अवयव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:41 AM2018-01-29T00:41:41+5:302018-01-29T00:42:07+5:30
एखादा गायक कायम गात असतो? एखादा अॅथलेट कायम पळत असतो? एखादा लेखक कायम लिहीत असतो? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हो आहेत. म्हणजे? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?
- किशोर पाठक
एखादा गायक कायम गात असतो? एखादा अॅथलेट कायम पळत असतो? एखादा लेखक कायम लिहीत असतो? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हो आहेत. म्हणजे? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?
प्रत्येक कलाकार कायमच आपल्या कलेतच असतो. त्याला एखादा क्षणच लागतो टिचकी मारायला की लगेच कलाकार डुचमळतो, फुटतो, वाहू लागतो तो निर्मितीचा क्षण. या क्षणी कलावंत पूर्ण कलागम असतो. एरवी तो कलावंत असतोच. त्याला सगळं करावंसं वाटतं. म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर फुटबॉल खेळतच नाही असे नाही किंवा एखादा उत्तम गायक चांगलं चित्र काढूच शकत नाही वा चविष्ट भाजी करू शकत नाही, असे नाही. आपण जगण्याच्या प्रत्येक विभ्रमाशी बांधलेलो आहोत. म्हणजे ही कलात्मकता संसारातील प्रत्येक गोष्टीत आपण शोधतोच. तौफिक कुरेशी वाद्यांचं एक माहोल उभे करतात. म्हणजे ते काड्यापेटीपासून टेबलखुर्ची कोणतीही अचल वस्तू ते बोलकी करतात ही त्यांची कला. आपण या क्षणांशी बांधलेलो आहोत. पण हे जगणे माणसाशी, माणूस होणेशी निगडित आहे. म्हणजे एखादा माणूस रस्त्याने त्याच्या कामासाठी चाललेला असतो. क्षणात एखादा अपघात घडतो. त्याच्याजवळ, त्याच्यापाशी. कधी आग लागते. तो डोळ्यादेखत काही जळताना पाहतो, क्षणात तो मागचा-पुढचा विचार न करता पुढे धावतो. आगीतील माणसांना वाचवतो. स्वत:ही जखमी होतो. काजळले पण एक समाधान त्याच्या चेहºयावर असते. ते समाधान माणसांसाठी माणूस होण्याचे, माणूस असण्याचे. असा एखादा क्षण आपण साधत जगत असतो. मुंगी शिस्तीत चालत राहाते. कायम घाईत.
सुगरण इवल्याशा चोचीने घरटे बांधते. म्हणून तर सुगरणीचा खोपा म्हणतात. निसर्गाने प्रत्येक प्राणी, पशू, पक्षी ह्यांना एक इंद्रिय दिलंय. कुणाला चोच, कुणाला जीभ, कुणाला दात तर कुणाला शिंग, कुणाला नख अर्थात प्रत्येक प्राणी या संरक्षक कवचाचा वापर युद्धपातळीवरच करतो, फक्त माणूस असाय तो नखं मारतो, दात दाखवतो, जिभेचा वापर करतो. आपल्या प्रत्येक अवयवाचा बरा-वाईट वापर करतो माणूसच त्यातून प्रगती करतो किंवा वाईट कृती करतो. म्हणूनच खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात म्हणतात बघा.