संगणकाला अकलेची शिंगे फुटली, त्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:42 AM2022-03-26T05:42:18+5:302022-03-26T05:43:20+5:30

पाठांतरबाज, आज्ञाधारी संगणक हरकाम्या, डोकेबाज झाला! शिकवू ते अचूकपणे शिकणारा इथपासून ते स्वतःहून शिकणारा असा हा प्रवास..

computer starts machine learning and develops itself | संगणकाला अकलेची शिंगे फुटली, त्याची गोष्ट

संगणकाला अकलेची शिंगे फुटली, त्याची गोष्ट

Next

- विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक

गणन क्षमता म्हणजे कम्प्युटिंग आणि डेटा म्हणजे विदा या दोन नद्यांच्या संगमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची गंगा वाहू लागली असे मागच्या लेखात म्हटले होते. ते अर्थातच चूक नाही; पण काटेकोरपणे सांगायचं तर, ते दोन तृतीयांश सत्य आहे. दोन नाही तर तीन नद्यांच्या संगमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा गंगौघ मोठा झाला, हे अधिक योग्य आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे, असे मानले जाते. त्यातील गंगा आणि यमुना नद्यांचे प्रवाह स्पष्टपणे दिसतात. पण, सरस्वती नदीचे भौगोलिक अस्तित्व दाखवता येत नाही. ती जमिनीखालून सुप्तपणे वाहते, असे मानले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेतील त्रिवेणी संगमाचेही तसेच आहे. गणन क्षमता आणि विदा हे दोन मोठे प्रवाह तर तसे स्पष्टपणे दिसतात. त्यांच्याबद्दल बरेच लिहिले बोलले जाते. पण, या दोघांना एकत्र आणणारा महत्त्वाचा पण, सुप्त असा तिसरा सरस्वती प्रवाहही तिथे आहे. त्याच्याबद्दल तुलनेने कमीच बोलले जाते.

कोणता आहे हा तिसरा प्रवाह? काय आहे त्याचे महत्त्व? प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातील तिसरा प्रवाह सरस्वती नदीचा. सरस्वती ही विद्येची देवता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या त्रिवेणीतला तिसरा प्रवाहही या सरस्वतीसारखाच. विद्यार्जनाशी म्हणजे शिकण्याच्या क्षमतेशी आणि प्रक्रियेशी संबंधित. इथे शिकायचे आहे संगणकाला म्हणजे यंत्राला. औद्योगिक क्रांतीने यंत्रांची क्षमता अनेक पटीने वाढवली, त्यांना नेमके रुप दिले आणि महत्त्वाचे म्हणजे मानवी हस्तक्षेप कमीत कमी लागेल इतके स्वयंचलित केले. १९८० ते २०२० या काळातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीने मानवी बौद्धिक श्रमासाठी स्वयंचलित बौद्धिक श्रमाचे पर्याय निर्माण केले. पण, या दोन्ही क्रांतीमध्ये एक गृहितक समान होते- माणसाने आज्ञा करायची आणि यंत्रांनी ती अचूकपणे, कार्यक्षमतेने पण, निमूटपणे पार पाडायची. स्वतःचे डोके लावायचे नाही. 



संगणकाच्या क्षेत्रावर आजही या आज्ञापालन तत्त्वाचाच बराच पगडा आहे. जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो एकदा म्हणाले होते, संगणक एकदम निरुपयोगी वस्तू आहे. ती फक्त उत्तरे देऊ शकते. एका अर्थाने त्यांना म्हणायचे होते की, संगणक प्रश्न विचारू शकत नाहीत. भाकिते करू शकत नाहीत. बरेवाईट पर्याय सुचवू शकत नाहीत. त्या अर्थाने संगणक सृजनशील नाहीत. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र आज असे फक्त आज्ञापालक किंवा पिकासो यांना वाटले तसे अ-सृजनशील राहिलेले नाही. गेली तीनेक दशके संगणकाची सांगकाम्या, पाठांतरबाज, आज्ञाधारी, पारदर्शी, पठडीबद्ध अशी प्रतिमा बदलून ती हरकाम्या, डोकेबाज, स्वयंप्रेरित, मनोज्ञ, सृजनशील करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. शिकवू ते अचूकपणे शिकणारा इथपासून ते स्वतःहून शिकणारा असा हा प्रवास आहे. सुरुवातीला कडेवर असलेल्या मुलाला पळू-पडू-धडपडू दिले तर आपले नियंत्रण कमी होते पण, त्यातून मुल सक्षम बनते.
जाण्याजोग्या नव्या जागा ते स्वतःहून शोधते. त्यामुळे एका विशिष्ट काळानंतर लहान मुलांना त्यांच्या चालीने चालणे शिकायची संधी द्यावी लागते आणि अंतर राखून त्यांच्यावर फक्त देखरेख ठेवावी लागते. संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये हे भान अधिकाधिक प्रबळ होत गेले. निश्चिततावादी आज्ञावलींच्या जागी आता संभाव्यतावादी स्वयंशिक्षण आणले पाहिजे ही जाणीव प्रखर होत गेली. वाढती गणन क्षमता आणि वाढती विदा यामुळे स्वयंशिक्षण होण्याच्या दृष्टीने पूरक स्थिती तयारही झाली होती, हे खरेच. पण, मुळात शिकायचे म्हणजे काय, त्यात यंत्राने शिकायचे ते कसे, कोणत्या कामांसाठी यासारख्या कळीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार होती. त्यासंबंधीच्या विचारांमधून, संशोधनांमधून साकारला तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा तिसरा प्रवाह- मशिन लर्निंग अर्थात यंत्रांचे स्वयंशिक्षण.



यंत्रांच्या स्वयंशिक्षणामध्ये एक गोष्ट आधारभूत तत्त्व म्हणून स्पष्ट होती. विज्ञान ज्याप्रमाणे आपल्याला भूतकाळाचे अचूक स्पष्टीकरण देण्याचा आणि भविष्याबद्दल विश्वासार्ह भाकिते करण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे स्वयंशिक्षणातून यंत्रांनीही तसेच काम करावे हेच उद्दिष्ट होते. कसा विचार करायचा हे एकदा संगणकाला शिकविले की, तो दिलेल्या विदेच्या आधारे काय विचार करायचा, कोणती भाकिते करायची हे स्वप्रेरणेने, स्वबुद्धीने ठरवू शकेल ही मशीन लर्निंगमधील मध्यवर्ती संकल्पना. हे म्हणजे शेतीसारखे. योग्य गणन क्षमता निर्माण केली, पुरेशी विदा दिली, त्यात शिकण्याची योग्य सूत्रे टाकली, भाकीत पडताळणीचे खतपाणी घातले, चुकांचे तण आणि किडे वेळचेवेळी काढत गेले की, संगणक स्वतःहून शिकत जाईल हा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.



आता खरी गरज होती ती भाकिते करण्याची, समजून घेण्याची काही वैश्विक सूत्रे आहेत का हे शोधण्याची. त्यासाठी शास्त्रज्ञांनी गणित ते चेताशास्त्र, सांख्यिकी ते उत्क्रांतीशास्त्र, तत्त्वज्ञान ते माहितीशास्त्र, गणन सूत्रे ते मानसशास्त्र व यंत्रबोली ते भाषा शास्त्र अशी अनेकानेक ज्ञान क्षेत्रे धुंडाळली. आपण शिकतो म्हणजे नेमके काय करतो याचे गणिती, सांख्यिकी, भाषिक, तात्विक, मानसशास्त्रीय आधार शोधले. शिकणे म्हणजे नेमके काय रे गणूभाऊ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांमधून यंत्र शिक्षणाचा प्रवाह मोठा होत गेला. त्यातून यंत्रांच्या स्वयंशिकण्यासंबंधी पाच मुख्य दृष्टिकोन विकसित होत गेले. त्यांची ओळख पुढच्या लेखात.
vishramdhole@gmail.com

Web Title: computer starts machine learning and develops itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.