कमिटमेंट पाळणारे सुपर कॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:38 AM2018-05-13T04:38:33+5:302018-05-13T04:38:33+5:30

महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने समस्त पोलीस वर्तूळ हादरून गेले. तीन दशकांची त्यांची गौरवशाली कारकिर्द पोलीस दलाची शान वाढविणारी होती

Comptroller Super Coop | कमिटमेंट पाळणारे सुपर कॉप

कमिटमेंट पाळणारे सुपर कॉप

Next

लतीफ शेख
महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने समस्त पोलीस वर्तूळ हादरून गेले. तीन दशकांची त्यांची गौरवशाली कारकिर्द पोलीस दलाची शान वाढविणारी होती. ‘सुपर कॉप’ म्हणून ओळखले जाणारे रॉय अनेकांचे रोल मॉडेल होते. या दबंग अधिकाऱ्याची अचूक निर्णय क्षमता आणि सहकाºयांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या सहकाºयाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

मांशू रॉय सरांबाबतची धक्कादायक न्यूज समजल्यानंतर उडून गेलो. क्षणभर विश्वासच बसला नाही. वाटले की चॅनेलवाल्यांकडून काहीतरी गफलत झाली असावी, मात्र माझ्या लाडक्या ‘सुपर कॉप’सोबत नियतीचा हा क्रूर खेळ प्रत्यक्षात घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर गेली दहा वर्षे एकत्र काम करतानाच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागल्या. साहेबांची सहआयुक्त म्हणून नाशिकमधून मुंबई पोेलीस दलात ‘लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर’मध्ये पदोन्नतीवर नियुक्ती झाली. त्या वेळी मी तत्कालीन प्रमुखांकडे पीए म्हणून कार्यरत होतो. नवीन साहेब आल्यानंतर शक्यतो पूर्वीच्या पीएला बदलतात. पण रॉय साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर पहिल्या दिवशी बोलावून घेत, कसलेही टेन्शन घेऊ नका, आपल्याला एकत्रित काम करावयाचे आहे, असे सांगून आत्मविश्वास वाढवून दिला. तेव्हापासून ते आजारपणाच्या दीर्घ रजेवर जाईपर्यंत त्यांनी मला सोबत ठेवले. एकत्र काम करण्याची ‘कमिटमेंट’ त्यांनी अखेरपर्यंत पाळली. शेवटच्या भेटीत त्यांनी ‘मै जल्दीही ठीक हो के वापस आऊंगा, अपने को साथ मे रहके काम करना है,’ असे म्हटले होते. त्यामुळे ते लवकरच ठीक होतील, अशी खात्री होती. मात्र दुर्दैवाने साहेबांनी अखेरचा शब्द पाळला नाही.
लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर, क्राइम, एटीएस या ठिकाणी कार्यरत असताना साहेबांची कामाची पद्धत सारखीच होती. घडलेली घटना, मिळालेली माहिती, त्याचे गांभीर्य आणि होणारे परिणाम यांचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची त्यांची विलक्षण क्षमता त्यांच्यात होती. कोणता अधिकारी, अंमलदार ती जबाबदारी योग्यपणे पार पाडू शकतो, हे समजून तातडीने त्याला फोन लावण्यास सांगत.
वरिष्ठांना तर सोडाच पण कनिष्ठ सहकारी, कॉन्स्टेबल व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक तक्रारदार, नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द ते पाळत होते. भले त्यासाठी कितीही परिश्रम करावे लागो. मुंबईच्या ‘क्राइम’ ब्रँचची सलग चार वर्षे धुरा सांभाळणारे ते एकमेव अधिकारी होते. हा कालावधी खºया अर्थाने ‘गोल्डन पीरियड’ होता. अनेक गंभीर गुन्हे, हत्याकांड त्यांनी या काळात उघडकीस आणले. वरिष्ठ अधिकारी सहसा आपल्यापेक्षा कनिष्ठाला समोर बसवून घेत नाही. रॉय साहेब मात्र त्याला अपवाद होते. पीएसआय, कॉन्स्टेबल असला तरी त्याला बसायला सांगून सविस्तर माहिती घेत, मार्गदर्शन करीत. व्यायामाची प्रचंड आवड असलेल्या साहेबांनी त्या कारणास्तव आपल्या कार्यालयीन वेळेत कधीच खंड पाडला नाही. बरोबर पावणे दहा वाजता ते हजर असत. सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागत, कितीही वेळ होऊ दे, प्रत्येक व्हिजिटरला भेटून त्याच्या समस्या, तक्रारी जाणून घेत असत. त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्याचा फॉलोअप घेत असत. एखाद्या गुन्ह्यात कोणाला खोटा आरोपी बनविणे त्यांना मान्य नसे, कोणी तपास अधिकारी कामात चुका करीत असल्यास त्याला योग्य पद्धतीने समज देत. राग विसरून मनात काहीही न ठेवता पुन्हा प्रेमाने वागत. त्यांनी कधीही एकाही अधिकाºयाला मेमो, डीओ दिला नाही, त्यांच्या या सवयीमुळे प्रत्येक जण त्यांनी सांगितलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत असे. कधी काही विरोधात घडत असले, छापून आले तरीही ते अन्य अधिकारी, मीडियाशी खुन्नस बाळगत नव्हते. त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होऊ देत नसत.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी किंवा प्रेस ब्रिफिंग असल्यास साहेब त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून जात असत. समोरच्या व्यक्तींच्या शंकाचे निरसन होईपर्यंत समजावून सांगण्याची त्यांची पद्धत होती. ‘क्राइम’ बॅँचला असतानाच माझी बायपास सर्जरी झाली. त्या वेळी सरांनी स्वत: डॉक्टरांशी बोलून सर्व व्यवस्था केली. विश्रांती घेऊन पूर्ण बरा झाल्यानंतर त्यांनी कामावर हजर करून घेतले. मी रिटायर झाल्यानंतरही त्यांनी मला सोबत ठेवले होते. आजारातून बरे होऊन ते पुन्हा नव्या जोमाने रुजू होतील, अशी आशा वाटत होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते.
(लेखक हे मुंबई पोलीस दलातील निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून हिमांशू रॉय यांच्याकडे दहा वर्षे पीए म्हणून कार्यरत होते.)
(शब्दांकन - जमीर काझी)

Web Title: Comptroller Super Coop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.