साक्षीभूत मन

By admin | Published: January 13, 2015 01:59 AM2015-01-13T01:59:31+5:302015-01-13T02:39:58+5:30

सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते.

Conjecture mind | साक्षीभूत मन

साक्षीभूत मन

Next

‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही।
मानियेले नाही बहुमता।।’
असे तुकोबांनी म्हटले आहे. या एका कडव्यात विचारांचा फार मोठा भरणा आहे. सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते. बौद्धिक पातळीवर हा खेळ खेळला जातो.
आजची सकाळ प्रसन्न आहे असे एकाने म्हटल्यावर फारशी चांगली नाही असे दुसरा म्हणू शकतो. ही सापेक्षता. वास्तव सापेक्षतेच्या पलीकडे असू शकते. हवामानदृष्ट्या सकाळ निश्चित करणे हे वास्तव. हे शास्त्रीय वास्तव असते. अशा शास्त्रीयतेची कसोटी मनामुळे लागते. याला शास्त्रकाट्याची कसोटी म्हटले तरी चालेल.
सत्य हेच आणि असत्य हेच असा ठामपणाचा निर्णय मन करू शकते. पण असे का होत नाही? कारण मतामतांच्या गलबल्यामध्ये मन डळमळीत होते किंवा बहुमताच्या बाजूला झुकते. मनाची दोलायमान अवस्था घालवणे, मनावरच अवलंबून असते. यासाठी मनाला ग्वाही करणे आवश्यक असते. साक्षीभूत मन निर्णय करून बसलेले असते; पण बहुमतांच्या रेट्यामुळे ते हेलकावते.
मानवाच्या अंत:शक्तीचा हा उद्घोष आहे. कोणावर अवलंबून न राहता निर्णय करण्याची शक्ती प्रत्येकाच्या ठायी असते. कोणाला चटकन निर्णय करता येतो, कोणाला शांत चित्ताने विचार करून निर्णय करावा लागतो. पण मनाच्या ठायी निर्णायक शक्ती आहेच. तटस्थ राहाणे हाही मनाचा निर्णय असतो. पण तो परिस्थितीच्या संदर्भात असतो.
आत्मपातळीवर मनाचा कौल हा निर्णायक असतो. हे शास्त्रीय तत्त्व तुकोबांनी मांडून मानव संसाधनाच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. प्रत्येक व्यक्तीने मनाला साक्षीभूत केले, तर कित्येक अनवस्था प्रसंग टळतील. जन आणि मन हे द्वंद्व आहे. जनासाठी वर्तन वेगळे व मनासाठी वेगळे अशी कसरत करावी लागते. पण मनासाठी वर्तन हे आपल्या जगण्याला सार्थ करणारे ठरते, हे मात्र खरे !
मनाचा अबलख वारू त्याच्या कलाने दौडत नाही, तर त्याला दौडायला लावणाऱ्या प्रेरणांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सामान्य व्यक्तीच्या संदर्भात बहुमतांचा दाब कारणीभूत ठरतो; तर विचारी व्यक्तीच्या संदर्भात बुद्धीचा दबाव प्रेरक ठरतो. विवेकी व्यक्तीच्या संदर्भात ह्या दोन्ही धोक्यांचा प्रश्न उद्भवत नाही. सत्य आणि असत्याला ग्वाही असणारे मन साक्षीभूत अर्थात विवेकी असते.

Web Title: Conjecture mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.