विश्वासार्हतेलाच तडा?

By admin | Published: December 30, 2016 02:54 AM2016-12-30T02:54:31+5:302016-12-30T02:54:31+5:30

अंबानी किंवा अदानी यांच्यापेक्षा टाटा उद्योग समूह वेगळा या समजाला पहिला तडा गेला, तो रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया प्रकरणात आले त्यावेळी. गेल्या दोन महिन्यांत टाटा

Confirmation of credibility? | विश्वासार्हतेलाच तडा?

विश्वासार्हतेलाच तडा?

Next

अंबानी किंवा अदानी यांच्यापेक्षा टाटा उद्योग समूह वेगळा या समजाला पहिला तडा गेला, तो रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया प्रकरणात आले त्यावेळी. गेल्या दोन महिन्यांत टाटा उद्योग समूहात रतन टाटा विरूद्ध सायरस मिस्त्री यांच्यात जे गृहयुद्ध झडले, त्याने ‘टाटा’ या नावाभोवती विश्वासार्हतेचे जे भरभक्कम वलय होते, त्याला आता दुसरा तडा गेला आहे. रतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरच्या संघ मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्या उद्योग समूहाच्या विश्वासार्हतेला लागत असलेल्या ओहोटीला आणखी वेग येईल, असे पाऊल टाकले आहे. राष्ट्रउभारणीच्या कार्यात टाटा उद्योग समूह सामील झाला, तो सर जमशेटजी यांनी उद्योग जगतात आपले बस्तान बसवण्यास सुरूवात केल्यावर. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात घन:श्यामदास बिर्ला किंवा कमलनयन बजाज अथवा मफतलाल व साराभाई असे उद्योगपती आपापल्या परीने हातभार लावत होते. यापैकी बहुतेकांचे महात्मा गांधी यांच्याशी घनिष्ट संबंध होते आणि महात्माजींच्या सामाजिक कार्यात या सगळ्यांचा हातभार लागलेला होता. मात्र उद्योगपतींच्या या मांदियाळीत टाटा यांचे नाव फारसे घेतले जात नसे. टाटा उद्योग समूहाचा प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीला हातभार लागला नसला, तरी देशाच्या आर्थिक प्रगतीत टाटा यांचा वाटा मोठाच होता व आजही आहे. पोलाद, अवजड वाहने, विमान वाहतूक इत्यादी आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पायाभूत उद्योगांच्या उभारणीत टाटा यांचा सिंहाचा वाटा होता. नंतर अलीकडच्या काळात आधुनिक अर्थव्यवहाराला आवश्यक असणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांतही टाटा यांनी आपला जम बसवला. भारताच्या रोजगार निर्मितीच्या कार्यात टाटा उद्योग समूहाचे योगदान लक्षणीय आहे. हे सगळे करीत असतानाच टाटा उद्योग समूह सामाजिक कार्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठीही दमदार पावले टाकत आला आहे. आज टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या विविध सामाजिक विश्वस्त निधींमार्फत आरोग्य, शिक्षण यांपासून ते ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील अनेक गोष्टींवर अर्थसहाय्याबरोबरच तज्ज्ञांचा सल्ला व अंमलबजावणीसाठीही मदत केली जात असते. टाटा उद्योग समूहाइतका सामाजिक कार्यालयातील व्याप इतर कोणाचाच नाही. टाटा उद्योग समूहाला विश्वासार्हतेचे जे भरभक्कम वलय प्राप्त होत गेले, ते एकीकडे अशा जनहिताच्या कामासाठी पुढकार घेतल्याने आणि दुसऱ्या बाजूला सचोटी, पारदर्शकता, कार्यक्षमता या गुणांचा समुच्चय असलेल्या कार्यसंस्कृतीची चौकट मजबूत पायावर उभी करून त्या अंतर्गतच सर्व कंपन्यांचा व्यवहार चालवण्यावर कटाक्ष ठेवल्याने. साध्या मिठापासून ते मोटारी व सॉफ्टवेअरपर्यंत टाटा उद्योग समूहाच्या कोणत्याही उत्पादनाला विश्वासार्हता लाभून ग्राहकांनी त्यावर पसंतीची मोहोर उठवली, ती या कार्यसस्कृतीमुळेच. अर्थात आणखी एक मूलभूत पथ्य टाटा उद्योग समूहाने कायम कसोशीने पाळले. ते म्हणजे राजकारणापासून दूर राहण्याचे. रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया ध्वनिफितीत आल्यामुळे टाटा उद्योग समूह हे पथ्य पाळेनासा झाला आहे की काय, अशी शंकेची पाल चुकचुकली. पुढे टाटा उद्योग समूहातील गृहयुद्धाला तोंड फुटल्यावर रतन टाटा यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या. आता या गृहयुद्धात पहिल्या फेरीत तरी सायरस मिस्त्री यांची मात झाल्याचे दिसू लागल्यावर रतन टाटा सरसंघचालकांना भेटायला गेले. त्यामुळे टाटा उद्योग समूह राजकारणापासून दूर राहत राष्ट्र उभारणीच्या कामात सहभागी होण्याचे पथ्य वाऱ्यावर सोडून देत आहेत काय, या प्रश्नाच्या चर्चेला उधाण येणार आहे. अर्थात संघ करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी हातभार कसा लावता येईल, या संबंधी रतन टाटा व सरसंघचालक यांच्यात चर्चा झाली, असे सांगितले जात आहे. पण हा खुलासा लटका आहे. पहिली गोष्ट म्हणजे संघ जे काही ‘सामाजिक’ काम करीत आहे, ते आजचे नाही. आपल्या ‘वनवासी’ कामाबद्दल संघ कायम सांगत आला आहे. त्यावेळी कधी रतन टाटाच नव्हे, तर त्यांच्या आधी अनेक वर्षे या उद्योग समूहाची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळणारे जेआरडी टाटा यांनाही संघाच्या या ‘सामाजिक कामा’ची दखल घ्यावीशी वाटली नाही. आता तशी ती रतन टाटा यांना वाटत आहे, याचे कारण उघड आहे. ते म्हणजे सायरस मिस्त्री यांच्याशी रतन टाटा हे गृहयुद्ध खेळत आहेत, त्यात राज्यसंस्थेचे, म्हणजेच प्रस्थापित सरकारचे पाठबळ मिळवणे. मोदी हे स्वत:च कुशल राजकीय योद्धे असले, तरी त्यांच्या सरकारला संघाचे कवचकुंडल आहे. त्यामुळे संघाशी संधान बांधून सायरस मिस्त्री यांच्याशी सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या दुसऱ्या फेरीतील यशासाठी आवश्यक असलेल्या राज्यसंस्थेच्या पाठिंब्याची बेगमी टाटा करून ठेऊ पाहात असावेत. रतन टाटा यांनी टाकलेले पाऊल म्हणजे त्यांच्या आधीचे या उद्योग समूहाचे प्रमुख ‘जेआरडी’च नव्हेत, तर अन्य सर्व पूर्वसुरींनी जी भूमिका धारण केली होती, तिला छेद देण्याच्या वाटेवरील पहिले पाऊल ठरण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय ‘दुनिया मेरी मुठ्ठी मे’ असे घोषवाक्य बनवणाऱ्या आणि ‘ये पार्टी तो हमारी दुकान है’ अशी दर्पोक्ती करणाऱ्या उद्योगपतींच्या रांगेत बसण्याच्या दिशेनेही टाकलेले हे पहिले पाऊल ठरणार असेल तर ते जमिनीपासून चार अंगुळे वरतून चालणारा टाटा समूहाचा रथ जमिनीवर आणणेही ठरेल.

Web Title: Confirmation of credibility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.