काँग्रेसमुक्त भारत ? छे, हे तर भाजपाचेच काँग्रेसीकरण !

By admin | Published: January 21, 2017 12:04 AM2017-01-21T00:04:59+5:302017-01-21T00:04:59+5:30

‘भाजपा हा जगाच्या पाठीवरील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष आहे’,

Congress-free India? Sixth, this is Congressionalization of BJP! | काँग्रेसमुक्त भारत ? छे, हे तर भाजपाचेच काँग्रेसीकरण !

काँग्रेसमुक्त भारत ? छे, हे तर भाजपाचेच काँग्रेसीकरण !

Next


‘भाजपा हा जगाच्या पाठीवरील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष आहे’, असा दावा गेल्याच वर्षी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. मग वर्षभरात पक्षाचे सारे (मिस्ड कॉल) सदस्य अचानक कुठे हरवले? अश्लील कारणांनी बदनाम ९१ वर्षांच्या नारायणदत्त तिवारींचा भाजपा प्रवेश झाला, तेव्हा या प्रवेशावर हसावे की रडावे, असा प्रश्न भाजपाच्याच अनेक कार्यक र्त्यांना पडला. पाच राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी दमदार चेहरा नाही. पक्षाची उमेदवारी देण्यासाठी जागोजागी काँग्रेसजनांची आयात सुरू आहे. काँग्रेसमुक्त भारत? ... छे... हे तर भाजपाचेच काँग्रेसीकरण सुरू झाले आहे. संघ परिवारात वाढलेले पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते या प्रयोगामुळे हैराण आहेत. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी यापैकी अनेकांनी बंडखोरीचे निशाणही फडकवले आहे.
भाजपात घाऊक प्रमाणात सुरू असलेल्या पक्षांतराचे वर्णन, अमित शाह यांचा ‘विरोधी पक्षांवरील सर्जिकल स्ट्राईक’ असे कौतुकाने करण्यात येत असले तरी सत्तेवर असलेल्या भाजपाच्या राजकीय दिवाळखोरीचे ते लक्षण आहे. प्रत्यक्ष लाभ होवो, ना होवो, अमित शाह संधी मिळेल तिथे सर्जिकल स्ट्राईकच्या तथाकथित प्रयोगाचा खटाटोप करीत असतात. आपल्या या कौशल्याची ते भरपूर जाहिरातही घडवून आणतात. अर्थात सत्य त्यामुळे थोडेच लपून राहते. काही महिन्यांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधे सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक केले. मोदींनी त्याचे सारे श्रेय स्वत:कडे घेतले. त्यानंतर ना सीमेवरची घुसखोरी थांबली ना वारंवारच्या हल्ल्यांमधे आपल्या अनेक जवानांचे प्राण सरकारला वाचवता आले. ते माहीर आहेत. विरोधकांच्या मजबूत उमेदवारांना ऐनवेळी भाजपाचा भगवा टिळा लावून विरोधकांची दाणादाण उडवली की जनतेच्या नजरेत आपला पक्ष मजबूत दिसू लागतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. लखनौ मतदारसंघात राजनाथसिंहांविरूध्द काँग्रेसतर्फे रिटा बहुगुणा मैदानात होत्या. लढत बऱ्यापैकी अटीतटीची होती. मतदानाच्या नऊ दिवस आधी काँग्रेसचे शहराध्यक्ष नीरज बोरा यांना शाह यांनी पळवले. त्यांच्या गळ्यात भगवा दुपट्टा चढवला. परिणामी काँग्रेसच्या रोड शो ऐवजी बोरा राजनाथसिंहांच्या मिरवणुकीत दिसू लागले. जगदम्बिका पाल २00९ पासून काँग्रेसचे खासदार होते. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारीही दिली होती. दरम्यान अमित शाह यांनी अचानक भाजपा उमेदवारांच्या यादीत पाल यांचे नाव जाहीर केले. बृजभूषणसिंह यांनीही अखेरच्या क्षणी समाजवादी पक्षाची उमेदवारी नाकारून भाजपात उडी मारली. इतकेच नव्हे तर श्यामाचरण गुप्ता, चौधरी बाबूलाल, कीर्तिवर्धनसिह अशी शाह यांनी विरोधी पक्षातून भाजपामध्ये ओढलेली कितीतरी नावे सांगता येतील. विरोधकांची फजिती करण्यात त्यांना कमालीचा आनंद मिळतो. २0१४ च्या निवडणुकीत भाजपाला उत्तरप्रदेशात ८0 पैकी ७१ जागा मिळाल्या. शाह यांच्या धूर्त रणनीतीचे त्यावेळी सर्वत्र कौतुक झाले. तथापि सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही, या उक्तीनुसार त्यांचे कौतुक अल्पकाळ टिकले. दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या प्रयोगाची पुनरावृत्ती त्यांच्या पुरती अंगलट आली. दिल्लीत काँग्रेसचा दलित चेहरा कृष्णा तीरथ आणि केजरीवालांच्या आंदोलनातील आघाडीच्या सहकारी किरण बेदींना भाजपाच्या उमेदवारीवर दारूण पराभव पत्करावा लागला. ज्यांना थेट भाजपामध्ये आणणे शक्य नव्हते, अशा नेत्यांच्या सरबराईची बिहारमधे शहांनी स्वतंत्र व्यवस्था करून पाहिली. तिथेही त्यांना तोंडघशी पडावे लागले. दिल्ली आणि बिहारमध्ये सपशेल फसलेली रणनीती, उत्तर प्रदेश उत्तराखंडासह पाच राज्यांच्या निवडणुकीतही शहांनी चालूच ठेवली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात उमेदवारांची पहिली यादी भाजपा कार्यालयात तयार होती. ती तब्बल ३२ तास रोखण्यात आली, कारण अन्य पक्षातून ऐनवेळी कोण कोण भाजपात प्रवेश करतो, त्या प्रतिक्षेत अमित शाह होते. अपेक्षेनुसार उत्तराखंडात नारायणदत्त तिवारी, काँग्रेसचे माजी मंत्री यशपाल आर्य आदि नेते आपल्या कुटुंबकबिल्यासह भाजपात दाखल झाले. याखेरीज अन्य संधीसाधूंचेही लाल गालिचे अंथरून स्वागत सुरू आहे. भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधे मात्र त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपामध्ये ऐनवेळी घुसलेल्यांना तिकिटांची खिरापत वाटल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अमित शाह यांच्या निवासस्थानासमोर तर बुधवारी भाजपाच्या मुख्यालयासमोर पक्षाच्या मूळ निष्ठावंतांंनी जोरदार निदर्शने केली. उत्तराखंडात बंडखोर काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्यामुळे रूडकीचे नाराज भाजपा आमदार सुरेशचंद्र जैन यांच्या समर्थकांनी अमित शाह यांचा पुतळा जाळला व भाजपाच्या ध्वजाचेही दहन केले. काँग्रेस आणि भाजपाचे आजवरचे तमाम माजी मुख्यमंत्री या राज्यात सध्या भाजपामध्ये आहेत. त्यांच्या मुलाबाळांना भाजपाची उमेदवारी सन्मानाने बहाल करण्यात आली आहे. तिकिटाच्या स्पर्धेत उमेदवारी गमावलेल्या भाजपाच्या निष्ठावंतांनी मात्र यमकेश्वर, प्रताप नगर, नैनिताल, जसपूर, काशीपूर, डिडीहाट, अल्मोडा, कोटव्दार, सोमेश्वर, जागेश्वर, चंपावत, गंगोलीहाट, धारचुला, हरिव्दार ग्रामीण, चौबट्टाखाल, धानौल्टी, राणीखेत डोईवाला, नरेंद्रनगर, रूडकी अशा अनेक मतदारसंघात बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात घरातले भांडण मध्यंतरी चव्हाट्यावर आले. अमित शाह त्यामुळे अत्यंत खुशीत होते. भाजपासाठी ही निवडणूक केकवॉक ठरेल, अशा वल्गना पक्षाच्या मुख्यालयात ऐकू येत होत्या. दरम्यान निवडणूक आयोगाने सायकल चिन्हासह समाजवादी पक्ष अखिलेश यादवांच्या हाती सुपूर्द केला. बसपा वगळता भाजपाच्या तमाम विरोधकांची महाआघाडी वेगाने एकत्र येत असल्याचे चित्र दिसू लागताच भाजपाची सारी रणनीती बॅकफूटवर जाण्याची पाळी आली.
पाच राज्यांचे निकाल मोदी आणि अमित शाह यांच्या कौशल्याची कठोर परीक्षा घेणारे आहेत. नोटबंदीसह अनेक गोष्टींनी हैराण मतदारांनी न जाणो या निवडणुकीत भाजपावरच सर्जिकल स्ट्राईक केला तर भाजपाचे काँग्रेसीकरण करण्याचा डाव शहांवर उलटेलच, त्याचबरोबर मोदी कारकिर्दीचा काऊंटडाऊनही लगेच सुरू होईल.
-सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)

Web Title: Congress-free India? Sixth, this is Congressionalization of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.