कम्युनिस्टांनी इटलीला लोटले कोरोना संकटात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:27 AM2020-04-16T00:27:18+5:302020-04-16T00:29:09+5:30
व्हॅटिकन सिटीनेही आपली गेट बंद करून घेतली असून, सभोवतालच्या २० फूट उंच कुपणभिंतीबाहेर सशस्त्र पहारेकरी पहारा देत आहेत. आपण सर्वजण मिळून सहा कोटी नागरिक ‘लॉकडाऊन’मध्ये आहोत.
जिआकोमिनो निकोलाझो
इटलीच्या दक्षिणेकडील लोम्बार्डी प्रांतातील मॉन्तेसाल्वो या छोट्याशा गावातील घरात अनिच्छेने मी एकटाच बसलो आहे. गेल्या रात्रभरात कोरोनाने आणखी ६०२ लोक दगावल्याचे आणि २ हजार ९७२ लोकांना नव्याने लागण झाल्याचे मला आताच समजले. याने इटलीतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या २१ हजार ०६७ वर, तर बाधितांची संख्या १ लाख ६२ हजार ४८८वर पोहोचली आहे. बाधित झालेल्या ३७ हजार १३० व्यक्ती आतापर्यंत बऱ्या झाल्या आहेत. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. (ही आकडेवारी १३ एप्रिलच्या रात्री ८.३० पर्यंतची आहे.) आल्प्स पर्वतरांगांमध्ये उंचावर वसलेल्या शहरांपासून ते सिसिलिया आणि सार्देनिया या प्राचीन समुद्र किनाऱ्यांपर्यंतची इटलीतील बहुतांश शहरे ओस पडली नसली तरी ती भुताटकीची शहरे होण्याच्या मार्गावर आहेत. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत तेथे असलेली पर्यटकांची, व्यापार-उदिमाची आणि रोजच्या दैनंदिन जीवनाची गजबज तेथे दिसत नाही.
व्हॅटिकन सिटीनेही आपली गेट बंद करून घेतली असून, सभोवतालच्या २० फूट उंच कुपणभिंतीबाहेर सशस्त्र पहारेकरी पहारा देत आहेत. आपण सर्वजण मिळून सहा कोटी नागरिक ‘लॉकडाऊन’मध्ये आहोत. इथे जणू युद्धभूमीवर असल्यासारखे वाटतंय. अदृश्य शत्रूने चोरपावलांनी शिरकाव करून आम्हाला आमच्याच घरांत कैद करून टाकले आहे. पुढे वाचल्यावर तुम्हाला कळेल की, असे काही येऊ घातले आहे याची ज्यांना ज्यांना माहिती होती किंवा माहिती असायला हवी होती, असेही काही लोक आहेत. याचा दोष कोणाला द्यायचा. एखाद्या चक्रीवादळासारखी डोकं फिरण्याची ही अवस्था सर्वत्र घोंगावत असताना दोषी कोण, हे मला शोधावेच लागेल. त्यामुळे सध्या मी फावल्या वेळात (तो तर सध्या भरपूर आहेच.) खोलवर खोदून संशोधन करतोय. त्यातून हे सर्व कसे झाले हे जेव्हा मला समजले, तेव्हा तर मी हादरूनच गेलो. कोणाकडून कोणाला संसर्ग झाला व एकाला झालेला संसर्ग झपाट्याने कसा पसरत जातो, याचे गणिती त्रैराशिक सांगून मी तुम्हाला बोअर करणार नाही. माझ्या मते, हा विषाणू इटलीत कसा आला हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे सर्व कम्युनिस्टांमुळे झाले आहे. कसे ते स्पष्ट करतो. याची सुरुवात २०१४ मध्ये झाली. बनाव करण्यात पटाईत असलेले ‘पार्टिटो डेमोक्रॅटिको’चे (म्हणजे इटलीतील कम्युनिस्ट पक्षाचे) नेते व फिरेन्झचे (फ्लॉरेन्स) माजी मेयर मात्तेओ रेन्झी बºयाच खटपटीने इटलीचे पंतप्रधान झाले. तुम्हाला नीट कल्पना यावी म्हणून सांगतो की, हे मात्तेओ रेन्झी बराक ओबामाही बॅरी गोल्डवॉटर वाटावेत इतके कमालीचे डावे आहेत!
रेन्झी इटलीला अनामिक गर्तेत नेत असतानाच इटलीच्या अर्थव्यवस्थेत विचित्र गोष्टी घडू लागल्या. बँका कोसळल्या, पण बंद झाल्या नाहीत. कर्मचाºयांची निवृत्तीची वये वाढविली गेली. काही कारणांनी पेन्शन फंडांना मात्र ओहोटी लागली. राष्ट्रीय विक्रीकर (आयव्हीए) १८ वरून २०, २१ आणि नंतर २२ टक्के असा सतत वाढत गेला. हे सर्व आर्थिक पोरखेळ सुरू असतानाच दुसरीकडे इटलीच्या उत्तरेत चिनी लोकांनी स्थावर मालमत्ता आणि स्थानिक व्यापार-व्यवसाय विकत घेण्याचा सपाटा सुरू केला. रेन्झी आणि चिनी लोकांचा मी एकत्रित उल्लेख करण्याचे कारण असे की, याच काळात इटली आणि चीन सरकारमध्ये अनाकलनीय साटेलोटे सुरू झाले. इटलीच्या अर्थव्यवहाराच्या दूरसंचार, कारखानदारी आणि फॅशन उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये चीन जी मुसंडी मारत होते, त्याच्याकडे हेतूपुरस्सर कानाडोळा केला जात होता.
थोडक्यात सांगायचे तर इटलीचे कायदे व युरोपीय संघाचे अमेरिका तसेच ब्रिटनसोबत झालेले व्यापार करार यांना जराही न जुमानता चीनची हे मालमत्ता आणि उद्योग काबीज करणे बिनदिक्कत सुरू होते. याच्याविरुद्ध अमेरिकेत बराक ओबामांनी किंवा ब्रिटनमध्ये जेम्स कॅमेरून यांनीही ब्रदेखील काढला नाही. खरं तर या तिन्ही देशांमध्ये लोकांपुढे हे येऊच दिले गेले नाही. २०१४ मध्ये ज्यांचे मूल्यांकन १०० दशलक्ष युरोपेक्षा कमी होते, अशा कंपन्या ताब्यात घेऊन चीनने इटलीच्या अर्थव्यवस्थेत पाच अब्ज युरो रक्कम ओतली. २०१६ मध्ये रेन्झी नाचक्की होऊन पंतप्रधान पदावरून गेले तोपर्यंत चीनची ही कंपन्यांची खरेदी ५२ अब्ज युरोंहून अधिक झाली होती. त्यानंतर लक्षात आले की, ३०० हून अधिक कंपन्या, म्हणजे एकूण प्रमुख इटालियन कंपन्यांपैकी २७ टक्के कंपन्या चीनच्या घशात गेल्या होत्या. इटलीतील प्रमुख दूरसंचार सेवा देणारी कंपनी (टेलिकॉम ) आणि ‘ईएनआय’ यांसारख्या प्रमुख ग्राहक सेवा कंपन्या आता चीनमधील सरकारी संस्थांच्या मालकीच्या आहेत. दूरसंचार क्षेत्रात हुआवेर्ई या चिनी कंपनीने मिलानोच्या सेग्रेट या उपनगरांत एक कारखाना सुरू केला आहे. तेथे त्यांनी त्यांचे पहिले संशोधन केंद्र उभारून मायक्रोवेव्हच्या संशोधनातून आज ज्याने धडकी भरते ते ‘५-जी’ मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले.
फियाट-क्रायस्लर, प्रिझमायन आणि टेरना या प्रमुख इटालियन कंपन्यांचे नियंत्रणही आता चीनच्या हाती गेले आहे. सांगितले तर थक्क व्हाल, पण तुम्ही मोटारीला नवा पिरेल्ली टायर बसविलात तरी त्याचा नफा चीनच्या तिजोरीत जमा होतो. केमचायना या चीनच्या अवाढव्य रसायन उद्योगातील कंपनीने आपली ही पिरेल्लीही गिळंकृत केली आहे! राहता राहिली युरोपमधील यॉट बांधणारी सर्वांत प्रतिष्ठित फेरेटी यॉट््स ही कंपनी. तीही फेरेटी कुटुंबाच्या मालकीची राहिलेली नाही! चीनने सर्वांत जास्त पैसा ओतला तो इटलीच्या फॅशन उद्योगात. पिंको पॅलिनो, मिस सिक्स्टी, सर्जिओ ताच्चनी, रॉबर्टा डी कॅमेरिनो व मरिएल्ला बुर्रानी हे आपले आघाडीचे फॅशन ब्रँड १०० टक्के चीनचे झाले आहेत. डिझायनर साल्वातोरी फेर्रागामो यांनी १६ टक्के, तर कॅरुसोने ३५ टक्के भांडवल चीनला विकून टाकले. यातही सर्वांत गाजलेली खरेदी होती क्रिझिया फॅशन कंपनीची. आशियातील उच्चभ्रूूंचे तयार कपडे बनविणाºया शेनझेन येथील मॅरिसफ्लोर्ग फॅशन कंपनीने ती गिळून टाकली.
इटलीतील कंपन्या विकत आणि ताब्यात घेण्याचा चीनचा हा धडाका सुरू असताना रेन्झी यांनी त्यांना मुक्तद्वार दिले. त्यांना अनेक वेळा कस्टम्स तपासणीतूनही जावे लागले नाही. अक्षरश: हजारो चिनी मिलानोमार्गे बेकायदा आले आणि जाताना पैसा, तंत्रज्ञान व इटालियन कंपन्यांच्या व्यापारी गुपितांची भरभरून लूट घेऊन परत गेले. आणखी काही हजार चिनी लोक मिलानो आणि लोम्बार्डीच्या अन्य औद्योगिक शहरांमध्ये बेकायदा शिरले होते, त्यांना सोयिस्करपणे गायब होऊ दिले गेले आणि तेच लोक नंतर शिंपी म्हणून अवतरले व ‘मेड इन इटली’ची लेबले लावून भन्नाट फॅशनेबल कपडे रेन्झी सरकारच्या कृपेने तयार करू लागले. इटलीमध्ये सत्तांतर होऊन ‘लेगा नॉर्ड’ पक्षाचे मात्तेओ सॅल्विनी सत्तेवर आल्यावर चिनी लोकांचे इटलीमधील हे मुक्त येणे-जाणे बंद झाले. त्यांनी बेकायदा देशात शिरलेल्या या चिनी लोकांचे अड्डे बंद करून त्यांना देशाबाहेर काढण्याची पद्धतशीर मोहीम हाती घेतली. पण, सॅल्विनी यांची सत्ता अल्पजीवी ठरली. इटली हा कम्युनिस्ट देश आहे. सोशिआलिझम या देशाच्या डीएनएमध्येच भिनलेला आहे. सॅल्विनी सत्तेवरून दूर होताच कम्युनिस्ट पक्षाने ज्युुसेप कॉन्ते यांच्या सांगण्यावरून देशाची बंदरे पुन्हा खुली केली. पुन्हा मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकन देशांतून कोणतीही वैध कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांचे अनिर्बंध लोंढे इटलीमध्ये यायला सुरुवात झाली.
पुन्हा चिनी लोकांना पूर्वीप्रमाणे मुक्तद्वार मिळाले व यावेळी प्रामुख्याने चीनच्या वुहान प्रांतातून लोक मिलानमध्ये दाखल होऊ लागले. गेल्या डिसेंबरमध्ये जेथे प्रामुख्याने चिनी लोकांची वस्ती होती, अशा लोम्बार्डीच्या भागांत कोरोनाचा शिरकाव झाल्याची पहिली कुणकुण लागली. हा विषाणू वुहानमधूनच येथे आणला गेला, यावर वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये जराही दुमत नाही. यंदाच्या जानेवारीच्या अखेरपर्यंत अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लोम्बार्डीमधील इस्पितळे आणि दवाखाने या रुग्णांनी तुडुंब भरून गेले. आता तर तेथील व्यवस्था पार कोलमडून पडली आहे.
इटलीच्या अतिडाव्या राजकीय नेत्यांनी खुल्या सीमा आणि सामाजिक न्यायाचे कार्यक्रम राबवून देश विकून टाकला व देशवासीयांचा विश्वासघात केला. आताच्या या साथीमध्ये इटलीची आरोग्यसेवा अत्यंत तोकडी पडली. याचे कारण एकच आहे की, यासाठी असलेला पैसा आधी रेन्झी आणि नंतर कॉन्ते सरकारने या अवैध स्थलांतरितांचे चोचले पुरविण्यावर फुंकून टाकला. २०१५ मध्ये रोमच्या पूर्वेस असलेल्या अमाट्रिसिया परिसरातील गावेच्या गावे भयंकर भूकंपाने जमीनदोस्त झाली, तेव्हा जगभरातून कसा मदतीचा ओघ आला होता, ते तुम्हाला आठवत असेल. पण, इटलीतील धर्मादाय संस्थांना खासगी देणग्या घेण्यास कायद्याने बंदी आहे. मिळालेले सर्व पैसे आणि देणग्या सरकारकडे जमा कराव्या लागतात. सरकार नंतर त्या पैशाचा त्यांना योग्य वाटेल तसा वापर करते. पण, हे वाटप करणारी सरकारी संस्था इतरांप्रमाणेच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्याही वेळी जगभरातून आलेला बराच पैसा भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचलाच नव्हता. रेन्झी सरकारने त्यातला बराच पैसा स्थलांतरितांच्या लोंढ्यावर खर्च केला.
अवैध स्थलांतरितांचा भार, सरकारचा अवास्तव आणि बेशिस्त खर्च, तसेच अकार्यक्षमता यामुळे, खासकरून तरुण पिढीत बेरोजगारी झपाट्याने वाढत गेली. सध्या बेरोजगार तरुण-तरुणींचे प्रमाण ३५ ते ४० टक्के इतके आहे. इथे प्रत्येकाला चरितार्थासाठी काही ठरावीक रक्कम हमखास देण्याचे एक फॅड सरकारने सुरू केले आहे. आरोग्यसेवांसाठी असलेला पैसा त्यासाठी उदारपणे वापरला गेला. तुम्ही काम करा अथवा करू नका; पण तुुम्ही जर ‘पीडी’ पक्षाचे असाल, तर सरकारकडून तुम्हाला ठरावीक रक्कम मिळणार म्हणजे मिळणारच. त्यासाठी, जे इमानदारीने काम करतात त्यांच्यावर सरकार कर वाढवत असते. इटलीतील कर आकारणी किती वेडेपणाची आहे याचे एक उदाहरणच देतो. तुम्ही ज्या इमारतीत राहता तिला एक किंवा अनेक बाल्कनी असतील व त्यांची सावली खाली जमिनीवर पडत असेल तर तुम्हाला त्यासाठीही सावली कर द्यावा लागतो. आणखी काही सांगायची गरज आहे?
मला जो मुद्दा मांडायचा आहे तो असा की, चिनी लोकांनी हा कोरोनाचा विषाणू इटलीत (आणि इतरही जगात) आणला. अतिडाव्या राजकारणाने व धोरणांनी त्याला खतपाणी घातले. अमेरिकाही कोरोनाशी लढत असताना त्यांना यावरून धडा घेण्यासारखा आहे. तो हा की, जो राज्यघटनेला गुंडाळून ठेवतो आणि कायद्यांचे पालन करीत नाही, अशा राजकीय नेत्याचे सरकार हाकलून द्या. अगदी साधे आणि सोपे आहे!
पाच बँका चीनच्या मालकीच्या
इटलीमधील पाच प्रमुख बँका सध्या बँक आॅफ चायनाच्या मालकीच्या आहेत. पेन्शन फंडांमधील
पैसा गुपचूप आणि बेकायदा वळवून मात्तेओ रेन्झी यांनी या बँकांना टेकू देऊन उभे केलेले होते.
त्यानंतर लगेचच चायना मिलानो इक्विटी एक्स्चेंज
सुरू झाले. इटलीतील बऱ्याचशा पैशाला चीनच्या दिशेने पाय फुटले.
चीनचे इटलीतील अर्थकारण
च्२०१६ मध्ये रेन्झी पंतप्रधान पदावरून गेले तोपर्यंत चीनकडून कंपन्यांची खरेदी ५२ अब्ज युरोंहून अधिक झाली होती. एकूण प्रमुख इटालियन कंपन्यांपैकी २७ टक्के कंपन्या चीनच्या घशात गेल्या होत्या.
च्फियाट-क्रायस्लर, प्रिझमायन आणि टेरना या प्रमुख इटालियन कंपन्यांचे नियंत्रणही चीनच्या हाती गेले. मोटारीला नवा पिरेल्ली टायर बसविलात तरी त्याचा नफा चीनच्या तिजोरीत जमा होतो.
च्चीनने सर्वांत जास्त पैसा ओतला तो इटलीच्या फॅशन उद्योगात. पिंको पॅलिनो, मिस सिक्स्टी, सर्जिओ ताच्चनी, रॉबर्टा डी कॅमेरिनो व मरिएल्ला बुर्रानी हे आघाडीचे फॅशन ब्रँड १०० टक्के चीनचे झाले आहेत.
( लेखक इटलीतील लोकप्रिय लेखक आहेत )