सीताराम येचुरींना रोखण्याचा कम्युनिस्टांचा नादानपणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 08:13 AM2020-03-10T08:13:13+5:302020-03-10T08:15:46+5:30

येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली.

Communist nepotism to stop Sitaram Yechury! | सीताराम येचुरींना रोखण्याचा कम्युनिस्टांचा नादानपणा!

सीताराम येचुरींना रोखण्याचा कम्युनिस्टांचा नादानपणा!

Next

- राजू नायक
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सांसद व बाहेरील एक सडेतोड नेते सीताराम येचुरी यांची राज्यसभेतील अनुपस्थिती आता पुढच्या काही काळात आपल्याला तीव्रतेने जाणवणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत पश्चिम बंगालमधून काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठविण्यास नकार दर्शविण्यात आला. जो पक्ष तृणमूल काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने सध्या बंगालमध्ये भाजपाविरोधात तीव्र लढे उभारतो आहे, तो राज्यसभेसाठी काँग्रेसची मदत घेण्यास प्रतिकूलता व्यक्त करतो आहे, ही तत्त्वनिष्ठेच्या तकलादूपणाची जशी गोष्ट आहे तशीच शहाणपणाचीही नाही, हे स्पष्टपणे सांगावेच लागेल. लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाकडे देशात तत्त्वांवर आधारित जनमत तयार करणे व भाजपाविरोधात लढताना विरोधी पक्षांची प्रखर शक्ती उभी राहणे याबाबत अधिक जबाबदारी आली आहे. दुस-या बाजूला पश्चिम बंगालमध्ये आता नगरपालिकांच्या निवडणुकाही निकट येऊन ठेपल्या आहेत. भाजपाने या राज्यात विशेषत: सीमावर्ती भागात ज्या पद्धतीने हातपाय पसरविले आहेत तो नक्कीच विरोधी पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे.


सीमाभागात अल्पसंख्याकांविरोधात जनमत धुमसतेय याबद्दल शंका नाही; परंतु त्याच मुद्द्यावर जहालवाद निर्माण करून देशात असहिष्णू वातावरण तयार करीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष काही एकटा लढू शकणार नाही. त्यासाठी त्या पक्षाला नक्कीच काँग्रेसची मदत मिळाली तर या लढ्याची ताकद वाढली असती. या संदर्भातील पार्श्वभूमी अशी की सीताराम येचुरी यांना काँग्रेस पक्षाने स्वत:हूनच मदत देऊ केली होती. येचुरी गेली किमान १० वर्षे संसदेत काँग्रेसबरोबर काम करीत आहेत व त्यांची साथसंगत विरोधी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली. येचुरी यांचे राजकीय कौशल्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामुळे विरोधी पक्षांना सतत कार्यरत ठेवण्यात व संयुक्त हल्ले चढविण्यात नेहमी फायदा होत आला. स्वत: काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर व्यूहरचना तयार करताना येचुरी दिसले व काळाचीही तीच गरज आहे.

भाजपा जेव्हा विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करते, तेव्हा विरोधकांमधील ऐक्य कायम राखणे व त्यासाठी सतत कार्यक्रम आखणे हाही युद्धनीतीचाच भाग बनतो. येचुरींसारखे नेते त्यासाठी सतत दारूगोळा पुरवत आले व त्यांची प्रतिमाही या लढय़ाला देशव्यापी फायदेशीर ठरत आली आहे. आता येचुरींना राज्यसभेवर जाण्यापासून रोखणे म्हणजे विरोधी पक्षांची मोहीम निश्चितच कमकुवत बनविणे! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला १६ टक्के मते गमवावी लागून त्यांचा एकही सदस्य विजयी झालेला नाही. ही नामुष्की स्पष्ट करते की हा पक्ष वास्तवापासून वेगाने दूर सरकू लागला आहे. केवळ राजकीय पराभवच नव्हे तर उद्धटपणा आणि राजकीय मूर्खपणाने त्याला ग्रासले आहे. येचुरी यांना राज्यसभेवर पाठविण्यास अपयश येणे याचा अर्थच कम्युनिस्ट पक्ष देशातील राजकीय वास्तवापासूनही दूर सरकला असा निघणार असून नागरिकत्व कायद्याविरोधात सत्ताधारी पक्षाला रोखण्यातील फोलपणा त्यामुळे आणखीनच सामोरे येणार आहे व विरोधी पक्षांबाबत लोकांचा भ्रमनिरास आणखी गडद होईल.

Web Title: Communist nepotism to stop Sitaram Yechury!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.