अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व देणाऱ्या ऊर्जस्वल लढ्याचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:27 AM2022-09-17T11:27:35+5:302022-09-17T11:28:03+5:30

सर्वसामान्य जनतेने मनावर घेतले तर काय होऊ शकते, हे सांगणारा लढा ही हैदराबाद मुक्तिसंग्रामाची खरी ओळख आहे!

Commemorating the energetic struggle that completed the incomplete freedom, Article on Hyderabad Liberation War | अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व देणाऱ्या ऊर्जस्वल लढ्याचे स्मरण

अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व देणाऱ्या ऊर्जस्वल लढ्याचे स्मरण

Next

 मंगल प्रभात लोढा, पर्यटनमंत्री, महाराष्ट्र 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी एकीकडे संपूर्ण देश गुलामगिरीतून मुक्तीचा आनंद साजरा करत होता, तर दुसरीकडे फाळणीच्या जखमादेखील त्रासदायक ठरत होत्या. अशा परिस्थितीत दक्षिण भारताच्या मधोमध हैदराबादचा निजाम पाकिस्तानप्रमाणे स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होता; परंतु हैदराबादसह मराठवाड्यातील जनतेच्या एकजुटीने, लोकशाही भारतात सामील होण्याच्या जिद्दीने निजामाला गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि मराठवाडा भारताचा अविभाज्य भाग झाला.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ५६५ संस्थांनांपैकी हैदराबाद, जम्मू-काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती. मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक भाग होता. या संस्थानाच्या स्वातंत्र्यसंग्रामाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखे  नेतृत्व लाभले आणि मराठवाडा मुक्तीचा लढा सुरू झाला. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करावी लागणार, याची सुरुवातीपासूनच कल्पना होती.  

९ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश सैन्य दलाला देण्यात आले. ले. जनरल राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, डी. एस. ब्रार, ए. ए. रुद्र यांनी ही योजना राबविली. पुढील काही दिवसांत भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानामधील सर्व महत्त्वाच्या केंद्रांवर ताबा मिळवला. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्य जनतेत राहून गनिमी कावा करून अथवा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेक नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. या सर्वांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांसारख्या असंख्य नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले.

मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई अशी ओळख निर्माण झालेल्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेडचे देवराव कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गावागावात हा लढा लढला गेला. त्याचप्रमाणे श्रीधर वर्तक, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील यांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता भारतात विलीन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा अविभाज्य भाग झाला.
सर्वसामान्य जनतेने मनावर घेतले तर काय होऊ शकते, याचा परिचय सांगणारा लढा ही मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची खरी ओळख आहे!

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारत माता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी ‘सामूहिक वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर २०२२ रोजी हा कार्यक्रम होईल. आपल्या पूर्वजांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे व देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी व स्वाभिमानासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, हीच या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल!

Web Title: Commemorating the energetic struggle that completed the incomplete freedom, Article on Hyderabad Liberation War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.