स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील भ्रम आणि वास्तव

By admin | Published: August 13, 2015 05:06 AM2015-08-13T05:06:39+5:302015-08-13T05:06:39+5:30

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अव्वल कंपनी मानल्या गेलेल्या ‘गुगल’च्या प्रमुख कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचई या भारतीय वंशाच्या अभियंत्याची नेमणूक झाली, ही बातमी देशाच्या

Confusion and Reality in India after Independence | स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील भ्रम आणि वास्तव

स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील भ्रम आणि वास्तव

Next

- प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अव्वल कंपनी मानल्या गेलेल्या ‘गुगल’च्या प्रमुख कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचई या भारतीय वंशाच्या अभियंत्याची नेमणूक झाली, ही बातमी देशाच्या स्वातंत्र्याला ६८ वर्षे पुरी होण्यास केवळ तीन दिवस बाकी असताना १२ आॅगस्टला सर्व प्रसार माध्यमात झळकविण्यात आली.
कौशल्याधारित मनुष्यबळाची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताला घडवण्यासाठी याच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारनं ‘स्किल इंडिया’ या नावानं एक संकेतस्थळ तयार केलं आहे. त्यावर विविध ‘कौशल्यं’ भारतीयांना मिळवून देण्यासाठी आणि त्या आधारे मिळणाऱ्या रोजगारांचा जो तपशील आहे, त्यात ‘सफाईचं काम-ओला मैला’ या शीर्षकाखाली जे ‘कौशल्य’ अपेक्षीत आहे, त्यात ‘खराटा व मोठा झाडू यांनी मैला गोळा करणं’ असं वर्णन केलं आहे.
देशात जे कोट्यवधी लोक रोजगार मिळवू पाहत आहे, त्यांना भारतातील नऊ लाख उद्योगांपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम करतानाच, ‘श्रमाच्या प्रतिष्ठा’ अधोरेखित होईल, यावर भर दिला जाणार आहे, असं या संकेतस्थळाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं. सुंदर पिचई यांच्या नेमणुकीच्या बातम्या जशा झळकल्या, तसंच पंतप्रधानांचं हे भाषणही वृत्तवाहिन्यांनी ‘लाईव्ह’ दाखवलं आणि वृत्तपत्रांनी ठळकपणं छापलं. मात्र या संकेतस्थळावरचा हा ‘तपशील’ एखाद दुसरा अपवाद वगळता प्रसार माध्यमातील कोणालाही फारसा पुढं आणावासा वाटला नाही. ही प्रथा बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे आणि ती ताबडतोब बंद केली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं देऊनही केंद्र सरकार आजही ‘मैला साफ करण्याचं काम’ आणि त्यासाठी लागणारं ‘कौशल्य’ यांची सांगड घालू पाहत आहे. शिवाय या ‘कौशल्या’मुळं मिळणारा रोजगार हा ‘थोडासा हानिकारक व धोकादायक’ असल्याची टीपही या तपशिलाला जोडण्यात आली आहे. गंमत म्हणजे ‘असंघिटत क्षेत्रात’ उपलब्ध असलेल्या रोजगारात ‘भविष्य सांगणे’ हाही एक रोजगार समाविष्ट करण्यात आला आहे आणि त्यालाही अशीच ‘थोडासा हानिकारक व धोकादायक’ ही तळटीप जोडण्यात आली आहे.
जगभर भारतीय ‘ज्ञाना’चा डंका वाजविणाऱ्या सुंदर पिचई यांच्या नेमणुकीनं देशाभिमानं उर भरून आलेला नागरिक आणि दुसऱ्या बाजूस मैला साफ करण्याचं काम हे ‘कौशल्य’ ठरवणारं भारत सरकारचं संकेतस्थळ, असे हे स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरच्या आजच्या २१ व्या शतकातील भारताचं चित्र आहे. पण सुंदर पिचई यांची नेमणूक हा ‘भ्रम’ आहे आणि वास्तव आहे, ते ‘मैला सफाई’ हे ‘कौशल्य’ ठरवणारा भारत, याकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे.
...कारण वास्तवाला भिडून ते बदलण्याची आकांक्षा बाळगून त्या दिशने वाटचाल करण्यासाठी सातत्यानं व जिद्दीनं ज्ञान मिळवायचं आणि त्याच्या आधारे आपली आकांक्षा पुरी करायची, ही प्रवृत्तीच समाजात पुरेशी जोपासली गेलेली नाही. आता तर माहिती तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळं ‘माहिती’ अगदी प्रत्येकाच्या हाताच्या बोटावर ङ्क्तम्हणजे संगणकाचा ‘माऊस’ वापरून, उपलब्ध झाली आहे. पण ही ‘माहिती’ आहे. ते ‘ज्ञान’ नाही. या माहितीचं पृथक्करण व विश्लेषण करण्याची प्रक्रिया असते. त्यातून ‘ज्ञान’ हाती लागते. मात्र आज अशा ‘ज्ञाना’ऐवजी ‘कौशल्यं’ मिळवणं हा कळीचा शब्द आपल्या समाजीवनात रूढ होत गेला आहे. पण ही जी काही ‘कौशल्यं’ आहेत, ती निर्माण होतात ‘ज्ञाना’मुळंच. अगदी ‘सफाई कामगारा’ला लागणारी ‘कौशल्यं’ ठरवणारी जी डोकी संकेतस्थळ बनवण्यासाठी वापरली गेली, ती ‘जातिव्यवस्था’ अस्तित्वात आणणाऱ्या ‘ज्ञाना’चीच ‘प्रॉक्ट्स’ आहेत, हेही विसरता कामा नये.
याच जातिव्यवस्थेनं ‘ज्ञान’ हे काही मूठभरांपुरते सीमित केलं आणि इतरांना फक्त वर्णश्रमानुसार ‘कौशल्यं’ मिळविण्याचा अधिकार दिला. आज हजारो वर्षांनंतरही २१ व्या शतकातील भारतात तेच होत आहे.
नेमकं येथेच आज ६८ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही गांधी महत्वाचे ठरतात. ‘देशाच्या राष्ट्रपतीनं भंगीवाड्यात राहायला जायला हवं’, असं महात्माजी म्हणाले होते. त्याबद्दल आजही त्यांची टिंगलटवाळी केली जात असते. या भंगीवाड्यात राहणाऱ्या माणसाचं हित जपण्याचं उद्दिष्ट सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीच्या नजरेसमोर असायला हवं, असा खरा तर गांधीजींच्या या उद्गारांचा आशय होता. गांधीजींच्या आश्रमात असणाऱ्या सर्वांना-त्यात स्वत: महात्माजी, कस्तुरबा व इतर सर्वजण, सकाळी उठल्यावर मैला सफाईचंं काम करणं बंधनकारक होतं. याच गांधीजींचा खून करणाऱ्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला आज ‘श्रमाची प्रतिष्ठा’ म्हणत आहेत, ती ही होती. हे काम करणाऱ्यांना जे भोगावं लागत आहे, त्याची कल्पना इतरांना यावी आणि परंपरेनं ज्यांच्या माथी हे काम मारलं आहे, त्यांची त्यातून सुटका व्हावी, या उद्देशानं गांधीजींच्या आश्रमात हे काम करावं लागत असे. आज २१ व्या शतकात भारत पोचूनही ही ‘परंपरा’ काही संपलेली नाही आणि आता तिला ‘श्रमाच्या प्रतिष्ठे’चं बिरूद लावण्यात आलं आहे. तेही आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून.
सुंदर पिर्चा यांच्या नेमणुकीचं ‘सेलिब्रेशन’ करायलाच हवं. त्याबद्दल वाद नाही. पण असे किती सुंदर पिचई भारतात तयार होतात आणि भारतातच राहून येथील वास्तव बदलण्यासाठी झटतात, हाही प्रश्न विचारला जायलाच हवा. तसे फारसे ‘पिचई’ बघायला मिळत नसतील, तर हे असं का होतं आणि त्यासाठी ‘प्राचीन काळपासून ज्ञानाची दीर्घ परंपरा’ असल्याचा अभिमान बाळगणारे आपण सगळे जण का गप्प आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करणार आहोत, हाही प्रश्न विचारायला हवाच.
...कारण ‘पिचई’ हा भ्रम आहे आणि ‘सफाई कामगारा’ची ‘कौशल्यं’ ठरवणारी डोकी हे वास्तव आहे.

 

Web Title: Confusion and Reality in India after Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.