एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 05:20 PM2018-11-16T17:20:27+5:302018-11-16T17:20:32+5:30

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु...

connect india | एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु, हे सगळे शिकणे आणि शिकविण्यापुरतेच मर्यादित राहते की काय, असे वर्तन पाहून वाटते. आज भाषा, प्रांत भेद आणि त्याहूनही जाती, धर्म भेद एकमेकांच्या जीवावर उठला आहे, अशी अनेक उदाहरणे घडतात. तरीही सद्भावना आणि भाईचाराचा संदेश देऊन देशभर फिरणारे थोर गांधीवादी नेते डॉ.एस.एस. सुब्बाराव यांच्यासारखी थोर माणसे हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आयुष्य देतात. देशाच्या कानाकोप-यात राष्ट्रीय एकात्मतेची शिबिरे, महोत्सव घेऊन सामाजिक सलोख्याचे बिजारोपण करण्याचे महत्कार्य डॉ. सुब्बाराव उर्फ भाईजी यांच्या हातून घडत आहे. असाच एक राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. 

या महोत्सवामध्ये देशातील १८ राज्यांमधून लहान मुले-मुली सहभागी झाले आहेत. महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम होतील, परंतु त्यापेक्षाही अधिक मोलाचा संदेश मिळणार आहे, तो म्हणजे सद्भावनेचा. आज तो अमूक जातीचा, तो त्या धर्माचा, माझी भाषा ही, त्याची भाषा वेगळी असे भेद शाळेतच अनुभवायला मिळतात. न कळत्या वयात मुले आई-बाबांना गंभीर प्रश्न विचारतात. तू कोणत्या धर्माचा, आपली जात कोणती? मुळातच हे सर्व प्रश्न सभोवतालचे वातावरण पाहून निर्माण होत आहेत. जात आणि धर्माच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्यावर लिहिणे दूरच दोन शब्द बोलणेही अवघड बनले आहे. अशावेळी कोणी तरी ठणकावून सांगितले पाहिजे, आपण सर्वजण एक आहोत. जाती-धर्म वेगळे असले तरी मानव आहोत. तुमच्या आणि माझ्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त हे सारखेच आहे. माझी वेशभूषा वेगळी आहे. मी बोलतो ती भाषा वेगळी आहे, आमच्या या विविधतेत एकता नांदते हे शिकविले पाहिजे. ९० वर्षीय डॉ. सुब्बारावजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य या एकमेव मूल्यासाठी वाहिले आहे. 

महोत्सवाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतून आलेली वेगवेगळ्या जाती-धर्माची मुले लातूर शहरातील वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या घरांत वास्तव्याला राहणार आहेत. ज्या पालकांनी समोरचा मुलगा कोणत्या प्रांताचा आहे, कोणती भाषा बोलणार आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यांचे मनस्वी अभिनंदन. लातूरच्या विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि दिल्लीच्या राष्ट्रीय युवा योजनेने पेरलेला हा राष्ट्रीय विचार उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणारा आहे. जाती-धर्माचे श्रेष्ठत्व आणि गौणत्व विसरून आपण मानव आहोत, हा मूक संस्कार बाल मनांवर कायमचा या महोत्सवाने कोरला जाणार आहे.

डॉ. एस.एन. सुब्बाराव यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले आहे. बालवयातच त्यांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन इंग्रजांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर सबंध आयुष्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकात्मतेसाठी दिले आहे. त्यांनी एक राष्ट्रीय विचार घेऊन चंबळचे खोरे पिंजून काढले. जिथे ६५४ डाकूंनी भाईजींसमोर आत्मसमर्पण केले. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लातूरसह देशभरातील मुलांना लाभणार आहे.  विशेष म्हणजे विविध जाती-धर्माच्या कुटुंबात वेगवेगळ्या प्रवाहातील मुले आणि मुली रमणार आहेत. महाराष्ट्रातील संस्कृती त्यांना अनुभवायला मिळेल. शिवाय, मुलांबरोबरच लातूरच्या पालकांनाही अन्य राज्यांतील बाल पाहुण्यांकडून त्यांच्या राज्यांची संस्कृती समजणार आहे. एक निश्चित आहे की, लातूरच्या पाचशे कुटुंबाचे देशाच्या विविध राज्यांत कायमचे नाते जोडले जाणार आहे. हा प्रयोग राष्ट्रीय एकात्मतेचे वायूमंडळ तयार करील. ज्याचा प्रभाव आणि परिणाम दीर्घकाळ देशाच्या कानाकोपऱ्यात दिसत राहील.

Web Title: connect india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत