काँग्रेस : काय गमावले, काय राखले ?

By admin | Published: May 21, 2016 04:38 AM2016-05-21T04:38:08+5:302016-05-21T04:38:08+5:30

अन्यत्र मोठा पराभव वाट्याला आल्यानंतर काँग्रेस पक्षात त्या पराजयांनी मरगळ आणणे आणि त्याच्या नेतृत्वाला त्यांनी अंतर्मुख करणे अपेक्षित व स्वाभाविक आहे.

Congress: What's Lost, What Happened? | काँग्रेस : काय गमावले, काय राखले ?

काँग्रेस : काय गमावले, काय राखले ?

Next


केरळ आणि आसाम ही दोन राज्ये गमावल्यानंतर व अन्यत्र मोठा पराभव वाट्याला आल्यानंतर काँग्रेस पक्षात त्या पराजयांनी मरगळ आणणे आणि त्याच्या नेतृत्वाला त्यांनी अंतर्मुख करणे अपेक्षित व स्वाभाविक आहे. विशेषत: दिल्ली आणि बिहारमधील निकालांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे पराभव जिव्हारी लागणारे आहेत. काँग्रेसने बंगालमध्ये डाव्या आघाडीशी केलेल्या निवडणूक समझोत्यामुळे ४१ जागा जिंकता आल्या असल्या तरी डाव्यांची त्या राज्यात झालेली दारूण घसरण त्या पक्षाला एवढी अपेक्षित नव्हती. शिवाय डाव्यांनी त्यांच्या हातून केरळची सत्ता हिसकावूनही घेतली. नेतृत्वाच्या उभारीवर व दमदारपणावरच केवळ पक्ष चालत नाही. त्याला कार्यकर्त्यांएवढेच स्थानिक नेतृत्वाचे बलशाली असणे आवश्यक असते. काँग्रेसने या वास्तवापासून फार पूर्वी स्वत:ला दूर नेले. इंदिरा गांधींच्या राजवटीतच त्या पक्षात प्रादेशिक नेतृत्वाचे खच्चीकरण सुरू होऊन सारे राजकारण केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न झाला. परिणामी दिल्लीत बसलेले कार्यालयीन सचिवही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भारी वाटू लागले. शरद पवारांसारखा बलदंड नेता पक्षापासून दूर जायला अशाच गोष्टी कारणीभूत ठरल्या. आपण ज्याला शेंदूर लावू त्या दगडाला देव मानून लोक नमस्कार करतील अशी मानसिकता त्याचमुळे दिल्लीत बळावली. परिणामी प्रादेशिक नेतृत्वाच्या जागी व राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावर निव्वळ हलकी आणि जनतेला फारशी परिचित नसलेली माणसेही दिसू लागली. महाराष्ट्राचेच उदाहरण द्यायचे तर निलंगेकर, भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे देता येईल. मजबूत आणि स्वबळावर मोठी झालेली वा होऊ शकणारी माणसे पुढे आणली नाहीत. आतादेखील आसामच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाचे जे सर्वानंद सोनोवाल येणार आहेत ते एकेकाळी काँग्रेसचे आघाडीचे कार्यकर्ते होते. पण गोगोई पितापुत्रांनी दिल्लीच्या मर्जीने त्यांना सदैव मागे व दूर ठेवण्याचे राजकारण केले. परिणामी गोगोई गेले आणि काँग्रेसची आसामातील १५ वर्षांची सत्ताही इतिहासजमा झाली. सोनिया गांधींच्या पुण्याईच्या बळावर काँग्रेसने देशावर २००४ पासून २०१४ पर्यंत राज्य केले. परंतु पक्षाच्या दिल्लीस्थित कार्यालयांची प्रादेशिकांना दुबळे व मागे ठेवण्याची पद्धत तीच राहिली. या काळात काँग्रेससमोर संघ परिवाराएवढेच प्रादेशिक पक्षांचे आव्हान उभे राहिले. या पक्षांची वाढती ताकद लक्षात घेऊन काँग्रेसचे अनेक जुने व निष्ठावंत वगैरे म्हणविणारे कार्यकर्ते आणि पुढारी आपापल्या पातळीवर पक्ष सोडून इतर पक्षांत जात राहिले. काँग्रेसविरोधी बाकांवर बसणारे कितीजण एकेकाळी काँग्रेसमध्ये होते याची गोळाबेरीज त्या पक्षाच्या राजकीय हिशेबतपासणीसांनी कधीतरी करून पाहावी अशी आहे. ही गळती थांबविण्यासाठी कोणी प्रयत्न केल्याचेही या काळात दिसले नाही. एकजण गेला तर तेवढीच आपल्यासाठी कुठली तरी जागा मोकळी होईल याच मानसिकतेने अनेकांना ग्रासले. परिणामी वर्षानुवर्षे पक्षात राहिलेली आणि त्याच्या सत्तेची फळे चाखलेली माणसे पक्ष सोडत असताना त्यांना थांबविण्याचा वा त्यांची नाराजी घालविण्याचा प्रयत्न करतानाही कुणी दिसले नाही. भाजपा व तिचा संघ परिवार यांनी देश काँग्रेसमुक्त करण्याची प्रतिज्ञाच आता केली आहे. ते दिवास्वप्न कधी पूर्ण व्हायचे नाही. कारण याच काळात अरविंद केजरीवाल, नितीशकुमार आणि लालू प्रसाद आदिंचे नेतृत्वही बलशाली झालेले देशाने पाहिले. उत्तर प्रदेशात मुलायमसिंह आणि मायावती मजबूत आहेत, ओडिशात नवीन पटनायक आपली सारी ताकद कायम राखून आहेत, तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी कमीअधिक फरकाने तसेच राहिले आहेत. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली ताकद वाढविली आहे. केरळातही डाव्यांएवढेच काँग्रेसनेही आपले सामर्थ्य कमीअधिक प्रमाणात टिकविले आहे. मात्र या साऱ्यांहून काँग्रेसला दिलासा देऊ शकणारा व त्याचा आधार बनू शकणारा एक मोठा वर्ग देशात अजून शिल्लक आहे. देशाच्या गरीब वस्त्यांतील शेतकरी आणि श्रमिकांचा मोठा वर्ग अजूनही त्या पक्षाविषयी आस्था बाळगून आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर व त्या लढ्याने देशाला दिलेल्या मूल्यांवर ज्यांची श्रद्धा आहे तो मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गही बऱ्याच अंशी त्या पक्षाविषयीची कृतज्ञता बाळगणारा आहे. देशात व अमेरिकेपासून मध्य आशियापर्यंत सर्वत्र वेगवेगळ्या धर्मांच्या कडव्या व अतिरेकी शक्तींनी हिंसेचा धुमाकूळ उभा केला आहे. या साऱ्या क्षेत्रांतील अतिरेक्यांचे वर्ग आपल्याच धर्मातील लोकांचे बळी घेताना व स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करताना दिसत आहेत. परिणामी विवेकाने विचार करणारा वर्ग पुन्हा एकवार मानवनिष्ठ धर्मातीततेकडे वळताना व ती पुन्हा एकवार आत्मसात करताना दिसत आहे. हे वर्ग यापुढच्या काळात काँग्रेसचे आशास्थान ठरणारे आहेत. त्या पक्षाचे नेतृत्व त्यांच्याजवळ कसे पोहोचते हाच त्यातला खरा प्रश्न आहे.

Web Title: Congress: What's Lost, What Happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.