अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 06:17 AM2024-06-17T06:17:48+5:302024-06-17T06:18:09+5:30
अभियांत्रिकी पदवीसाठी नेमका कुठे प्रवेश घ्यावा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात गोंधळही होतो.
प्रा. संदीप ताटेवार, निवृत्त प्राध्यापक, अमरावती
सध्या बऱ्याच नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘अभिमत विद्यापीठ’ किंवा ‘स्वायत्त संस्था’ असा दर्जा प्राप्त होत आहे. यामध्ये शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. काही अभियांत्रिकी महाविद्यालये क्षेत्रीय विद्यापीठाशी संलग्नीत आहेत. अभियांत्रिकी पदवीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना व पालकांना अभिमत विद्यापीठ, स्वायत्त संस्था व विद्यापीठाशी संलग्नीत संस्था यामध्ये काय फरक असतो, कुठे प्रवेश घ्यावा, याबद्दल बऱ्याचदा फारशी माहिती नसल्यामुळे प्रवेश घेताना त्यांची संभ्रमाची स्थिती निर्माण होते.
सध्या सीईटी, जेईई, बारावीची परीक्षा आटोपल्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी पदवी प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिमत विद्यापीठ म्हणजे यूजीसी (युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन) अधिनियम, १९५६ कलम तीन अंतर्गत उच्च शिक्षण विभागाद्वारे नामांकित महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जातो. हा दर्जा मिळवण्यासाठी सदर महाविद्यालयाला अनेक कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. अभिमत विद्यापीठाला प्रशासकीय, वित्तीय व शैक्षणिक स्वातंत्र्य असते. शैक्षणिक स्वातंत्र्य म्हणजे विविध कोर्सेस चालू करणे, त्यासंबंधी अभ्यासक्रम ठरवणे, प्रवेश संख्या व प्रवेश शुल्क निश्चित करणे, स्वत: परीक्षा घेणे, वेळेत निकाल घोषित करणे व स्वतःच्या विद्यापीठाची पदवी देणे, याचे स्वातंत्र्य असते. स्वायत्त संस्थेत अभिमत विद्यापीठासारखे बऱ्याच अंशी शैक्षणिक स्वातंत्र्य असते; पण पदवी ही संलग्नीत विद्यापीठाची द्यावी लागते. अभिमत विद्यापीठ व स्वायत्त संस्थेमध्ये उद्योगांच्या सध्याच्या गरजांवर आधारित अभ्यासक्रम विकसित करता येतो, नवीन तंत्रज्ञान शिकवले जाते, अभ्यासक्रमामध्ये क्रेडिट सिस्टीमचा लाभ घेणे शक्य होते. ही प्रणाली टक्केवारी आणि गुणांऐवजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी क्रेडिटचा वापर करते.
अभिमत विद्यापीठातील व स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थी इतर शासकीय सेवेसाठी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र असतात. विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात स्वतःचे शैक्षणिक स्वातंत्र्य नसते. शैक्षणिक गोष्टी जवळपास सर्वच असतात. मात्र अभ्यासक्रम ठरवणे, त्यात आवश्यकतेनुसार फेरबदल करणे, निकाल घोषित करणे, याबाबत संलग्नीत विद्यापीठावर अवलंबून राहावे लागते. काही अभिमत विद्यापीठात ज्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी आहे; उदाहरणार्थ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखा जसे की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी आदी अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाते, तसेच प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ केली जाते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आस्थापना (प्लेसमेंट) देता येईल का, याबाबत माहिती घेणे आवश्यक असते. याबाबत विद्यापीठाच्या भविष्यात काय योजना आहेत, याबाबत जाणून घेणेसुद्धा हिताचे ठरते. कधी-कधी या तिन्ही प्रकारच्या संस्थेमध्ये महाविद्यालयामार्फत विविध कंपनींमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पॅकेज फुगवून सांगितले जावू शकते, तेव्हा त्याची खातरजमा करणे गरजेचे ठरते. अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यासोबतच कोणती शाखा आपल्या दृष्टीने योग्य राहील, याबाबत विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी यासारख्या शाखेला जास्त मागणी असली तरी भविष्यात काय स्थिती राहील, याची भविष्यवाणी आज आपण करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून, यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, कारखाने, विद्युतनिर्मिती व संचारण या सारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे. विद्यार्थ्यांनी याचाही विचार करावा.