हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:14 AM2018-09-14T05:14:21+5:302018-09-14T05:18:07+5:30

नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे.

condition in assam likely to become critical after government thinking to deport 40 lakh people | हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

Next

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामातील ४० लक्ष तथाकथित ‘घुसखोरांना’ देशाबाहेर काढण्याचा विचार साऱ्या देशात लागू करा हा दिल्लीच्या परिषदेत मांडलेला प्रस्ताव देश व आसाम या दोहोंच्याही हिताचा नाही. प्रत्यक्षात तो भारतात ट्रम्पशाही आणण्याचा प्रकार आहे. देशाच्या फाळणीनंतर वा फाळणीपूर्वी ‘पूर्व पाकिस्तानसह’ (बांगला देश) आसाम, बंगाल व अन्य प्रांतातून आसामात आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यातील कित्येक फाळणीच्याही अगोदर आसामातील चहामळ्यांमध्ये मजुरी करून पोट भरायला आले आहेत. या लोकांना भारतात मताधिकार आहे. नागरिकत्वाची प्रमाणपत्रे आहेत. रहिवासाचा पुरावा आदहे आणि त्यांची या देशातील राहणी कित्येक दशकांच्या वहिवाटीची आहे. आता त्यातील ४० लक्ष लोकांना निवडून देशाबाहेर घालविण्याची भाषा या सोनोवालासारखीच, राम माधव आणि अमित शहा या भाजपाच्या पदाधिकाºयांनी बोलून दाखविली आहे. नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे. सारा दक्षिण मध्य आशिया व युरोपातील देश त्याच्या ज्वाळांनी भाजून निघत आहेत. अशा स्थितीत शांततेत जगणाºया आसामातील व देशातील प्रजेला एकदम अशांततेत लोटणे, त्यांच्यात अविश्वास व संशयाचे वातावरण उभे करून शस्त्राचाराला आमंत्रण देणे यात शहाणपणा नाही. वहिवाटीचाही एक हक्क असतो आणि तो जमीन, रहिवास इ.च्या बळावर दिला जातो. आसामातील ज्या ४० लाख लोकांवर भाजपाने सध्या कुºहाड परजली आहे त्यांच्यातील अनेक कुटुंबातील मुले भारतात जन्माला येऊन भारताच्या जन्मसिद्ध नागरिकत्वावर हक्क प्राप्त केलेली आहेत. ज्या मेक्सिकनांना अमेरिकेबाहेर घालविण्याचा उद्योग ट्रम्प यांनी चालविला आहे त्यातील सर्वाधिक गुंतागुंतीचा मुद्दाही हाच आहे. अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येकाला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. जे मेक्सिकन व अन्य तेथे आले व त्यांना मुले झाली, त्या मुलांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे, त्यामुळे मुले नागरिक व आई-बाप विदेशी असा तिढा तेथे निर्माण झाला आहे. ट्रम्पची नजर अमेरिकेतील अन्य विदेशी लोकांवरही आहे आणि त्यांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. उद्या मेक्सिकनांवर होणारी कारवाई त्याने तेथील भारतीयांविरुद्ध सुरू केली तर त्यात आईबाप व मुले यांची जी ताटातूट होईल तीच आता आसामात व्हायची आहे. ट्रम्पच्या कारवाईने त्यांचा देश त्यांच्यावर एवढा संतापला की ‘त्यांनी माझ्या अंत्ययात्रेलाही हजर राहू नये’ असा निर्देशच सिनेटर जॉन मॅकेन यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दिला. देशात एकात्मतेचे, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व बहुसंख्य आणि अल्पसंख्य यातील स्नेहाचे वातावरण निर्माण करायचे सोडून सोनोवाल आणि शहांना ही जी अवदसा आठवली आहे तिचा विचार या सगळ्या संदर्भात केला पाहिजे. आपण आपल्याच पायावर कुºहाड मारण्याचा संकेत यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन व आॅस्ट्रेलियासारख्या देशांना देत आहोत काय, याचाही विचार फार गंभीरपणे करण्याची गरज आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रस्ताळ्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र त्यांनीच आसामातील त्या ४० लाख अभाग्यांना आपल्या राज्यात स्थान देण्याचे जाहीर केले आहे. अशा अवघड व हिंसेला निमंत्रण देणाºया प्रश्नांबाबत असाच शांततामय तोडगा काढला पाहिजे. आसामातच नव्हे तर देशात सर्व विदेशातून आलेले लोक आहेत. ताप हा की आपली माणसे स्वदेशी लोकांचेच आपल्या राज्यातील वास्तव्य सहन करीत नाहीत हे आपण मुंबईत पाहिले आहे. या स्थितीत आसामातील लोकांना घालवायला आरंभ झाला की देशात त्याचा केवढा डोंब उसळेल याची कल्पनाच करता येणे शक्य आहे. म्हणून सोनोवालांसह त्यांच्या साºया घोषणाबाजांना सांगायचे की अशा गर्जना करू नका. त्या हिंसाचाराला आमंत्रण देतील. देशातील प्रश्न देशातच विचारपूर्वक निकालात काढणे हाच त्यावरचा सर्वात सोयीचा व शांततेचा मार्ग आहे.

Web Title: condition in assam likely to become critical after government thinking to deport 40 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.