अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधीं’मागील आम आदमी

By admin | Published: September 11, 2014 09:19 AM2014-09-11T09:19:36+5:302014-09-11T09:19:46+5:30

महात्मा गांधींचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी अ‍ॅटनबरो यांना प्रेरित करणा-या आजवर अज्ञात असलेल्या भारतीय व्यक्तीचा उल्लेख होता. या व्यक्तीचे नाव होते मोतीलाल कोठारी.

The common man behind 'Athenber's' Gandhi | अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधीं’मागील आम आदमी

अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधीं’मागील आम आदमी

Next

रामचंद्र गुहा , ज्येष्ठ इतिहासकार

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो हे नुकतेच मरण पावले. त्या वेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वांचा भर त्यांनी निर्माण केलेल्या ‘गांधी’ चित्रपटावरच होता. या अनेक श्रद्धांजलींपैकी एकाच श्रद्धांजलीत महात्मा गांधींचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी अ‍ॅटनबरो यांना प्रेरित करणा-या आजवर अज्ञात असलेल्या भारतीय व्यक्तीचा उल्लेख होता. या व्यक्तीचे नाव होते मोतीलाल कोठारी.
मोतीलाल कोठारी हे मूळचे गुजरातचे. लंडनमधील हायकमिशनमध्ये काम करताना ते लंडनमध्येच स्थायिक झाले होते. १९५० साली त्यांना हृदयविकाराने पछाडले. त्या वेळी आपल्या आयुष्यात काही महत्त्वपूर्ण गोष्ट करून जगाचा निरोप घ्यावा, असे त्यांनी ठरवले. आपली आठवण सांगताना ते लिहितात, ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जेवढे काही करणे शक्य होईल, ते करायचे मी ठरवले.’ महात्मा गांधींचा शांततेचा संदेश हा हिंसाचारात अडकला आहे. तेव्हा तो संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रभावी माध्यम चित्रपट आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
आॅक्टोबर १९६१ साली मोतीलाल कोठारी हे लेखक लुई पाश्चर यांना भेटले. पाश्चर यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले होते. त्याच्या आधारावर तुम्ही चित्रपट काढू शकता, मला त्याबद्दल काहीही पैसे नकोत, असे त्यांनी कोठारी यांना सांगितले. १९६२ साली कोठारी यांनी रिचर्ड अ‍ॅटनबरो यांची भेट घेऊन गांधींच्या जीवनावरचा चित्रपट दिग्दर्शित कराल का? असे विचारले. फेब्रुवारी १९६३ मध्ये अ‍ॅटनबरो यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली. कोठारी यांच्या सूचनेवरून अ‍ॅटनबरो यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांची भेट घेऊन या प्रकल्पासाठी भारताचे पंतप्रधान पं. नेहरू यांची परवानगी मिळवण्यास सांगितले. हा चित्रपट प्रामणिकपणे तयार व्हावा, असे सांगून पं. नेहरूंनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली.
कोठारी आणि अ‍ॅटनबरो यांनी चित्रपटाची पटकथा गेरॉल्ड हॅन्ले यांच्याकडून लिहून घेतली आणि नोव्हेंबर १९६३ मध्ये नेहरूंची भेट घेऊन त्यांना ती पटकथा दाखवली. पटकथा योग्य भावनेतून लिहिली गेली आहे, असे मत नेहरूंनी व्यक्त केले. त्यानंतर तज्ज्ञ मंडळींनी पटकथा वाचून केलेल्या सूचना पटकथेत समाविष्ट करण्यात आल्या. हा चित्रपट तयार करण्यासाठी इंडो-ब्रिटिश फिल्म्स लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीचे संचालक अर्थातच अ‍ॅटनबरो आणि कोठारी हे होते. महात्मा गांधींचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे होरेस अ‍ॅलेक्झांडर यांच्या कागदपत्रांमध्ये हा सर्व तपशील नोंदवलेले मोतीलाल कोठारी यांचे कागद मला सापडले. या चित्रपटासाठी महात्मा गांधींच्या जीवनातील बारीकसारीक तपशील मिळवण्यासाठी कोठारी यांनी गांधींची मानसकन्या मीराबेन यांची भेट घेतली. मीराबेन या पूर्वाश्रमीच्या मॅडेलिन स्लेड. त्या स्वित्झर्लंडमध्ये राहत होत्या. तेथे ही भेट झाली.
१९ डिसेंबर १९६४ रोजी लंडनच्या सव्हॉय हॉटेल येथे पत्रपरिषद आयोजित करून कोठारी आणि अ‍ॅटनबरो यांनी आपली योजना जाहीर केली. या चित्रपटाविषयी बोलताना कोठारी म्हणाले, ‘‘आज जगासमोर जे प्रश्न आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी महात्मा गांधींनी स्वत:वर प्रयोग करून एक जीवनपद्धती विकसित केली होती. ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्याद्वारे करणार आहोत. त्यात आम्ही यशस्वी झालो तर या माणसामधील करुणा आणि सौजन्य, विनोद आणि साधी जीवनपद्धती, धैर्य आणि शहाणपणा यांचे दर्शन आम्ही जगाला घडवू शकू. हा चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणारी व्यक्ती म्हणेल की, हा माणूस किती चांगला होता. आणि त्याचे अनुकरण करणे आपल्यासाठी किती लाभदायक ठरेल.’’ हा चित्रपट अ‍ॅटनबरो दिग्दर्शित करणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
हे सारे डिसेंबर १९६४ मध्ये घडले. पण हा चित्रपट प्रत्यक्ष तयार होण्यासाठी १८ वर्षांचा काळ लागला. हा उशीर का झाला? चित्रपटासाठी पैशाची उपलब्धता हा मोठा प्रश्न होता. सुरुवातीला एमजीएम कंपनीने हा चित्रपट काढण्यास संमती दिली होती. पण मग त्यांनी माघार घेतली. चित्रपटाचे संवादलेखन करण्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू झाला. थॉमस मोर या विषयावर नाटक लिहिणारे रॉबर्ट बोल्ट यांनी चित्रपटाचे संवाद लिहावेत, असे कोठारी यांना वाटत होते. बोल्ट यांनी काही प्रसंगाचे लेखन केले. त्यानंतर त्यांनीही या प्रकल्पातून अंग काढून घेतले. त्यामुळे चित्रपटाचे काम रेंगाळले. कोठारी आणि अ‍ॅटनबरो यांच्यात काही मतभेद झाले (त्याची कारणे समजली नाहीत). त्यामुळे कोठारी यांनी डेव्हिड लिन यांना दिग्दर्शन करण्यास सांगितले. कोठारी यांनी १९६५ आणि ६८ साली भारतात येऊन लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची भेट घेऊन या चित्रपटासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. १९६९ मध्ये महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी होत असताना हा चित्रपट तयार व्हावा, असे कोठारी यांना वाटत होते; पण ते होऊ शकले नाही. पुढे १९७० साली कोठारी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे डेव्हिड लिन यांचा उत्साहही कमी झाला. सुदैवाने अ‍ॅटनबरो यांना हा चित्रपट निघावा असे वाटत होते. सतारवादक रविशंकर यांच्या प्रोत्साहनाने अ‍ॅटनबरो यांनी हा चित्रपट तयार करण्याचे मनावर घेतले. त्यासाठी त्यांनी भारत, अमेरिका आणि इंग्लंड येथून निधी जमवला. या चित्रपटाच्या निर्मितीची कथा अ‍ॅटनबरो यांनी ‘सर्च आॅफ गांधी’ या पुस्तकात नमूद केली आहे. त्यात त्यांनी कोठारी यांचे ऋण मान्य केले आहे. चित्रपटाच्या अर्पणपत्रिकेत नेहरू आणि माऊंटबॅटन यांच्यासह कोठारी यांचे नावही त्यांनी नमूद केले आहे.
अ‍ॅटनबरोंचा ‘गांधी’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला. त्याला आठ आॅस्कर पुरस्कारही मिळाले. पण चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाचे स्वागत करताना हात आखडता घेतला असे दिसते. चित्रपटामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्त्वांचा समावेश नसल्याबद्दल काहींनी टीका केली.
मोतीलाल कोठारी यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखकासाठी काही सूचना लिहून ठेवल्या होत्या. त्यात महात्मा गांधींचे गरिबांसाठीचे कार्य, त्यांचा अन्यायाविरुद्धचा लढा आणि कोणत्याही गोष्टीचा स्वत:वर प्रयोग करून मगच ती अमलात आणण्याचा अट्टहास यांचा समावेश होता. महात्मा गांधींसमोर त्या काळात ज्या गोष्टी होत्या, त्या आजही अस्तित्वात आहेत. गरिबी, वर्गसंघर्ष, वांशिक भेदभाव आणि धार्मिक असहिष्णुता आणि सर्वांत महत्त्वाचे राष्ट्रीय व वैचारिक संघर्ष, जे हिंसाचाराला जन्म देत राहिले. दरम्यान, मोतीलाल कोठारी यांच्या प्रेरणेतून आणि रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या प्रयत्नांतून निर्माण झालेला ‘गांधी’ चित्रपट आजही बघितला जातो आणि त्यावर जगात सर्वत्र चर्चा होत असते.

Web Title: The common man behind 'Athenber's' Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.