संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:44 AM2022-06-17T08:44:33+5:302022-06-17T08:44:50+5:30

मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अशा अति-प्रगत तंत्रज्ञानांवर नैतिकतेचे रोपण कसे करता येणार?

Computers are there but ethics lost who will teach it | संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच!

संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच!

googlenewsNext

डॉ. दीपक शिकारपूर
उद्योजक, संगणक साक्षरता प्रसारक

मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अशा अति-प्रगत तंत्रज्ञानांवर नैतिकतेचे रोपण कसे करता येणार?

१९७० च्या दशकात संगणकाचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू झाला आणि गेल्या पाच वर्षांत त्यांचे स्वरूप कसे आमूलाग्र बदलले हे वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही. १९७० मधल्या महासंगणकापेक्षाही जास्त वेगवान, कार्यक्षम आणि बहुआयामी रचनेची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आज अगदी स्वस्तातल्या मोबाइल फोनमध्येही आढळते. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल, किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे. ह्याला ‘इंटेलिजंट कॉम्प्युटिंग’ असे म्हटले जाते..

संगणकाला ‘विचारक्षमता’ नसते असे मानणाऱ्यांचाही गट मोठा आहे. कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. - पण मागील काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांनी नैतिक तंत्रज्ञान हा मुद्दा चर्चेत आला आहे. एखादी  अनैतिक बाब कदाचित कायदेशीरही असू शकते. तसेच एका सामाजिक गटाला नैतिक वाटणारी बाब दुसऱ्या गटाला अनैतिक वाटू शकते. शेवटी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की तंत्रज्ञान सुरीसारखे असते. एखादे फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याचा खून करण्यासाठी; तंत्राला वापरणारे मन, विचार हे त्याचा वापर ठरवते. 

अमेरिकेत अनेक वेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुणातरी विकृत व्यक्तीने केले, पण भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल. त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. आपण एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम कोडला पॅच करून कार्यशील करू शकतो, पण प्रोग्रामरच्या मनाला कसे पॅच करणार? माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली.

या पार्श्वभूमीवर आता विकसित देशातील विचारवंत चिंतीत झाले आहेत. आगामी काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या  तंत्रज्ञानामुळे  जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध व नवीन उत्पादने बनू शकतील व बनतीलही. मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग ऊर्फ एनएलपी आणि कॉग्निटिव्ह कॉॅम्प्युटिंग या तीन अतिशय प्रगत तंत्रज्ञानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोलारा उभा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय प्रणालीला माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हा उद्देश यामागे आहे, पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह  विकृत वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. 

एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठांत नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञांना व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मलमुळे अनेक व्यक्ती डिजिटल तंत्रज्ञान वापरू लागल्या व अनेकांनी व्याप्ती वाढवली. यात ई-मेल, सोशल मीडिया, ई-व्यापार, ऑनलाइन व्यवहार यांचा समावेश होतो. यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक माहिती अनेक उद्योगांच्या हाती लागली आहे. या माहितीचा गैरवापर होताना आढळतो. याबाबतीत प्रचलित कायदे फारसे प्रभावी नाहीत. इथेच नैतिकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यवसायाचा हेतू फक्त लाभ असाच असता कामा नये, हे बाळकडू शालेय शिक्षण पद्धतीत, व्यवस्थापन उच्च शिक्षणात अंतर्भूत केलेच पाहिजे. यामुळे संगणक शास्त्रात आता एथिकल कॉम्प्युटिंग ही शाखा उदयास आली आहे. याचा अंतर्भाव सर्व माहिती तंत्रज्ञान शिक्षण संस्थानी ताबडतोब करावयास हवा. तसेच प्रचलित संगणक उद्योगांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे शिक्षण स्वखर्चाने द्यायला हवे. यामुळे कदाचित भविष्यातील सायबर गुन्हे टळू शकतील. आपल्या देशाला उच्च आध्यात्मिक  परंपरा आहे. या क्षेत्रात आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो.

deepak@deepakshikarpur.com

Web Title: Computers are there but ethics lost who will teach it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.