आचरणकर्ता शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे
By राजा माने | Published: January 6, 2018 12:18 AM2018-01-06T00:18:22+5:302018-01-06T00:19:35+5:30
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून ऐतिहासिक शनिवारवाड्यापर्यंतचे व्यासपीठ गाजविणारे डॉ. शिवरत्न शेटे यांनी आजवर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली. शिवचरित्र कथनात वर्तमानाचा शोध घेणारा हा व्याख्याता आचरण आणि उपक्रमशीलतेवर भर देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणारे पदोपदी भेटतात. पण शिवरायांचे विचार आणि जीवन तत्त्वज्ञान अंगिकारणारे किती? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या फंदात आपण कधीच पडत नाही. नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर आचार, विचार आणि कृतीने उभ्या महाराष्ट्राला देणारा अवलिया म्हणजे डॉ. शिवरत्न शेटे ! हा माणूस तब्बल २० वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राच्या शे-पाचशे लोकवस्तीच्या खेड्यापासून ते पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यापर्यंतच्या व्यासपीठावर आपल्या खड्या आवाजात शिवरायांची शौर्यगाथा तन्मयतेने मांडतो आहे.
दोन हजारांहून अधिक व्याख्याने दिलेल्या डॉ. शेटे यांची कर्मभूमी सोलापूर आहे. मराठवाड्यात माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे त्यांचे जन्मगाव. सदाशिवराव व मंगलाबाई हे त्यांचे माता-पिता. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश शेटे हे त्यांचे लहान बंधू. शालेय जीवनापासूनच इतिहासाचे शिक्षक शानुराव जोगदंड यांनी डॉ.शिवरत्न यांच्या मनावर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे संस्कार घडविले. पुढे आयुष्यभर त्याची जपणूक करण्याचे काम त्यांनी केले. महाविद्यालयीन जीवनात स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारखे गुरु लाभल्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस ही पदवी संपादन केल्यानंतर नागपुरात एका विधवा महिलेचा पुनर्विवाह लावून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. गरिबांसाठी औषध बँकेसारखे उपक्रम हाती घेतले. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत असताना शिवचरित्रावर व्याख्याने देण्याची त्यांची चळवळ व्यापक बनविली. व्याख्यानाला आचरण आणि सामाजिक उपक्रमांची जोड देणे ही त्यांची खासियत ! त्याच कारणाने अतिरेकी अफजल गुरुला फाशी देण्याची मागणी करणारी पाच लाख पत्रे त्यांनी राष्ट्रपती व गृहमंत्र्यांना सादर केली होती. शिवरायांचा इतिहास फक्त सांगून न थांबता राज्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गजांना सोबत घेऊन गडकोटांची भ्रमंती व अनुभवाद्वारे अभ्यासाची मोहीम त्यांनी हाती घेतली. हिंदवी परिवार नावाची संस्था स्थापन करून वर्षातून दोन वेळा शेकडो मान्यवरांना साथीला घेऊन ते गडकोटांची भ्रमंती करतात. आचरणावर भर देणारा कार्यकर्त्यांचा खूप मोठा संच त्यांनी निर्माण केला आहे. हे करत असताना आयुर्वेद तज्ञ म्हणून असलेल्या त्यांच्या कौशल्याचा उपयोग त्यांनी सोलापुरात शिवसह्याद्री आरोग्यधाम उभे केले आहे. ख्यातनाम विधिज्ञ एस. आर. पाटील यांच्या कन्या डॉ.सुप्रज्ञा या डॉ. शिवरत्न यांच्या पत्नी आहेत. आर्या व हिंदवी या दोन कन्यांसह डॉ. सुप्रज्ञा या चळवळीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. गोरगरीबांना मोफत उपचार, शहीद वीरांच्या कुटुंबांना मोफत सेवा आणि मिळालेल्या उत्पन्नातून हिंदवी परिवाराच्या उपक्रमांसाठी निधी देण्याचे काम डॉ. शेटे करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेल्या पावनखिंडीपासून तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यापर्यंतच्या प्रत्येक ठिकाणी पायपीट करताना आजवर गडकिल्ल्यांच्या शंभराहून अधिक मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. शिवचरित्र कथनात वर्तमानाचा शोध घेणे हे डॉ. शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानशैलीचे वैशिष्ट्य आहे. त्याला ते इमाने-इतबारे आचरणाची जोड देतात.