आयुक्तसाहेब, उंच कामे नको, फक्त मुलभूत सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:23 PM2020-03-17T13:23:18+5:302020-03-17T13:24:58+5:30

मिलिंद कुलकर्णी जळगाव महापालिकेला अखेर आयुक्त मिळाले आणि विशेष म्हणजे नियुक्तीनंतर ते लगेच रुजूदेखील झाले. डॉ.उदय टेकाळे यांच्या नंतर ...

Commissioner, do not do the high work, just give basic facilities | आयुक्तसाहेब, उंच कामे नको, फक्त मुलभूत सुविधा द्या

आयुक्तसाहेब, उंच कामे नको, फक्त मुलभूत सुविधा द्या

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगाव महापालिकेला अखेर आयुक्त मिळाले आणि विशेष म्हणजे नियुक्तीनंतर ते लगेच रुजूदेखील झाले. डॉ.उदय टेकाळे यांच्या नंतर डॉ.माधवी यांची नियुक्ती यापदावर झाली होती. परंतु, त्या आल्याच नाहीत. त्या का आल्या नाही, याचे कारण कळले नाही. परंतु, उगाच चर्चा सुरु झाली की, जळगाव महापालिकेत यायला कुणी तयार नाही. असा संदेश जाणे हे जळगावच्या प्रतिमेच्यादृष्टीने चुकीचे आहे.
कुलकर्णी हे मंत्रालयातून आले आहेत. नगरपरिषद संचालनालयात ते कार्यरत होते. आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या १७ मजली इमारतीविषयी गौरवोद्गार काढले. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एवढी उंच स्वमालकीची प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय धाडसी, कल्पक आणि दूरदृष्टीचा आहे. त्या इमारतीचा आणि हा निर्णय घेणाऱ्या व अंमलात आणणाºया सुरेशदादा जैन यांचा जळगावकरांना अभिमान आहेच. आयुक्तसाहेबांनी प्रांजळ भावना व्यक्त करुन जळगावकरांचे मन पहिल्यांदा जिंकले. आयुक्तसाहेब, स्वप्न बघणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हे खूप अवघड असते. १७ मजली इमारतीचे असेच आहे. अन्यथा, एवढ्या इमारतीची गरज काय, लिफ्टचा अकारण खर्च वाढला असा काथ्याकुट करणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची जळगावात कमतरता नाही. विकास कामांची वीटही रचता न येणारी माणसे कर्मधर्मसंयोगाने सत्ता मिळाल्यावर या इमारतीचे मजले भाड्याने देण्याच्या गोष्टी करीत होते, हेदेखील जळगावकरांनी बघीतले.
आयुक्तसाहेब, तुम्ही जळगावच्या भरभराटीच्या काळाची आठवण करुन दिली याबद्दल धन्यवाद. त्या उंचीची कामे मार्गी लावण्याचा तुमचा मनोदय स्वागतार्ह असला तरी सध्या जळगावकरांना भेडसावणाºया मुलभूत सुविधा दिल्या तरी खूप असे प्रामाणिक मत सामान्य नागरिकाचे आहे. करदात्या नागरिकाला ज्या सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेपासून मिळायला हव्यात, त्यापासून जळगावकर अनेक वर्षांपासून वंचित आहेत. जळगावनजिक असलेले वाघूर धरण यंदा १०० टक्के भरले. परंतु, जळगावकरांना दोन दिवसाआड आणि तेही काही भागात पहाटे ३.३० वाजता तर कुठे रात्री ९ वाजता पाणीपुरवठा होत आहे. ‘कोरोना’ या साथरोगाने भयंकर रुप धारण केलेले आपण बघत आहोत, अशा साथरोगांचा सामना जळगावकर रोज करीत आहेत. तुंबलेल्या व उघड्या गटारी, रस्त्यांवर पडलेला कचरा, गल्लीबोळ ते मुख्य रस्त्यांवर पडलेले अगणित खड्डे याचे परिणामस्वरुप धूळ आणि धुराचा करावा लागणारा सामना जळगावकरांच्या अंगणवळणी पडला आहे. जळगावात व्यापारी संकुले भरपूर आहेत, परंतु, पार्किंगचा अभाव आणि हॉकर्सचे अतिक्रमण यामुळे संकुलात जाऊन खरेदी करणेदेखील अवघड बनले आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह हा विषय दहा वर्षांपासून गाजत आहे, पण तो प्रश्नदेखील आम्ही सोडवू शकलो नाही. पथदिवे रात्री सुरु असावे, ही प्राथमिक अपेक्षा देखील पूर्ण होत नसेल तर नागरिकांनी काय करावे. आबालवृध्दांना खड्डे, अतिक्रमण आणि अंधाराचा सामना करीत ठेचकाळत, धडपडत वावरावे लागते, यापेक्षा दुर्देव ते काय?
आपण उंचीच्या कामांचा मनोदय व्यक्त केला, म्हणून तुम्हाला जळगावकरांची अपेक्षा काय आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी येऊन गेलेल्या अधिकाऱ्यांनी अशीच स्वप्ने दाखविली होती. जळगावकर आणि तथाकथित थिंक टँक मंडळी त्यांच्या प्रेमात पडली. जळगावचे हेच खरे तारणहार असे म्हणू लागले. पण भ्रमनिरास झाला. कुणी गाळ्यांचा प्रश्न सोडवून महापालिकेला कर्जमुक्त करण्याचा रामबाण उपाय सुचविला होता. सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांना डोक्यावर घेतले. वास्तव असे की, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एका अधिकाºयाने एका व्यापारी संकुलाला शिस्त लावली, जळगावकरांनी त्याचा उदोउदो केला. उर्वरित २६ संकुले मात्र तशीच राहिली. लोकप्रतिनिधींचादेखील असाच अनुभव आला. राज्यात सत्ता एका पक्षाची तर महापालिकेत दुसºया पक्षाची, परिणामी प्रत्येक विकास कामामध्ये राजकारण आले. कोट्यवधीच्या योजना आल्या, परंतु, एकही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. मुदतवाढीच्या रांगेत अनेक योजना प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेले २५ कोटी रुपये सत्ता जाऊनदेखील खर्च झालेले नाही. म्हणून, जळगावकर म्हणतात, मोठ्या घोषणा नको. मुलभूत सुविधा तेवढ्या द्या.

Web Title: Commissioner, do not do the high work, just give basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव