चैतन्य

By admin | Published: October 8, 2015 04:41 AM2015-10-08T04:41:50+5:302015-10-08T04:41:50+5:30

त्या दिवशी छोट्या हेलनचा मूड काही औरच होता़ तिने नव्या बाहुलीचे केस उपटले़ हात-पाय तोडून इकडे तिकडे फेकले. कपडेही फाडले. अशावेळी एक मध्यवयीन स्त्री प्रवेश करून

Consciousness | चैतन्य

चैतन्य

Next

- रमेश सप्रे

त्या दिवशी छोट्या हेलनचा मूड काही औरच होता़ तिने नव्या बाहुलीचे केस उपटले़ हात-पाय तोडून इकडे तिकडे फेकले. कपडेही फाडले. अशावेळी एक मध्यवयीन स्त्री प्रवेश करून हेलनच्या आईवडिलांना म्हणते, ‘मी शिक्षिका म्हणून आले आहे’. त्यांनी तिला विचारलं, ‘आधीच्या शिक्षकांची काय हालत झाली याची कल्पना आहे ना’? यावर तिचं उत्तर, ‘हो, जाहिरात नीट वाचूनच मी आलेय़ कुठंय माझी विद्यार्थिनी’? बाबा म्हणाले, ‘आता तिच्याजवळ जाणं धोक्याचं आहे’ पण ती आत गेली़ पाहते तो काय! हेलन रागानं बाहुलीचा आणखी सत्यानाश करत होती़
शिक्षिकेनं तिचा हात धरून तिला मागच्या बागेत नेलं़ विहिरीवरील पंपानं तिच्या एका हातावर पाणी सोडलं़ दुसऱ्या हातावर लिहिलं, ‘डब्ल्यू ए टी इ आर’, नंतर तिच्या छोट्याशा हातावर एक दगड ठेवला व दुसऱ्या हातावर बोटानं लिहिलं, ‘एस् टी ओ एन इ’ नंतर गुलाबाचं फूल घेऊन हेलनच्या गालाला पाकळ्यांनी कुरवाळलं, नाकासमोर गुलाब धरून वास दिला़ असं निरनिराळ्या वस्तूंबरोबर केल्यावर हेलनच्या मनात एक विचार घट्ट बसला़, प्रत्येक वस्तूला नाव आहे़ मी जिवंत आहे म्हणून प्रत्येक गोष्ट जिवंत आहे़ या विचारासरशी आपला हात शिक्षिकेच्या हातातून सोडवून घेत हेलन धावतच आपल्या खोलीत आली़ पडलेले सर्व बाहुलीचे तुकडे गोळा करून छातीशी धरून ओक्साबोक्शी रडू लागली़ शिक्षिका तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवू लागली़ त्या स्पर्शातील जिव्हाळा हेलनला जाणवत होता़ आयुष्यातला सर्वात पहिला व अत्यंत महत्त्वाचा पाठ तिनं शिकला होता़ हा आंधळ्या-मुक्या-बहिऱ्या हेलन केलरचा शिक्षणाचा श्रीगणेशा होता़ स्पर्श-गंध-रूची यांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती वापरून तिनं ज्ञान मिळवायला आरंभ केला़ एका महान गुरूशिष्याच्या जोडीनं म्हणजेच अ‍ॅन सलिव्हन आणि हेलन केलर यांनी घडवलेला शिक्षण क्षेत्रातला तो महान चमत्कार ठरला़ ज्ञानोबा माऊलीनं वर्णिलेल्या जीवनसत्याचा तो साक्षात्कार होता़
या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत
परि ते तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती
सर्व वस्तूत जिवंतपणा आहे़, सर्व गोष्टींना भावना आहेत़, असं मानून त्याप्रमाणे सदासर्वदा सर्वांशी प्रेमानं वागलं तरी खूप आहे़ तत्त्वज्ञासारखी बुध्दीच हवी असं नाही़ फ क्त मन हवं संवेदनशील, आत्मियतेनं ओतप्रोत भरलेलं़ बस् !

Web Title: Consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.