भाष्य - इंजीन ‘रुळावले’?

By Admin | Published: January 12, 2017 12:15 AM2017-01-12T00:15:00+5:302017-01-12T00:15:00+5:30

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत

Commentary - Is the engine 'rolled'? | भाष्य - इंजीन ‘रुळावले’?

भाष्य - इंजीन ‘रुळावले’?

googlenewsNext

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत असतात आणि त्याचवेळी समोरच्याकडून हल्ला केला जाण्याची प्रतीक्षाही करीत असतात. कोण जाणे, कदाचित कुस्तीमध्ये हल्ल्यापेक्षा प्रतिहल्ला अधिक परिणामकारक ठरत असावा. पण राजकारणात मात्र तो हमखास परिणामकारक ठरत असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-सेना युती संपुष्टात आणण्याची अधिकृत आणि एकतर्फी घोषणा त्या काळातील मुख्यमंत्रिपदाचे स्वयंभू व स्वयंघोषित भावी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आणि त्यानंतर ते सातत्याने शिवसेनेच्या प्रतिहल्ल्यांचे लक्ष्य राहिले. कदाचित त्यामुळेच की काय राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांंमध्ये या दोन्ही पक्षांच्या युतीची अथवा युतीभंगाची घोषणा कोणी करावी किंवा त्याकामी कुणी पुढाकार घ्यावा, यावरुन उभय युतीकरांमध्ये परस्परांना जोखण्याची स्पर्धा चालली आहे. धमक असेल तर युती तोडा, अशी गर्जना शिवसेनेने अनेकवार केली असली तरी भाजपाने अद्याप सेनेला अपेक्षित असलेली कथित धमक दाखविलेली नाही. मुख्यमंत्री युतीचे समर्थक आहेत पण मंत्री-आमदार मात्र विरोधक आहेत असे केवळ पतंग उडविणे सुरु आहे. इकडे ही घुळघुळ सुरु असताना मनसेचे कर्तेधर्ते राज ठाकरे यांनी मात्र कुणाकडून प्रस्ताव आलाच तर युतीचा विचार करु असे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. जर ते खरे असेल तर मनसेचे ‘इंजीन’ प्रथमच ‘रुळावर’ आले आहे असे म्हणता येईल. मनसेच्या तुलनेत शिवसेना आणि भाजपा यांची ताकद अफाट असली तरी ही ताकद स्वबळावर मुंबई वा महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी पुरेशी नाही याचे त्या दोहोंना भान आहे. त्यामुळेच हा ‘असंगाशी संग आहे’ हे जाणवत असूनही ते एकत्र आले आहेत. राज ठाकरे मात्र आजवर या भानाशीदेखील तसे फटकूनच वागत आले. राज्यातील लोक आपल्या बोलण्यावर लट्टू झाले आहेत तेव्हां ते आपल्या पाठीशी उभे राहाणारच आहेत, मग पाहिजे कशाला कुणी वाटेकरी असाच विचार ते आजवर करीत आले. पण आता ते भानावर आलेले दिसतात. त्यांचे हे भान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तूर्तास तरी ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून अव्हेरले आहे. भाजपा मात्र कदाचित दोन्ही बंधूंना झुलवत ठेऊ शकते.

Web Title: Commentary - Is the engine 'rolled'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.