संघर्ष आणि तडजोड

By admin | Published: May 19, 2017 02:40 AM2017-05-19T02:40:00+5:302017-05-19T02:40:00+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच

Conflict and Compromise | संघर्ष आणि तडजोड

संघर्ष आणि तडजोड

Next

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने सरकारच्या विरोधात १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून पडली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी हा संप स्थगित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सरकार आंदोलन मिटविण्याबाबत पुढाकार घेणारच; पण या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते हे विशेष ! फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. पुणतांबा हे विखे यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पुढाकार घेतलेले डॉ. धनंजय धनवटे हे विखेंचे समर्थक आहेत. त्यामुळे विखेंची मदत घेऊन फडणवीस यांनी संप मिटविला, असा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावात ग्रामसभा घेऊन आंदोलन उभारण्याबाबत चळवळ सुरू केली होती. सरकारला निर्णय घेण्यासाठी अगोदरच मुदत देता आली असती. दोन्ही कॉँग्रेसने एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष यात्रा काढली, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या वाटाघाटी विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत होतात, हा सगळाच विरोधाभास आहे. आता दोन्ही कॉँग्रेसनेही आपली संघर्ष यात्रा थांबवून सरकारला निर्णय घेण्यास मुदत देणे सयुक्तिक ठरेल. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केल्यापासून सरकारची यंत्रणा जागी झाली होती. हे आंदोलन कसे थांबविता येईल याची चाचपणी कृषी विभागाचे अधिकारी करत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचे व त्यांची समजूत काढायची अशी रणनीती बहुधा ठरलेली होती. त्यात सरकारला अखेर यश आले. शेतकरी सरकारवर नाराज आहेत, म्हणून ते विरोधकांवर खूश आहे, अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून उद्या नवे नेते उभे राहिले तर ते विरोधकांनाही परवडणारे नाही. त्यामुळेच एकीकडे संघर्षाची व दुसरीकडे वाटाघाटीची भूमिका घेतली जाते. मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला. मात्र, कॉँग्रेस अद्याप काहीही बोललेली नाही हेही विशेष !मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकरी संपातच नाही, बहुधा कॉँग्रेसमध्येही केव्हाच फूट पाडली आहे. कॉँग्रेस नेत्यांचे संघर्ष आणि तडजोड, असे दोन्ही डगऱ्यांवर हात आहेत.

Web Title: Conflict and Compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.