संवाद कायम ठेवायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:21 AM2020-06-24T03:21:45+5:302020-06-24T03:22:12+5:30

म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का?

Communication must be maintained | संवाद कायम ठेवायला हवा

संवाद कायम ठेवायला हवा

Next

-डॉ. राजेंद्र बर्वे
‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे,’ असे कवी मंगेश पाडगावकर यांनी जीवनाविषयी फार सुंदर शब्दांत लिहून ठेवले आहे. जीवन सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगायला पाहिजे, असे जेव्हा वाटते, तेव्हा नैराश्य खूप लांब पळून गेलेले असते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नैराश्य आपली पाठ सोडत नाही, असं उगाच आपल्याला वाटते आणि माणसे या मानसिक आजारात नैराश्याच्या गर्तेत सापडतात. त्यातूनच आयुष्याकडे बघण्याची नकारात्मक भावना तयार होते. सध्याच्या पिढीला संघर्ष म्हणजे भीतीचे ओझे वाटू लागते आणि म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का?
आज दहशतवादापेक्षाही भेसूर अशी समस्या आपल्या सगळ्यांमध्ये श्वास घेत आहे ती म्हणजे आत्महत्या. दरवर्षी जगात आठ लाखांहून अधिक आत्महत्या होतात, असे आकडे सांगत असले तरी अशा गंभीर समस्येकडे सहज दुर्लक्ष केले जात आहे. ‘डिप्रेशन’ किंवा ‘नैराश्य’ हा मानसिक आजार आहे आणि त्यावर उपचार आहेत. मात्र, मुळात आजार म्हणून नैराश्येकडे पाहण्याची आपली मानसिकता नाही. भाव-भावनांनी आपले जग व्यापलं आहे. नैराश्य, औदासीन्य यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आक्रमकता, विवशता, अलिप्तता, विसंवाद या विविध रूपांत त्याचे पडसाद आपल्या जीवनावर पडत असतात. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती यातनामय, व्याकुळ आणि असहाय्य अशी होते. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तीला योग्यवेळी, योग्य उपचार न मिळाल्याने आजार वाढत जाऊन त्याचा शेवट आत्महत्येसारख्या घटनेत होत असतो.


त्यातच आत्महत्या करण्याच्या मानसिकतेकडे विकृती म्हणून न पाहता एक मानसिक त्रास म्हणून समाजाने पाहिले पाहिजे. अतिशय असहाय्य, कोणीच मदत करू शकणार नाही, कुठलाच मार्ग उपलब्ध नाही, अशावेळी या निर्णयापर्यंत ती व्यक्ती कशी पोहोचते, हे समजावून घेणे अशावेळी जास्त गरजेचे आणि आवश्यक आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती लेचीपेची आहे, कमजोर आहे, कमकुवत आहे असे मानणे चुकीचे आहे. ती व्यक्ती एका विशिष्ट स्थितीला पोहोचलेली असते. ‘पळवाट किंवा सत्यापासून दूर जाण्याचा मार्ग’ अशा शब्दांत आत्महत्येची सर्रास केली जाणारी व्याख्या करण्याइतपत ते सोपे, सहज नसतेच. त्या स्थितीमध्ये दोन प्रकारच्या भावना त्या व्यक्तीच्या मनात असतात. ‘फ्लाईट’ म्हणजे त्या परिस्थितीतून पळ काढणे किंवा ‘फाईट’ म्हणजे परिस्थितीचा सामना करणे. अशात जर दोन्ही प्रतिसाद त्या व्यक्तीला देता आले नाहीत, तर तिसरा प्रतिसाद उमटतो तो म्हणजे या सगळ्यांचा शेवट.
मुळात आत्महत्या या गरीब-श्रीमंत अशा सर्व वर्गांमध्ये होत असतात. आत्महत्येचा विचार हा मेंदूतील जैव रासायनिक बदल असतो. त्याक्षणी त्या व्यक्तीला तातडीने मदत मिळणे गरजेचे असते. मग ती व्यक्ती शेतकरी असो वा उद्योगपती..! समाजमनाच्या मानसिक स्वास्थ्याची पडझड होण्यामध्ये सामाजिक दडपणही तितकेच जबाबदार आहे. आपला आपल्याशी असणारा संवाद जेव्हा तुटतो, तेव्हा स्वत:ला कमी लेखणारा, आपल्यातीलच दोषांवर टीका करणारा त्याविषयी प्रचंड नकारात्मक होतो आणि तुकोबा म्हणतात तसे, ‘आपुलाची वाद आपणाशी’ अशी अवस्था होते. अशा परिस्थितीचे आणि त्या व्यक्तीच्या मानसिकतेचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे असे विचार मनात येऊ लागल्यानंतर तत्काळ उपचारासाठी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणजे हेल्पलाईन मिळायला हवी. अर्थातच त्या व्यक्तीला पुढाकार घेऊन त्याला मदत करण्यासाठी कुणीतरी असणे गरजेचे आहे. आत्महत्या करणाºया प्रत्येकाला जगायचे असतेच. त्या अखेरच्या क्षणीदेखील आशेचा सूक्ष्म किरण हवासा वाटतो. दु:खाच्या यातायातीत आपण एकटे नाही, हा विचार मनाला आधार देतो. नैराश्य हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार किंवा मनोवस्था आहे. त्यामुळे त्या अवस्थेतून बाहेर पाडण्यासाठी त्याचे योग्यवेळी निदान व्हायला हवे आणि त्यावर उपचारही.

आपल्या आयुष्यात असंख्य ताण-तणाव असतात. ते सांभाळणे, त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. मनात निर्माण झालेले हे तणाव साचत गेले की, त्याचे रूपांतर चिंता, काळजी, अस्वस्थता यात होते; म्हणूनच वेळच्या वेळी अशा भावनांचा निचरा करता आला पाहिजे. सध्या स्वस्थपणे स्वत:शी विचार करण्यासही आपल्याला वेळ नाही. हा मनाशी मनाचा संवाद घडणे खूप गरजेचे आहे. हे मनाचे संतुलन राखले पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करून एकमेकांना आनंद वाटेल, असा संवाद साधायला हवा. ताण-तणाव हा आजच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. दु:ख नसेल तर आनंदाचा आस्वादही घेता येणार नाही. फक्त हे दु:ख मनाला किती लावून घ्यायचे, याचा तारतम्याने विचार करायला हवा आणि त्याकरिता स्वत:साठी दिवसातील काही मिनिटे राखून ठेवायला हवीत तसेच सामाजिक बांधीलकी जपायला हवी आणि संवाद कायम ठेवायला हवा इतकंच काय ते...!
शेवटी लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे आत्महत्या हा मानसिक आजाराच्या हिमनगस्वरूपी आकाराचा फक्त एकदशांश भाग असतो. बाकीचे नऊदशांश जगामध्ये आपल्यातच असतात आणि अशांपर्यंत आपण पोहोचायला हवे, त्यांना विश्वासाने व्यक्त व्हायला त्यांना वेळ, संधी दिली पाहिजे...!
(मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई)

Web Title: Communication must be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.