कॉम्रेड कन्हैया

By admin | Published: April 19, 2016 02:54 AM2016-04-19T02:54:26+5:302016-04-19T02:54:26+5:30

भाजपा आणि संघ विरोधकांच्या गळ्यातला सध्या ‘ताबिज’ असलेल्या कन्हैयाकुमारची परवाची नागपूर भेट अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली.

Comrade Kanhaiya | कॉम्रेड कन्हैया

कॉम्रेड कन्हैया

Next

भाजपा आणि संघ विरोधकांच्या गळ्यातला सध्या ‘ताबिज’ असलेल्या कन्हैयाकुमारची परवाची नागपूर भेट अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. त्याच्याबद्दल दलित चळवळीला आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. पण भाजपाविरोधी राजकीय पक्षानांही तो आपला वाटू लागला आहे. तो मोदींवर टीका करतो हेच या पक्षांच्या दु:ख निवारणाचे कारण. पण या हर्षोल्हासात त्यांच्या मूळ पक्षीय विचारांचे डबके होऊन नंतर ते तसेच साचून राहील, याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही.
परवाच्या नागपूर दौऱ्यात कन्हैयाच्या भेटीने स्थानिक काँग्रेस-राकाँ नेत्यांचे अंत:करण एवढे भरून आले की त्याच्या खांद्यावर डोके टेकवून ते रडायचे तेवढे शिल्लक राहिले. विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, प्रकाश गजभिये हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कानात अक्षरश: प्राण साठवून कन्हैयाचे भाषण ऐकत होते. मुत्तेमवार आणि देशमुखांचे सुपुत्र त्याच्या सरबराईत गुंतले होते. कदाचित या सुपुत्रांच्या राजकीय व वैचारिक जडणघडणीत काही उणिवा राहून गेल्या असतील म्हणून त्यांना आता कन्हैयाच्या सावलीत घडवायचे असावे. कन्हैया संघर्षातून, उपेक्षेतून, हलाखीच्या परिस्थितीतून घडला आहे. या नेते पुत्रांना दलितांच्या प्रश्नांबद्दल किती आस्था आणि आकलन आहे? कन्हैया ज्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पेटून उठतो, त्या व्यवस्थेतील लाभाचे हे नेते देखील वाटेकरी आहेत हे कसे विसरून चालेल? कन्हैया जे काही मांडतो ते वास्तव आहे. विद्रोह आणि क्रांती दलित चळवळीचा प्राणबिंदू. परंतु स्वार्थी नेत्यांमुळे तो संपला की काय, असे वाटत असताना कन्हैयाचा ‘तुरुंगात’ जन्म झाला. दलित, बहुजन तरुणांच्या वैचारिक प्रतिवादात आलेले एकारलेपण विवेक आणि तार्किकतेच्या कसोटीवर तपासून पाहण्याचे परिवर्तन कन्हैयाने केले आहे. तो उपस्थित करीत असलेले दारिद्र्य, शिक्षण, अस्पृश्यतेचे प्रश्न तसे जुनेच. देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण पिढ्यान्पिढ्याच्या दारिद्र्यातून, अस्पृश्यतेच्या दास्यातून हा समाज मुक्त होऊ शकला नाही. कन्हैया या शोषितांचे गाऱ्हाणे मांडतो आणि त्यांच्या अंधाऱ्या आयुष्यात उजेड नेऊ पाहातो. मोदी-संघ परिवाराला तो ‘देशद्रोह’ वाटतो. प्रस्थापित व्यवस्थेला उखडून टाकण्याचे सामर्थ्य या बंडखोरीत असल्याने त्यांना ही भीती वाटणे साहजिक आहे. मोदी, संघाबाबत कन्हैया खूपच आक्रमक असतो, त्यामुळे काँग्रेस नेत्यांना सतत गुदगुदल्या होतात. पण काँग्रेसवाले एक गोष्ट विसरतात, कन्हैयाचे पहिले टार्गेट मोदी आहेत. नंतर तो यथावकाश काँग्रेसकडे वळणार आहे. कारण काँग्रेसचे या देशावर ६० वर्षे राज्य होते. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत राहूनही दलित-आदिवासींचे प्रश्न या पक्षाने का सोडविले नाहीत, असा प्रश्न तो विचारणारच आहे. काँग्रेससोबत सत्तेची गोड फळे चाखणाऱ्या आणि आपल्याच सग्यासोयऱ्यांचे कल्याण करणाऱ्या दलित नेत्यांनाही तो फैलावर घेईलच.
आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कन्हैया कम्युनिस्ट आहे. त्याची विचारसरणी भाजपासाठी जशी अडचणीची तशीच काँग्रेससाठी गैरसोयीची आहे. तो काँग्रेस-भाजपेतर राजकारणाच्या ‘तिसऱ्या’ पर्यायाचा पुढारी आहे. या पर्यायात दलित, आदिवासींची भूमिका महत्त्वाची राहील. संघाचे आरक्षणविरोधी धोरण, रोहित वेमुलाची आत्महत्त्या अशा घटनांमुळे या समाजाला भाजपाबद्दल वाटणाऱ्या धास्तीत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या या लाखो मतांना कम्युनिस्टांच्या प्रयोगशाळेत साठवण्याचे ‘मिशन’ कन्हैयाने हाती घेतले आहे. कन्हैयाने त्याची राजकीय वाटचाल आधीच निश्चित केलेली आहे. आपल्या सामाजिक क्रांतीचे लाभ काँग्रेसला मिळू नये याची पुरेशी काळजी तो आणि त्याचे कम्युनिस्ट गुरू कसोशीने घेत आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीकडे साक्षेपी दृष्टिकोनातूनच पाहावे लागेल. असे असताना काँग्रेस नेते आपला मूळ राजकीय विचार गुंडाळून ठेवीत भाबडेपणाने त्याच्या मागे फरफटत जात आहेत. मात्र तो कन्हैया आहे. त्याचा ‘राजधर्म’ साऱ्यांहून वेगळा. त्याच्यातला हिंदुत्ववादी ‘किशन’ भाजपाने कधीचाच मथुरेत अडवून ठेवलेला. हा ‘कॉम्रेड’ कन्हैया कम्युनिस्टांचा सखा. मग काँग्रेसचे काय? त्याला नव्या ‘कन्हैया’चा शोध घ्यावा लागणार आहे.
- गजानन जानभोर

Web Title: Comrade Kanhaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.