कोंडलेली नग्नता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 10:23 AM2022-01-30T10:23:15+5:302022-01-30T10:25:52+5:30
नग्न देहांची छायाचित्रे आपल्या संस्कृतीशी संवादी नाहीत असा आक्षेप घेऊन एका तरुण छायाचित्रकाराचे प्रदर्शन सुरू होण्याआधीच थांबवण्याची घटना नुकतीच पुण्यात घडली. त्यानिमित्ताने...
- अक्षय माळी
(छायाचित्रकार)
प्रत्येक माणूस एका बंद खोलीत ‘नग्न’ देह घेऊनच वावरत असतो..पण हीच गोष्ट बाहेर उघडपणे करायची म्हटली की संस्कृतीच्या चौकटी येतात. त्या आपणच आणतो. खरंतर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्येही ‘नग्नता’ आहेच. ’खजुराहो’ ची शिल्पं बघण्यासाठी लोकं पैसे खर्च करून जातात. ती शिल्प नग्न चालतात, पण माणसं नाही. हे सगळं पाहिलं की वाटतं, हे जग आणि जगातली माणसं किती फसवी आहेत ! जे वाटतं ते मोकळेपणाने मांडता यावं एवढी साधी गरजही पूर्ण नाही होत इथे !
हो, मी नग्न छायाचित्रं काढतो. मला जे वाटतं, अस्वस्थ करतं ते मी माझ्या छायाचित्रांमध्ये बंदिस्त करतो. जे मी टिपलंय; ते कदाचित दुसऱ्याला अर्थहीन वाटू शकतं. कोणताही चित्रकार किंवा छायाचित्रकार आपण काय काढलंय हे कधीच शब्दांत मांडू शकत नाही. त्यांना ‘नि:शब्द’च राहायचं असतं ! मलाही ! चित्र किंवा छायाचित्र या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत, त्यातला अर्थ “समजावण्याची” वेळ यावी, हेच मुळात दुर्दैव !
मी मूळचा साताऱ्याचा. पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण तिथंच घेतलं. वाईट संगतीला लागलो. शाळा शिकण्याची आवड नव्हती. मग कुटुंबाने एका मिलिटरी शाळेत घातलं. तिथं आयुष्य एकदम शिस्तबद्ध झालं. रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्यात काही बदल नाही. आयुष्याला एक साचेबद्धपणा आला होता. तिथं असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये मी जीवंत राहू शकतो, असा आत्मविश्वास आला होता. दहावीनंतरची दोन वर्षेही मावशीच्या घरी शिस्तबद्धतेमध्येच गेली. तिथंच मी बंड पुकारलं होतं. सिंबायोसिसला पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर मग मी स्वत:ला खऱ्या अर्थानं व्यक्त करायला लागलो. पाच वर्षांच्या तांत्रिक जगण्यातून बाहेर पडलो होतो. सुरुवातीला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करत होतो. पण सिंबायोसिसला गेल्यावर माझ्यातला आत्मविश्वास एकदम ढासळला. सगळे इंग्रजीमध्ये बोलत. मी गावाकडून आलेलो. “तू इंग्रजीमध्ये का बोलत नाहीस?” असं एका शिक्षिकेने विचारल्यावर माझी मैत्रिण पटकन म्हणाली, ’तो नाही तर त्याचं काम बोलतं’!... मग काम बोलायला पाहिजे असं काहीतरी करायचं असं ठरवलं. केस वाढवणं, फाटक्या जीन्स घालणं असं सगळंच सुरू केलं होतं. अचानक वाइल्ड लाइफमधून फॅशन फोटोग्राफीकडे वळलो. माझ्या छायाचित्रातून आता विचार बाहेर पडायला हवा असं वाटलं.
एकदा आम्हाला ‘जेंडर स्टिरिओटाइप’’ असा एक विषय असाइनमेंटला दिला होता. खरंतर त्याचा अर्थही मला माहिती नव्हता. एका मैत्रिणीबरोबर सिगरेट ओढत होतो, तिला शब्दाचा अर्थ विचारला आणि तिने न सांगताच तो मला गवसला. मुलगी सिगरेट ओढत आहे म्हणून लोकांनी वेगळ्या नजरेने का पाहावं?- असं जाणवलं आणि तोच ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. अमेरिकेतले फोटोग्राफर राइन मँकेले यांची ’नग्न’ छायाचित्रं पाहिल्यानंतर आपणही हे भारतात करू शकतो असं वाटलं. पण त्यासाठी कुणाशी मोकळेपणाने चर्चाही शक्य नव्हती. कुणी मॉडेल्सही मिळाली नाहीत. मग स्वत:च स्वत:चीच ’नग्न’छायाचित्रं काढू लागलो. मी जेवढ्या मोकळेपणाने उभा राहू शकत होतो तेवढं कुणी राहील असं वाटत नव्हतं. सोशल मीडियावर पहिलं छायाचित्र टाकलं आणि कुटुंबात खळबळ माजली. हे स्वीकारायला कुणी तयार नव्हतं. तरीही मला हटायचं नव्हतं. “तू बरोबर करतोयस” असं सांगणारं आसपास कुणी नव्हतं. पण गोव्यातील एका मित्राचा फोन आला; तो म्हणाला, चालू दे ! खरंतर हा ‘आर्ट फॉर्म’ काय आहे हे मला शब्दांत कधी समजवता आलं नाही आणि येतही नाही. नवनवीन शब्द कानावर पडतात तसं मी सांगत जातो. त्याला कधी ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’ म्हणतो. लहानपणापासूनची जी रग अंगात साठली होती, ती या आर्ट फॉर्ममधून गवसली. जे सत्य आहे ते मी पुढं ठेवतो आहे, फक्त लोकांना ते पचत नाही. म्हणून लोक विरोध करतात. काही लोकांना माझी न्युडस आवडतात. काहीतरी नवीन पाहायला मिळतं याचा त्यांना आनंद आहे तसा काहींचा विरोधही आहे. मला एकच जाणवतं; ‘मिनिंग इज मिनिंगलेस’..
मला अनेकजण ‘वेडा’ ठरवू शकतात, पण कुणी कसंही बघू देत, माझी प्रदर्शनं बंद पाडू देत...मी कुणाला विरोध करणार नाही किंवा निषेधही व्यक्त करणार नाही... व्यक्त होईन ते आर्ट फॉर्ममधूनच ! पाश्चात्य देशांमध्ये ही गोष्ट खूपच नॉर्मल आहे. ‘मोमा’ प्रदर्शनात तर लोक नग्न छायाचित्रं काढण्यासाठी आपणहून उभे राहतात. आपल्याकडे याला वेळ लागेल. कदाचित शंभर वर्षांमध्ये काहीतरी बदलेल... म्हणून आता मी थांबणार नाही !
शब्दांकन : नम्रता फडणीस