कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात संवादाचे माध्यम महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:32+5:302020-07-16T06:38:58+5:30
हिंसाचार करणारी व्यक्ती कोणी अट्टल गुन्हेगार नसते किंवा तिच्यावर होणारी हिंसा छळ हा कुठे चौकात वा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात व जवळच्या व्यक्तीकडून होत असतो.
- अॅड. सुनीता खंडाळे (महिला व बाल विषयाच्या अभ्यासक)
कौटुंबिक हिंसाचार या अत्यंत ज्वलंत व संवेदनशील विषयावर अजूनही मोकळेपणाने बोलले जात नाही. समाज काय म्हणेल, या एका गोष्टीमुळे बहुतांशजण त्रास सहन करतात. फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष, लहान मुलेही याचे बळी आहेत. कौटुंबिक हिंसाचार हा केवळ शारीरिक छळ नसून शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक, आदींचा त्यात समावेश होतो. विशेषत: अपत्य नसल्यामुळे स्त्रीला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे असे प्रकार घडतात. तसेच मनाविरुद्ध गर्भधारणेची सक्ती करणे, तिचा जीव धोक्यात घालणे, तिच्या नातेवाइकाकडे हुंड्याची मागणी करणे, आदी अनेक बाबी कौटुंबिक हिंसाचारात मोडतात.
हिंसाचार करणारी व्यक्ती कोणी अट्टल गुन्हेगार नसते किंवा तिच्यावर होणारी हिंसा छळ हा कुठे चौकात वा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात व जवळच्या व्यक्तीकडून होत असतो. या प्रकाराला छोट्या-मोठ्या कुरबुरींपासून सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रिया माघार घेतात; पण कोणतीही गोष्ट सहनशीलतेच्या पलीकडे गेली की, त्या माघार घेत नाहीत. गेल्या काही दिवसांत मला आलेले कॉल्स आणि त्यावर झालेल्या संभाषणावरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या की, कौटुंबिक वाद झाला तर बहुतांश स्त्रिया माघार घेऊन तडजोड करतात. असे असूनही बºयाचदा प्रत्यक्षात मात्र तिला सासरचे लोक अपमानित करतात. तुझेच काहीतरी चुकलं असेल, तू रागीट आहेस, तू सांभाळून घेतलं पाहिजे असे तिच्यावर बिंबविले जाते. त्यांना मात्र कोणी काही सांगत नाहीत. अशा वेळेस तिला माहेरी जावेसे वाटले, तर तिथे तिला खरीखोटी ऐकविली जाते.
काही ठिकाणी तिला माहेरचाही प्रतिसाद मिळत नाही. एवढा खर्च करून घरच्यांनी लग्न लावून दिले. हुंडा दिला. दागिने दिले आणि आता त्यांना सांगितले तर त्यांना ते सहन होणार नाही, या भीतीने स्त्रियाही फार बोलत नाहीत. अशा वेळेस त्यांचा मानसिक त्रास वाढू लागतो. सतत अशी वेळ येत राहिली, तर पती-पत्नीमधील प्रेम हळूहळू लोप पावू लागते. मग वाद विकोपाला जातो. शारीरिक संबंधात तणाव येतो. बºयाचदा जबरदस्ती होते. स्त्रिया प्रतिकार करू लागतात. परिणामी, हिंसा वाढू लागते. ज्याची परिणती स्त्रीने घर सोडून जाणे, घटस्फोट घेणे किंवा आत्महत्या करणे यांपैकी कशातही होऊ शकते.
जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी केवळ स्त्रियाच आहेत असं नाही, तर कित्येक पुरुषही आहेत. बºयाच वेळा पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांना खोट्या आरोपाखाली अडकविले जाते. आपल्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषावर अन्याय, अत्याचार होतो, हे कोणी मान्यच करीत नाही. त्यामुळे पुरुष याविषयी कुठेही तक्रार करीत नाहीत व कोणी यासंदर्भात तक्रार केलीच, तर त्याला पुरुषासारखा पुरुष तू बायकांसारख्या काय तक्रारी करतोस, असे म्हटले जाते. तूच तुझा विषय संपव, असे सल्लेही दिले जातात आणि त्यातूनच मन:स्ताप, दारूचे व्यसन, कटकटी यांमुळे घरातील वातावरण बिघडते आणि त्यातूनच हिंसाचार वाढीस लागतो.
लॉकडाऊनपूर्वी असे समजले जायचे की, पती-पत्नीमध्ये नीट संवाद होत नसल्याचे कारण हे आहे की, दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे समज-गैरसमज वाढतात. त्यातूनच वाद निर्माण होतात; परंतु लॉकडाऊनमुळे घरी राहण्याची जेव्हा सक्ती केली, त्यावेळी मात्र हद्दच झाली. बºयाच ठिकाणी एकमेकांचा अतिसहवासही नकोसा झाला आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली. ह्या विषयाने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले. त्यामुळे स्त्रियांना तसेच बालकांना संरक्षण मिळावे यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. परंतु, हा कौटुंबिक वादाचा विषय असल्यामुळे आपल्या घरातील वाद स्वत: सोडविण्याचा प्रयत्न करणेच योग्य. कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या वाचल्या की साहजिकच आपल्याला चीड येते आणि हे थांबविण्यासाठी आपण काय करू शकतो, असा विचार करतो. मी म्हणेन, कौटुंबिक हिंसाचारात वाढ होऊ न देण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत.
बºयाच वेळेला कौटुंबिक प्रकरण म्हणून आपण त्यात हस्तक्षेप करीत नाही आणि पीडितही कुटुंबीयांच्या भीतीपोटी कुणाला काही सांगत नाही. अशावेळेस आपण पोलिसांकडे तक्रार करावी किंवा सामाजिक संस्थांना कळविल्यास ती पीडितेसाठी एकप्रकारची मदत ठरू शकते. कौटुंबिक हिंसाचार या अत्यंत नाजूक व भावनिक विषयावर आपण सर्वांशी बोलले पाहिजे. स्त्री असो वा पुरुष, आपल्याला दैनंदिन जीवनात येणाºया समस्यांवर जवळच्या व्यक्तींशी चर्चा केली पाहिजे. यातून अनेक प्रश्न सुटतात आणि विचारपूर्वक व सामंजस्याने केलेले भाष्य फायद्याचे ठरते. असे करून तर बघा, नक्कीच यामुळे आपल्यातील वाद तर दूर होतीलच; शिवाय आपल्यातील चांगला संवाद इतरही कुणाचे आयुष्य सुंदर बनवू शकेल आणि तुमचे नाते विकसित व्हायला मदत होईल.
संवादाची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून होऊ शकते. त्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही. आपली गरज आणि अपेक्षा यातील फरक कळायला पाहिजे. केवळ गरजांचाच विचार करून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यास त्या सहज पूर्ण होऊ शकतील. संयम व समजूतदारपणामुळे आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान टिकविण्यात यशस्वी होऊ. शेवटी कुटुंबाच्या आनंदाशिवाय काहीही महत्त्वाचे नाही, हे मात्र खरे.