समाजाभिमुख उद्योजक

By admin | Published: May 7, 2016 02:34 AM2016-05-07T02:34:51+5:302016-05-07T02:34:51+5:30

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी

Community-oriented entrepreneurs | समाजाभिमुख उद्योजक

समाजाभिमुख उद्योजक

Next

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी ज्यांनी आकाशाएवढे कर्तृत्व गाजविले त्यामध्ये प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव ठळकपणे समोर येते. कल्पकतेने आणि सकारात्मक विचारांनी त्यांनी परिस्थितीवर मात केली. आजच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये प्रल्हादजींचा जन्म झाला. वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने घरची सगळी जबाबदारी अंगावर पडली. १० रुपये पगाराची नोकरी करीत असताना देशाची फाळणी झाली. या आघाताने छाब्रिया कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. अमृतसरमध्ये नोकरी करीत असताना परिचितांनी पुण्यात बोलावले. अगदी ३० रुपये पगार असलेली चांगली नोकरीही मिळाली; पण उद्यमशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बुधवार पेठेत त्यांनी इलेक्ट्रॉनिकचे दुकान टाकले. कापडविक्री केली. सायकलवर फिरून उपकरणांची विक्री सुरू केली. १९६०च्या दशकात महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाची पहाट फुटत होती. या वेळी फिनोलेक्स केबल या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल आणि ठिबक सिंचन यंत्रणा त्यांनी सादर केल्या. फिनोलेक्स पाइपने जगभर झुळझुळ पाणी फिरू लागले. इस्राईलच्या कंपन्यांनाही फिनोलेक्सशी सहकार्याचे करार करावे लागले. अवघ्या ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उद्योगसमूहाची आजची उलाढाल १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाळणीचे अश्रू अनुभवतानाच माणुसकीचा गहिवरही पाहिलेल्या प्रल्हादजींनी समाजाशी आपली नाळ कायम ठेवली. ते उत्तम मराठी बोलायचे. समाजासाठी सतत काही ना काही करण्याची त्यांना तळमळ होती. सामाजिक क्षेत्रातील कामासाठी त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ व ‘होप फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. नवे अभियंते घडविण्यासाठी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन फिनोलेक्स अकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. हिंजवडी येथे इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू केली. रत्नागिरीमध्ये शाळा सुरू केली. उद्योजकतेतून सामाजिक विकासाचा आदर्श त्यांनी घालून दिला. उद्योजकता पेरत, सामाजिक भान बाळगत आपण समाजाचे काही देणे लागतो, असे मानणाऱ्या पुण्यातील उद्योजकतेच्या सुसंस्कृत परंपरेतील एक शिलेदार प्रल्हाद छाब्रिया यांच्या रूपाने गमावला आहे.

Web Title: Community-oriented entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.