गुणवंतांचे अभिनंदन करताना...

By Admin | Published: June 15, 2017 04:32 AM2017-06-15T04:32:39+5:302017-06-15T04:32:39+5:30

यंदाच्या शालांत परीक्षेत अक्षरश: विक्रमाचीच नोंद झाली. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १९३ जणांनी पैकीच्या पैकी म्हणजे

Congratulations on quality ... | गुणवंतांचे अभिनंदन करताना...

गुणवंतांचे अभिनंदन करताना...

googlenewsNext

यंदाच्या शालांत परीक्षेत अक्षरश: विक्रमाचीच नोंद झाली. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १९३ जणांनी पैकीच्या पैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळवून एका ऐतिहासिक विक्रमाचीच नोंद केली. उत्तीर्ण झालेल्या ८८.७४ टक्के विद्यार्थ्यांपैकी सुमारे पाच लाख ४४ हजार ५४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदाचा निकाल ०.८२ टक्क्यांनी घसरला असला तरी गुणवत्तेची श्रेणी कितीतरी पट अधिक वाढली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेची तुलना गेल्या काही वर्षात सीबीएससी आणि आयसीएससी विद्यार्थ्यांशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदा राज्याच्या मुलांनी मारलेली बाजी खरोखर कौतुकास्पद आहे. सीबीएससी किंवा आयसीएससीच्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना शंभर टक्के गुण मिळाले, हे आता तपासायला हवे. अर्थात राज्य शिक्षण मंडळाने कला-क्रीडा सहभागाबद्दल १५ आणि अधिक गुणांची भर घातल्याने त्याचा फायदा काही विद्यार्थ्यांना शंभर गुण मिळविण्यात झाला, हे खरे असले तरी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि श्रम याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. शालेय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात मिळणारे हे यश मुळातच कौतुकाचे असते. त्यानंतर भवितव्याच्या नव्या वळणावर हे विद्यार्थी उभे असतात. त्यामुळे दहावीत ९० टक्के गुण मिळवायलाच हवेत तरच पुढे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल आणि उत्तम करिअर करता येईल या विचारांचा दबाव घरोघरी वाढतो आहे. काही घरांमध्ये तर ७० किंवा त्याखाली टक्के पडले तर जणू आपला पाल्य नापास झाला, असे चेहरे करून बसतात. या व्यवस्थेचाही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर नववी उत्तीर्ण झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीतच खासगी क्लासेसमध्ये अभ्यासवर्ग सुरू होतात. काही क्लासेसमध्ये तर शाळा सुरू होतानाच अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जातो. त्यानंतर वर्गात केवळ पुनर्विलोकन केले जाते. याही व्यवस्थेचा ताण विद्यार्थ्यांच्या मनावर येत असतो. त्यामुळे शिक्षणाची काठिण्यपातळी वाढूनही आज शेकडो विद्यार्थी शंभर पैकी शंभर गुण मिळवित आहेत. परंतु मिळणाऱ्या शैक्षणिक यशाचा आयुष्यासाठी नेमका किती उपयोग होतो, हा संशोधनाचा विषय ठरेल. याचे कारण गेल्या १० वर्षात ज्यांना नव्वद टक्के गुण मिळाले त्यांची आताची स्थिती काय आहे? नेमके कोणत्या पदावर ते नोकरी करतात? दहावीत प्रचंड यश मिळूनही बारावीत टक्का का घसरतो? दहावीच्या यशाचे सातत्य पुढे कायम का राहत नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासण्याची गरज आज निर्माण झाली आहे. गुणवंतांच्या यशाचे कौतुक करताना त्याची आयुष्याची उपयोगिताही तपासायला हवी. दहावीत प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची मेहनत पुढे नेमकी कुठे कमी होते, याचाही शिक्षणतज्ज्ञांनी विचार करायला हवा. आज राज्यात १४ लाख ५८ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतांची ही खाण कुठल्या दिशेला जाणार आहे, याचाही आजच्या समाजव्यवस्थेचा विचार करून स्वरूप ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही गुणवत्ता फक्त दहावी परीक्षेपुरती सीमित ठेवायची का? हेही तपासायला हवे. राज्याच्या बहुतेक शाळांमध्ये १०० टक्के निकालासाठी चढाओढ असते. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून काही सामान्य विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्णही केले जाते. त्यांचा पुन्हा अभ्यास करवून दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. शाळेच्या प्रतिष्ठेसाठी विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते. केवळ दहावीतच गुणवंत ठरल्याने आजचे विद्यार्थी यशस्वी ठरतात का? हा मुद्दाही अनेक अंगानी विचार करण्याजोगा आहे. शालेय गुणवत्ता म्हणजे यशाचा पाया नव्हे, अन्यथा भारतरत्न सचिन तेंडुलकर घडलाच नसता, हेही लक्षात घ्यायला हवे. शालेय यशाबरोबर अंगभूत गुणांना प्राधान्य देणारा अभ्यासक्रम शिकवायला हवा. याची अनेकदा चर्चा होते. पण अजून अंमलबजावणीच्या पातळीवर काही घडताना दिसत नाही. शिक्षणतज्ज्ञ, समित्या, सचिव पातळीवरच्या बैठका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वैचारिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात काही ठोस घडताना दिसत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शंभर टक्के गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्वतंत्र संवाद करायला हवा. बहुतेकांनी डॉक्टर, इंजिनिअर होण्याची मनीषा व्यक्त केली आहे. आपल्या समाजव्यवस्थेत खरोखर किती अभियंते घडवायचे आहेत, आणि आज अक्षरश: लाखो अभियंते बेरोजगार आहेत, त्यांचे काय करायचे? हा प्रश्न भेडसावत असताना नव्याने बेरोजगारीत भर घालणारी नवी पिढी का तयार करायची आहे, हेही समजावून घ्यायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या यशाचा चढता आलेख कौतुकाचा असताना समाजाच्या भिन्न अंगाचाही सर्वंकष विचार व्हायला हवा. अन्यथा गुणवंतांच्या या पिढ्यांच्याही कपाळी बेरोजगाराचा शिक्का बसेल आणि नैराश्याच्या गर्तेत ही पिढी वाहून जाईल, अशी भीती वाटते. यंदाचे विद्यार्थ्यांचे हे ठळक यश सर्वच पातळीवर विचार करून पुढे न्यायला हवे. एक चांगला सदृढ समाज उभा करण्यासाठी या गुणवंत पिढीचा मोठा हातभार लागणार आहे, याची जाणीव या यशाच्या निमित्ताने ठेवायला हवी. पालकांनीही या यशाकडे वेगळ्या दृष्टीने पहायला हवे, हे सांगणारा हा निकाल आहे.

Web Title: Congratulations on quality ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.