी विचार घेऊन हे सत्यशोधक विवाह केंद्र काम करीत आहे. प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, रोहिदास तोडकर, रघुनाथ ढोक आणि त्यांचे सहकारी दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची याकामी मोठी साथ आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय असे साधारण १८० विवाह झाले आहेत. या केंद्रामुळे विवाहेच्छूक तरुण-तरुणींना या ठिकाणी विवाह करण्यासाठी सर्वप्रकारची मदत मिळत असल्याने समतेवर आधारित विवाह पद्धतीला तरुणाईची पसंती मिळत आहे. मानपान, वारेमाप खर्च या फाटा देऊन अतिशय साधेपणाने पण निष्ठेने सत्यशोधक विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी पुण्यात स्थापन झालेले सत्यशोधक विवाह केंद्र एक महत्त्वाचा दुवा ठरले आहे.